Nashik News: खाना बोना अर्पण करण्यासाठी माऊल्या गडावर रवाना; डोंगरीदेव उत्सवाची आज सांगता
Nashik News: ‘आमची जनावरे, आम्हाला व आमच्या मुलांना, आमच्या गावाला सुखी ठेव, आमच्या शेतीत धान्याला बरकत येऊ दे’, अशी प्रार्थना करीत जिल्ह्यातील आदिवासी बांधवांनी सोमवारी (ता. २५) आपले आराध्य दैवत असलेल्या डोंगऱ्या देवास खाना बोना अर्पण करण्यासाठी आपल्या गावाजवळील डोंगर-गडावर रवाना झाले. मंगळवारी (ता. २६) विविध कार्यक्रमांनी उत्साहाची सांगता होणार आहे. (tribal brothers left for mountain fort near their village to offer food and seeds to mountain god nashik news)
आदिवासी बांधव दरवर्षी निसर्गाची पूजा करण्यासाठी मार्गशीर्ष महिन्यात डोंगरीदेव उत्सव करतात. गेल्या सात दिवसांपासून डोंगरी उत्सवाची दिंडोरीसह कळवण, सुरगाणा, पेठ तालुक्यातील गावागांवत धूम सुरू होती.
रोज विविध नृत्य व देवाची उपासना करणारे कार्यक्रम झाले. सोमवारी (ता. २५) सायंकाळी खळीवर माऊल्यांनी उपवास सोडून डोंगऱ्या देवाच्या पूजनासाठी आवश्यक साहित्य, बोकड, कोंबडा आदी साहित्य घेउन माऊल्या गडावर रवाना झाल्या. महिलांनी गावाच्या वेशीपर्यंत रस्त्यावर सडा रांगोळी व घोंगडीच्या पायघडया टाकून माऊल्यांचे औक्षण केले व वेशीपर्यंत जाऊन निरोप दिला.
माऊल्या रात्रभर गडाच्या (गौळाच्या) पायथ्याशी ‘रानखळी’वर जागरण करून गौळीत दिशेन गड घेण्यासाठी मार्गस्थ झाल्या. तेथे गौळाजवळ आडवा बांधलेला शेला ओलांडून सर्व माऊल्यांनी ओटीतील डाळी पोहे, नारळ गौळास अर्पण करून दर्शन घेतले व प्रार्थना केली. दरम्यान, भगत या जागी लाल कोंबडा जिवंत सोडतो, तर लाल बोकडाला फक्त मानवतो. येथे मात्र बोकड बळी दिला जात नाही.
मंगळवारी (ता. २६) धान पूजन, वस्तीवरून मागितलेल्या कमारीचे, नारळ प्रसादाचे सर्वांना वाटप करून सर्व माऊल्यांना टोप्या घालण्याचा कार्यक्रम होऊन डोंगऱ्यादेवाच्या व्रताची सांगता होणार आहे. सायंकाळी बोकड बळी देऊन रात्री गावोगावी भंडारा होणार आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.