नाशिक : प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात एक अशी घटना घडते. ज्यातून उद्भवलेल्या परिस्थितीतून वेगळी वाट काढण्यासाठी अन् जे निघून गेले आहे त्याच्या पुनः प्राप्तीसाठी प्रयत्न केले जातात. मात्र, हे करताना जी मानसिकता तयार होते त्याचा पट मांडणारी कलाकृती म्हणजे ‘उदकशांत’.
लेखकाची अर्थपूर्ण संहिता, दिग्दर्शकाची मेहनत, नाटकाला साजेसे नेपथ्य, संगीत अन् प्रकाशयोजना ही या नाटकाची जमेची बाजू ठरली. याला कलावंतांच्या अभिनयाचीही उत्तम जोड लाभल्याने या नाटकामुळे स्पर्धेत चुरस निर्माण झाली आहे, असे म्हणायला हरकत नाही.
६१ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत नाशिक येथील कविवर्य नारायण सुर्वे सार्वजनिक वाचनालयातर्फे सादर झालेले ‘उदकशांत’ नाटकाचे लेखन डॉ. समीर मोने यांनी केले, तर या दिग्दर्शन सचिन रहाणे यांनी केले. (Udaka Shanti drama performance increase competition in state theatre amateur competition Nashik News)
‘उदकशांत’ मुळात एक धार्मिक विधी आहे. जो वातावरणातील दूषितपणा यासह वर्तमान परिस्थितीत बदल व्हावे म्हणून केला जातो. हाच बदल या नाट्यकृतीतून दाखविण्याचा प्रयत्न लेखक, दिग्दर्शकाने केला आहे.
खेडेगावात राहणाऱ्या एका दांपत्याच्या पोटी मतीमंद मुल जन्माला येते अन् तेथून त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळते. हे मुल काही वर्षांत मृत्यू पावते. अपत्याचा मृत्यूने पित्याची मात्र घालमेल सुरू होते. त्याला त्याच्या गुरूच्या भविष्यवाणीनुसार त्यांचे मुल पुन्हा प्राप्त होईल असे कळते. यानंतर त्यांच्या घरात एक दांपत्य मदतीच्या आशेने येते. जे बाहेर सुरू असलेल्या वादळी वाऱ्यासह होणाऱ्या पावसापासून स्वतःचा बचाव करत असते.
घरात आलेली महिलादेखील गरोदर असते अन् तिच्या पोटी जन्माला येणार मूलदेखील मतीमंद असेल, असे भाकीत डॉक्टरांनी केलेले असते. त्यामुळे आपले अपत्य गमावलेला पिता या स्त्रीच्या पोटी जन्माला येणार मुल हे आपलंच आहे, असे मानू लागतो अन् तेथून सुरू होतो या नाटकातील परिस्थिती बदलविण्याचा अनोखा प्रवास.
ज्यातून एका अशा मानसिकतेचा जन्म होतो जी हे सर्वकाही बदलू पाहते. सचिन रहाणे, शब्दजा वेलदोडे- देशपांडे, दीपक चव्हाण, भावना कुलकर्णी, हर्षल भट, राधा चव्हाण कलावंतांनी यांनी आपल्या भूमिकेला न्याय दिला. निर्मितीप्रमुख रविकांत शार्दूल यांच्या या कलाकृतीत सचिन रहाणे, दीपक चव्हाण यांनी नेपथ्य साकारले, तर विनय कटारे, विलास नलावडे यांनी रंगमंच व्यवस्था केली. या नाटकाची प्रकाशयोजना विनोद राठोड, तर पार्श्वसंगीत प्रणिल तिवडे यांनी केले. रंगभूषा ललित कुलकर्णी, वेशभूषा प्रबुद्ध मागाडे यांनी साकारली.
आजचे नाटक
शनिवारी (ता. १०) वेळ सायंकाळी ७ वाजता कलाकुंभ बहुद्देशीय संस्था, नाशिकतर्फे ‘ब्रेकिंग न्यूज’ हे नाटक सादर होणार आहे. नाटकाचे लेखक विद्यासागर अध्यापक असून, विजय साळवे दिग्दर्शक आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.