Nashik News : घरोघरी स्वयंपाकाचा गॅस पुरविण्यासाठी महाराष्ट्र नॅचरल गॅस कंपनीकडून पाइपलाइन टाकली जात आहे. त्यासाठी शहरात खड्डा खोदण्याचे काम सुरू आहे. परंतु खड्डा खोदताना नियम पाळले जात नसल्याने गॅस पाइपलाइन नको म्हणण्याची वेळ नाशिककरांवर आली आहे.
तक्रारींच्या अनुषंगाने बांधकाम विभागाने सर्वच ठेकेदार व उपठेकेदारांची अडीच तास मॅरेथॉन बैठक घेऊन मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात खड्डे खोदाई पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. (Ultimatum to MNGL Contractors Deadline to complete work by first week of May Nashik News)
महापालिका हद्दीत घरोघरी स्वयंपाकाचा गॅसपुरवठा करण्यासाठी महाराष्ट्र नॅचरल गॅस कंपनीकडून खोदकाम सुरू आहे. खोदकामाच्या बदल्यात एमएनजीएलने महापालिकेकडे खड्डे खोदायची रॉयल्टीदेखील भरली आहे.
मात्र रॉयल्टी भरल्यानंतर महापालिकेने रस्ते नावावर केल्याच्या आविर्भावात खोदकाम सुरू आहे. गेल्या दोन वर्षांपासून सुरू असलेले खोदकाम अद्यापही पूर्ण झालेले नाही. त्यामुळे बांधकाम विभागाला वारंवार रस्त्यांची दुरुस्ती करावी लागते.
नागरिकांनादेखील मोठ्या प्रमाणात त्रास होत असून, वाहतूक ठप्प होण्याबरोबरच अपघातांचे प्रमाण वाढले आहे. नियमानुसार खड्डा करताना दोनशे ते तीनशे मीटर खड्डा खोदून त्यात पाइपलाइन टाकून तो खड्डा बुजविणे, त्यानंतर पुढचे काम हाती घेणे असे अभिप्रेत आहे.
मात्र खर्च वाचविण्यासाठी एक ते दीड किलोमीटर खड्डा खोदला जातो. यामुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. खड्डा खोदतानादेखील नियम आहे. मात्र जेसीबीचा पंजा खोलवर घुसवून खड्डे खोदले जात असल्याने त्यामुळे पाण्याच्या लाईन फुटून पाणीपुरवठा विस्कळित होतो व ड्रेनेजलाइन फुटल्याने परिसरात दुर्गंधी साचून पुढची प्रक्रिया विस्कळित होते.
हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत
या संदर्भात पंधरा दिवसापूर्वी ठेकेदार व उपठेकेदार तसेच एमएनजीएल कंपनीलादेखील सूचना देवून तंबी देण्यात आली. आठ दिवस काम व्यवस्थित चालले. मात्र, त्यानंतर पुन्हा परिस्थिती जैसे-थे राहिली. उलट नागरिकांच्या तक्रारी अधिक वाढल्या.
त्या पार्श्वभूमीवर बांधकाम विभागाने जवळपास अडीच ते तीन तास बैठक घेऊन ठेकेदार व ठेकेदारांची कानउघाडणी केली. एमएनजीएल कंपनीला मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत काम पूर्ण करण्याच्या सूचना शिवकुमार वंजारी यांनी दिल्या. दिलेल्या मुदतीत काम न झाल्यास काम बंद केले जाणार आहे.
खड्डा खोदताना महत्त्वाच्या सूचना
- खड्डा खोदण्यापूर्वी परवानगी आवश्यक.
- पाणीपुरवठा, ड्रेनेज, बांधकाम अभियंत्यांची उपस्थिती.
- रस्त्यावरील माती हटविण्यासाठी छोटा जेसीबी, रोडरोलर जागेवर.
- शंभर मीटरपर्यंतच खड्डा खोदण्यास परवानगी.
"चुकीच्या पद्धतीने खड्डा खोदला जात असल्याने अनेक समस्या निर्माण होत आहे. परंतु गॅस पाइपलाइन गरजेचीदेखील आहे. त्यामुळे मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत काम पूर्ण करण्याचे बंधन घालण्यात आले असून, नागरिकांना कुठल्याच प्रकारचा त्रास होणार नाही अशा पद्धतीने काम करण्याच्या सूचना दिल्या आहेत."
- शिवकुमार वंजारी, शहर अभियंता, महापालिका.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.