Nashik News : अनधिकृत होर्डिंगमुळे शहराचे विद्रूपीकरण होत असताना त्याविरोधात नेहमीच कारवाईची मागणी होते. महापालिकेच्या अतिक्रमण विभागाला जाग आली तर अनधिकृत होर्डिंगविरोधात कारवाई केली जाते, तर कधी पोलिसांकडूनही अनधिकृतरीत्या उभारण्यात आलेल्या होर्डिंगवर कारवाई केली जाते.
परंतु आता तर थेट गंगापूर रोडवरील पोलिस आयुक्तालयासमोरच असलेल्या महापालिकेच्या दिशादर्शक कमानीवरच वाढदिवसाचे अनधिकृत होर्डिंग लावण्यात आलेले आहे. (Unauthorized hoardings on directional arch in front of Commissionerate nashik news)
या रस्त्याने पोलिस आयुक्तांसह सरकारवाडा पोलिस ठाण्याचे अधिकारी व महापालिकेच्या अधिकाऱ्यांची वाहने जात असताना यातील कोणालाही हे अनधिकृत होर्डिंग नजरेला पडले नसावे का, की होर्डिंगवरील व्यक्तीच्या वजनामुळे थेट दिशादर्शक कमानच झाकली तरी चालते, अशी चर्चा जागरूक नागरिकांमध्ये आहे.
अशोकस्तंभाकडून गंगापूर रोडच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावरच पोलिस आयुक्तालय आणि त्याशेजारीच सरकारवाडा पोलिस ठाणे आहे. पोलिस ठाण्याच्या समोरच केटीएचएम महाविद्यालय व मराठा हायस्कूल आहे. तर, याच रस्त्यावर उड्डाणपूल आहे. पोलिस आयुक्तालय आणि सरकारवाडा पोलिस ठाणे रस्त्यादरम्यानच महापालिकेची दिशादर्शक कमान आहे. कमानीवर पुढील रस्त्यांची दिशा दर्शविण्यात आलेली आहे.
मात्र दिशादर्शक कमान शहरातील एका राजकीय पदाधिकाऱ्यांच्या वाढदिवसाचा फलक लावलेला आहे. वाढदिवसाच्या फलकामुळे संपूर्ण कमानीवरील दिशादर्शक झाकली गेल्याने नव्याने शहरात येणाऱ्यास या रस्त्यावरील वळणाची दिशाच कळू शकणार नाही. तर, शहरातील काही जागरूक नागरिकांनी याबाबत तीव्र नाराजीही व्यक्त केली आहे.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
काही दिवसांपूर्वी त्र्यंबक रोडवरील पिनॅकल मॉलसमोरील कमानीवरही अशाच रीतीने वाढदिवसाचे होर्डिंग लावले असता, ते महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने हटविले होते. तर शहर पोलिसांनीही अनेकदा असे अनधिकृतरीत्या उभारण्यात आलेले फलक काढून संबंधितांविरोधात शहर विद्रूपीकरणसंदर्भात गुन्हेही दाखल केलेले आहेत.
असे असताना या पदाधिकाऱ्याने थेट पोलिस आयुक्तालयासमोरील कमानीवरच अनधिकृतरीत्या होर्डिंग लावून महापालिकेच्या अतिक्रमण विभाग आणि पोलिसांच्या कारवाईलाच आव्हान दिले आहे. मात्र असे असूनही या दोन्ही विभागाकडून कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे या राजकीय पदाधिकाऱ्याचे ‘वजन’ वाढल्याचीच चर्चा शहरातील जागरूक नागरिकांमध्ये सुरू आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.