Nashik News : शिवाजीनगर येथील जलशुद्धीकरण केंद्राजवळ शुद्ध केलेले जल वाहून नेण्यासाठी टाकलेली जलवाहिनी सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. जलवाहिनी ग्रामपंचायत, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, जिल्हा परिषद यापैकी कोणी टाकली, याबाबत महापालिकेला माहिती नाही व महापालिकेकडूनही अशा प्रकारची कुठलीच जलवाहिनी टाकली गेली नसल्याचे सांगण्यात आले आहे.
जलवाहिनी कोणी टाकली, यावरून पाणीचोरीचा संशय व्यक्त केला जात आहे. पुढे ही जलवाहिनी सावरगाव, गंगावऱ्हे व गोवर्धन या गावांकडे जाते. त्यामुळे जलजीवन मिशनअंतर्गत जलवाहिनी टाकून बिले काढण्याचा प्रकार असल्याचे बोलले जात आहे. (Unknown pipeline at water treatment plant nashik news)
धरणातून कच्चे पाणी उपसून जलशुद्धीकरण केंद्रात आले जाते. जलशुद्धीकरण केंद्रात पाणी शुद्ध केल्यानंतर पुढे जलकुंभाच्या माध्यमातून घरोघरी पाण्याचे वितरण होते. गंगापूर धरणातून उपसा केलेले पाणी शिवाजीनगर व बारा बंगला जलशुद्धीकरण केंद्रात आणले जाते. तेथून पुढे वितरण होते. पाणी वितरणाचे महापालिकेचे स्वतंत्र जाळे आहे.
असे असताना सातपूर विभागातील शिवाजीनगर जलशुद्धीकरण केंद्राला लागून ग्रामीण भागातून जवळपास सहा इंची नवीन पाइपलाइन टाकली आहे. जलजीवन मिशनअंतर्गत काम सुरू असेल म्हणून महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने दुर्लक्ष केले. त्यानंतर मात्र जलशुद्धीकरण केंद्राच्या बाजूलाच मुख्य जलवाहिनीला जोडता येईल, अशा पद्धतीने काम पूर्ण होत असल्याने महापालिकेने पूर्वपरवानगीचे कागदपत्र न दाखविल्याने बंद पाडले.
सध्या काम बंद अवस्थेत असले तरी पाइपलाइन कुठल्या यंत्रणेने टाकली, याबाबत खुलासा होत नाही. पाण्याची चोरी करण्यासाठी यंत्रणा टाकली असेल, अशी चर्चा आहे. असे असेल तर पोलिसांना का कळविले जात नाही, हादेखील एक प्रश्न विचारला जात आहे. जलजीवन मिशनअंतर्गत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या (मजीप्र) माध्यमातून पाइपलाइन टाकली असेल, अशीही चर्चा आहे.
परंतु जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता सुबोध मोरे यांनी अशा प्रकारचे कुठलेच काम हाती घेतले गेले नसल्याचे सांगण्यात आले. जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागामार्फत कामे सुरू असतील, असे त्यांच्याकडून सांगण्यात आले.
जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे प्रभारी कार्यकारी अभियंता संदीप सोनवणे यांनी जिल्हा परिषदेचा काहीही संबंध नसल्याचा खुलासा करताना ‘मजीप्र’चे काम असावे, असा कयास लावला. महापालिकेसह ‘मजीप्र’ व जिल्हा परिषदेकडून नकार मिळाल्यानंतर गूढ वाढले आहे.
जलजीवन कामात घोळ?
जलजीवन मिशनअंतर्गत पिण्याच्या पाण्याची सोय करण्यासाठी पाइपलाइन टाकण्याची कामे नाशिक जिल्ह्यात जवळपास १,४०० कोटींची एक हजार २२२ कामे सुरू आहेत. यातील ७९ कामांमध्ये अनियमितता असल्याच्या संशयावरून शासनाकडून चौकशी सुरू आहे. चौकशीसाठी पथक नाशिकमध्ये येऊन गेले. जलजीवनची कामे करताना खर्चावर भर देण्यात आला आहे.
कामांचे वाटप करून बिले काढण्याचे उद्योग सुरू असल्याची चर्चा आहे. ज्या संस्थेला पाणी द्यायचे आहे व ज्या संस्थेकडून पाणी घ्यायचे आहे, अशा दोन्ही संस्थांची मान्यता बंधनकारक आहे.
त्याशिवाय जलजीवनची कामे घेताना शेवटच्या घटकापर्यंत पाणी कसे पोचेल, यासंदर्भात माहिती असणे गरजेचे आहे. परंतु फक्त पाइपलाइन टाकून देयके काढल्याचा संशय असून, शिवाजीनगर जलशुद्धीकरण केंद्राजवळ टाकलेली पाइपलाइन हा त्याचाच एक भाग असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
"शिवाजीनगर जलशुद्धीकरण केंद्राजवळ टाकलेल्या पाइपलाइनचा महापालिकेशी संबंध नसल्याने काम तत्काळ बंद करण्यात आले आहे." - अविनाश धनाईत, अधीक्षक अभियंता, यांत्रिकी विभाग, महापालिका
"गोवर्धन, गंगावऱ्हे गावासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत पाइपलाइन असू शकते. जिल्हा परिषदेचा काहीएक संबंध नाही." - संदीप सोनवणे, कार्यकारी अभियंता, जिल्हा परिषद
"महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने गोवर्धन, सावरगाव किंवा गंगावऱ्हे गावासाठी कुठल्याही प्रकारची योजना मंजूर केलेली नाही. जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाकडून टाकली गेली असावी." - सुबोध मोरे, कार्यकारी अभियंता, मजीप्र
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.