Unseasonal Rain Nashik : मालेगाव, बागलाण तालुक्यात शनिवारी (ता.८) अवकाळी पावसाने हजेरी लावली. दुपारी साडेतीन नंतर गारपिटीसह झालेल्या वादळी बेमोसमी पावसाने बागलाण तालुक्यातील शेतकऱ्यांची दैना केली. (Unseasonal rain in Baglan Malegaon nashik news)
सुमारे अर्धा तास झालेल्या पावसाने शेतकऱ्यांच्या स्वप्नांची राखरांगोळी करून टाकली. आज झालेल्या या पावसाने कांद्यासह गहू, हरभराचे आणि भाजीपाला पिकांसह आंब्याचे मोठे नुकसान केले. बागलाण तालुक्यात झालेल्या बेमोसमी पावसाने अनेक ठिकाणी पत्रे उडाले तर उन्हाळी मका जमीनदोस्त झाला.
मालेगावला जोरदार हजेरी
शहरासह परिसरात व प्रामुख्याने काटवन भागात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली. अवघ्या अर्धा तास झालेल्या कडाक्याच्या पावसाने कांदा पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. पावसाने वीजपुरवठा खंडित झाला. झाडे उन्मळून पडली.
विराणे, पोहाणे, दहिदी, गारेगाव, गाळणे, चिंचवे, वनपट, टिंगरी, कौळाणे, घाणेगाव आदी भागाला जोरदार पावसाने झोडपल्याने कांद्याची वाट लागली. उन्हाळी मका जमीनदोस्त झाला. कांद्याचे बी नामशेष झाल्याचे हिरामण कचवे यांनी सांगितले. काही भागात हलक्याशा गारा पडल्या.सोसाट्याच्या वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली.
गारेगाव, दहिदी परिसरात घरे व पोल्ट्रीचे पत्रे उडाले. शहरातील सर्व रस्त्यांवर झाडाच्या पानांचा खच पडला होता. उंच सखल भागात पाणी साचले. रमजान पर्व सुरु असून सायंकाळी रोजा सोडण्याची व खरेदीची वेळ असतानाच पावसाने हजेरी लावल्याने खाद्यपदार्थ विक्रेत्यांची दाणादाण उडाली. आघार, ढवळेश्वर, रावळगाव या भागातही पावसाने हजेरी लावली.
ग्रामीण भागातही वीजपुरवठा खंडित झाला. काढणीवर आलेला कांदा शेतातच भिजला. अनेक शेतकऱ्यांनी कांदा काढून ठेवला आहे. उघड्यावरील कांदा पावसात भिजल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. भाजीपाला पिकालाही अवकाळीचा फटका बसला.
नरकोळ, जाखोडला शेतकऱ्यांची तारांबळ
जाखोड (ता.बागलाण) सह नरकोळ बंधारपाडा परिसरात शनिवारी (ता. ८) विजेच्या कडकडाटात वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्याने शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. जाखोड येथील शेतकरी दादाजी पवार यांच्या शेतात वीज पडून बैल ठार झाला. सरपंच शंकर पवार, कोतवाल बाशिंगे, शंकर माळी, विजय पवार, रामदास बागूल सह ग्रामस्थ उपस्थित होते.
जुनी शेमळीत आंब्याचे नुकसान
जुनी शेमळी (ता. बागलाण) येथील परिसरात सायंकाळच्या सुमारास वादळी वाऱ्यासह गारपीठ झाल्याने यात कांदा पिकाचे व आंब्याचे नुकसान झाले. नागझरी, किरातवाडी, अजमीर सौंदाणे या भागात सकाळपासून ढगाळ वातावरण होते.
दुपारी पाचला अचानक जोरदार पाऊस आला. या पावसात चाळी अभावी उघड्यावर साठवणूक ठेवलेला कांदा पूर्णपणे भिजला. यावेळी कांदा झाकण्यासाठी शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. ढगाळ वातावरणामुळे पिकांवर पुन्हा रोगांचा प्रार्दुभाव होणार असल्याने आर्थिक संकटाचा सामना शेतकऱ्यांना करावा लागणार आहे.
अंबासनला अतोनात नुकसान
करंजाडी परिसरात अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यासह गारपिटीने झोडपल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. बिजोटेत वीज वितरण कंपनीचा रोहित्र वादळी वाऱ्यामुळे जमीनदोस्त झाला तर करंजाड येथील शेतकरी यांचे घरांचे पत्रे उडाले. कांदा, डाळिंब पिकांचेही अतोनात नुकसान झाले.
भडाणे, बिजोटे, आखतवाडे, निताणे, पारनेर, आनंदपुर भागात तीन वाजेच्या सुमारास मेघगर्जनेसह जोरदार वादळी वारा व गारपीटीने झोडपले. वादळी वाऱ्यामुळे बिजोटेतील प्राथमिक आरोग्य केंद्राचे मोठे नुकसान झाले असून दुकान, किशोर बच्छाव यांचे हॉटेल वैष्णवी, घरांचे पत्रे वादळात उडाले. करंजाड येथील शेतकरी शंकर दगा देवरे यांच्या घरावरील पत्रे वादळात उडाले.
त्याच्या गोठ्यातील वासरावर दगड पडल्याने जागीच मृत झाले. बळवंत वेताळ यांच्या घराचीही पावसात हानी झाली. आखतवाडे, पारनेर, निताणे, भडाणे, या गावातही मोठ्या प्रमाणात घरांचे तसेच शेती शिवारात कांदा पिकांचे नुकसान झाले आहे. शासकीय नुकसानग्रस्त भागात आमदार दिलीप बोरसे पाहणी करून शासनस्तरावर पाठपुरावा करण्याची ग्वाही दिली.
लखमापुर येथे गारपीट
लखमापूर परिसरात शनिवारी (ता.८) सायंकाळी सहानंतर गारपीट झाली. अर्धा तास वादळी वारा व मुसळधार पावसात गारा पडल्यामुळे उन्हाळ कांद्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. वादळी वाऱ्याच्या खळ्यांमध्ये काढून ठेवलेल्या उन्हाळी कांद्यावरील प्लास्टिक आच्छादने उडून गेल्यामुळे कांदा भिजून खराब झाला आहे. अस्मानी, सुलतानी संकटात शेतकरी सापडला आहे. अजून पुढील काही दिवस अवकाळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आल्यामुळे शेतकरी धास्तावला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.