Token Machine : शेतीच्या दृष्टीने पेरणीचा हंगाम अत्यंत महत्त्वाचा समजला जातो. परंतु नेमक्या याचवेळी मजुरांची टंचाई निर्माण होत किंवा जादा पैसे देत पेरणी करून घ्यावी लागत असते.
यावर पर्याय म्हणून नवनवीन पेरणी यंत्रे आल्याने शेतकरी त्यांचा अवलंब करू लागल्याने मजुरीत मोठी बचत होऊ लागली आहे. मका पेरणीसाठी देवळ्यामध्ये अशाच नवनवीन यंत्रणाचा वापर वाढला आहे. तालुक्यात गिरणा नदीकाठावरील अनेक शेतकरी मका पेरणीसाठी मका टोकन यंत्राचा वापर करू लागले आहेत.
कसमादे पट्ट्यात दरवर्षी मका लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. गिरणा काठावरील अनेक शेतकरी तर मॉन्सूनच्या पावसाआधीच मका पेरणी करतात. ही लागवड पूर्वी पारंपारिक पद्धतीने केली जात होती. यासाठी हंगामात शेतमजुरांची टंचाई असते.
अशावेळी अनेकदा जादा मजुरी देऊन शेतकऱ्यांना आपली पेरणी करावी लागायची. मात्र आता मका पेरणी जलद गतीने व्हावी यासाठी येथील शेतकऱ्याकडून मका टोकन यंत्राचा वापर वाढला असून हे यंत्र प्रभावी देखील ठरत आहे.
सव्वा ते दीड तासात एक माणूस या यंत्राद्वारे एकरभर मका पेरणी करू शकतो. बियाणे एका विशिष्ट अंतरावर पडत असल्यामुळे मजूर, वेळ आणि बियाण्याचीही बचत या यंत्राने होते असे शेतकऱ्यांनी 'सकाळ' ला सांगितले.
सावकी-विठेवाडी शिवारातील प्रगतिशील शेतकरी धनंजय बोरसे यांच्यासह अनेक शेतकरी या पेरणी यंत्राने मका पेरणी करत आहेत.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
वाढती मजुरी व मजूर टंचाई याला पर्यायी व्यवस्था म्हणून शेतकरी सुधारित यंत्राचा मोठ्या प्रमाणात वापर करताना दिसून येत आहे. सध्या गिरणा नदीचे शेवटचे आवर्तन सोडले असल्याने नदीकाठाच्या विहिरींना मुबलक पाणीसाठा उपलब्ध असल्यामुळे लोहणेर, सावकी, विठेवाडी , भऊर, खामखेडा परिसरात खरीप हंगामातील मका पेरणीला वेग आला आहे.
'काही शेतकऱ्यांनी मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात काही प्रमाणात मका पेरणी केली आहे. तर काही शेतकरी आता पेरणी करत आहेत. मका बियाण्यांचे भाव वाढल्याने शेतकरी वर्गात नाराजीचा सूर आहे.
आधीच कांद्याला भाव नाही, त्यात कांद्याचे अनुदान नाही आणि बियाण्यांचे भाव वाढलेले आहेत. किमान मजुरी तरी वाचावी यासाठी या यंत्राचा वापर करत घरच्या घरी मका पेरणी करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे.
"वाढत्या मजुर टंचाईमुळे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीचे उत्पादन घेण्यासाठी शेतकरी प्रयत्नशील असतो. या या यंत्राची किंमतही माफक असल्याने व कोणत्याही तृणधान्य, कडधान्य वा तेलबिया अशा पिकांची पेरणी या यंत्राद्वारे होते. शेतकऱ्यांनी आता आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरायला हवी."- कुबेर जाधव, समन्वयक स्वाभिमानी शेतकरी संघटना
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.