नाशिक : हरसूलपासून दहा किलोमीटर अंतरावरील तोरंगणपाडा जवळपास दोन हजार लोकवस्तीचा. इथल्या हनुमान मंदिरासमोर चौदाशे शतकानंतरच्या वीस चिरांची अवस्था बिकट झाल्याचे वृत्त ‘सकाळ'मध्ये प्रसिद्ध झाले होते.
त्याची दखल ग्रामस्थांनी घेत जागतिक आदिवासी गौरवदिनी चिरांच्या संवर्धनाचा निर्णय घेतला. ज्येष्ठ रामदास बोरसे यांच्या हस्ते वाघ देवतेची पूजा करण्यात आली. (Villagers will conserve Chira on Toranganpada Nashik Sakal Impact Latest Marathi news)
मुरलीधर बोरसे, ग्रामसेवक रतन बागूल, माजी उपसरपंच यशवंत बोरसे, हिरामण बोरसे, पवन बोरसे, राहुल बोरसे, अंबादास बोरसे, निवृत्ती हिरपूड आदी उपस्थित होते. ठाणापाडा जवळ खैराईगड आहे. रामनगरचा भूभाग जिंकताना छत्रपती शिवाजी महाराजांनी खैराई किल्ला स्वराज्यात सामील करून घेतला.
त्यासंबंधीचा इतिहास तोरंगणपाड्यावरील चिरांवरुन पुढे येण्याची शक्यता अधिक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी खैराई गडावर जाताना विजयाचे तोरण बांधले होते म्हणून पाड्याला तोरंगण असे नाव पडले, असे स्थानिक ज्येष्ठ सांगतात. तसेच बाजूला असलेले दलपतपूर गावामुळे त्याला पुष्टी मिळत असल्याचे म्हटले जाते.
चिरा पाहिल्यावर विरगळ अभ्यासक अनिल दुधाने यांच्याशी संपर्क साधल्यावर ते म्हणाले, की चिरा आणि विरगळमध्ये फरक आहे. विरगळ नाशिक भागात कमी असून एका दगडावर शूर व्यक्तीचे लढाईसह इतर प्रसंग कोरलेले असतात.
नाशिक जिल्ह्यातील आदिवासी भागात चिरा आढळतात. पूर्वजांची आठवण म्हणून उभारलेला दगड म्हणून चिराकडे पाहिले जाते. चिरावर वेगवेगळ्या पद्धतीचे चित्रण व शिल्पांकन पाहावयास मिळते. चिरा आठ ते पंधरा फूट उंच असू शकतात. आदिवासीमध्ये पूर्ण कुटुंबाची चिरा एका दगडात केली जाते.
कुटुंबातील व्यक्तीचे निधन झाल्यावर त्या भागाला शेंदूर लावला जातो. जिवंत व्यक्तीची चिरा रंगवलेली नसते. चिरा पती-पत्नी, शूरवीर घोड्यावर बसलेले, धनुष्यबाण घेतलेले दाखवलेले असतात. गावातील चिरावर घोड्यावर बसलेले पुरुष दाखवण्यात आले असल्याने गावातील शूर पुरुषांच्या माहितीचे संकेत असावेत.
"आमच्या गावात वीस चिरा आहेत. त्या दुलर्क्षित होत्या. ‘सकाळ' मध्ये बातमी प्रसिद्ध आल्यावर आम्ही गावातील सर्व चिरा एकत्रित करून त्यांचे संवर्धन एका ठिकाणी करणार आहोत. छत्रपती शिवाजी महाराज आमच्या गावात आले असल्याचे आमचे पूर्वज सांगतात. दसरा आणि होळी सणावेळी आम्ही त्यांची पूजा करतो. " - मुरलीधर बोरसे, ग्रामस्थ
"छत्रपती शिवाजी महाराज हे खैराई गडावर जाताना आमच्या भागात विजयाचे तोरण बांधले होते, म्हणून पाड्याला तोरंगण असे नाव पडले, असे गावातील वयोवृद्ध सांगतात. आम्हाला गावाचा इतिहास जिवंत ठेवायचा आहे. त्यासाठी आम्ही चिरांचे संवर्धन करणार आहोत."
- रामदास बोरसे, माजी सरपंच
"चिरांच्या संवर्धनासाठी ग्रामस्थांना मदत करणार आहे. गावाने उचलेले संवर्धनाचे पाऊल कौतुकास्पद आहे. गावाचा हा आदर्श इतर गावांना घेता येणार आहे."
- रतन बागूल, ग्रामसेवक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.