देवळा : येथील विंचूर- प्रकाशा राज्यमार्गाची वाटचाल महामार्ग होण्याच्या दिशेने सुरू असली तरी यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत आहे. या एकेरी वाहतुकीतून निर्माण झालेल्या रस्त्याच्या दुरवस्थेमुळे चालक व प्रवासी वैतागले आहेत.
महामार्गावरील खड्डे व धुळीमुळे अनेक नागरिकांना मणक्याचे व श्वसनाचे विकार जडल्याने आरोग्याचे प्रश्न निर्माण होत आहेत.
एका बाजूचा रस्ता व्यवस्थितपणे वाहतुकीस खुला केल्याशिवाय दुसरी बाजू उकरली जाऊ नये अशा प्रतिक्रिया नागरिकांतून व्यक्त होत आहेत. (Vinchur Prakash Marg one way road people suffering from traffic jam Nashik News)
देवळा तालुक्यातून जाणाऱ्या व सर्वाधिक वाहतूक असलेला विंचूर प्रकाशा हा मार्ग असून या मार्गाने प्रवासी आणि अवजड वाहनांची वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू असते.
विंचूर प्रकाशा राज्य मार्ग क्रमांक ७ हा २०१७ मध्ये राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७५२ जी म्हणून घोषित करण्यात आला.
भारत सरकारच्या रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाकडे हा रस्ता वर्ग करण्यात आल्यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी विंचूर प्रकाशा महामार्गावर सटाणा ते मंगरूळ हा रस्ता चौपदरीकरण करण्यासाठी ४३१ कोटी रुपयांना मंजुरी दिली.
गेल्या सहा महिन्यांपासून या महामार्गाच्या कामाला सुरवात झाली आहे. रस्ता चौपदरीकरण करण्यासाठी रस्ता रुंदीकरण करणे, त्यासाठी मध्ये येणारी झाडे काढणे, छोट्या-मोठ्या पुलांची कामे आधीच करणे, एका बाजूचे काम करत असताना दुसरा रस्ता वाहतुकीसाठी खुला ठेवणे अशी सारी कामे वेगाने केली जात असली तरी ज्या मार्गाने वाहतूक चालते त्या रस्त्याची अवस्था सुमार झाल्याने वाहने चालवणे अवघड झाले आहे.
अरुंद आणि त्यात खड्डेमय रस्ता तसेच त्यातून धुळीचे लोळ उठत असल्याने येथील प्रवास त्रासदायक ठरत आहे. काही भागात पाणी मारण्याचा पर्याय अवलंबला जात असला तरी तो पुरेसा ठरत नसल्याचे वाहनचालकांचे म्हणणे आहे.
जुन्या पुलांना मिळणार विश्रांती
लोहोणेर- ठेंगोडा दरम्यान असणाऱ्या ब्रिटिशकालीन गिरणा नदीवरचा पूलही तोडण्यात आला आहे. या पुलाचे आयुष्यमान संपल्याने त्याला पर्याय म्हणून २००८ मध्ये पुलाजवळ दुसरा पूल बांधण्यात आला.
आता महामार्गाची कामे सुरू झाल्याने जुने पूल काढले जात आहेत. देवळ्याच्या कोलती नदीवरील पूल, माळवाडीच्या खाटकी नदीवरील पूल तसेच इतरही काही पूल काढत त्या ठिकाणी नवीन अद्ययावत पुलांची कामे केली जाणार आहेत.
"एनएच ७५२- जी या महामार्गाचे काम सटाणा- मंगरूळ दरम्यान वेगाने सुरू आहे. मात्र खड्डे आणि धूळ तसेच वाहतुकीची कोंडी यामुळे रस्त्यावरून होणारी वाहतूक त्रासदायक ठरली आहे. भूसंपादनाबद्दल असलेला तिढा कायम असून अद्याप त्यांना कोणताही मोबदला मिळालेला नाही. यामुळे शेतकरी कोर्टात जाणार असून हा तिढा सोडवण्यासाठी संबंधितांकडून मोजणी करून मार्ग काढणेही गरजेचे आहे."- विजय पगार, मविप्र संचालक देवळा
"या मार्गावरून प्रवास करणे सध्या अवघड झाल्याने इतर लांबच्या पर्यायी मार्गांचा स्वीकार करतो. यावर वाहतूक सुरळीत होण्यासाठी मार्ग काढण्याची गरज आहे."
- अशोक मोरे, भावडे, देवळा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.