नाशिक : नाशिक शहरात पुरेशा प्रमाणात वाहनतळ (parking) नाहीत. असे असतानाही शहर वाहतूक पोलिसांकडून शहरात अनधिकृत पार्किंग स्थळावरून वाहनांचे टोईंग करीत नाशिककरांच्या खिसा कापण्याचे काम सुरू आहे. याबाबत नाशिककरांमध्ये तीव्र रोष आहे, तर वाहतूक शाखेने नेमलेल्या टोईंग (Towing) ठेकेदारासाठीही नियमांचे पालन बंधनकारक असताना, ठेकेदाराच्या कर्मचाऱ्यांकडून वारंवार नियमांचे उल्लंघन केले जाते. मात्र, त्याकडे पोलिस अधिकारी सोयीस्कर दुर्लक्ष करीत असल्यानेही पोलिस नेमके ‘नागरिकांसाठी की ठेकेदारासाठी’, असा प्रश्न उपस्थित होत आहे. (Violation of rules by towing workers is rampant Nashik News)
शहराच्या मुख्य बाजारपेठ व रस्त्यालगत बेशिस्तपणे वाहने पार्क केली जातात. त्यामुळे वाहतूक कोंडी होऊन सर्वसामान्यांना त्याचा मनस्ताप सहन करावा लागतो. वाहतूक कोंडी आणि वाहनचालकांना शिस्त लागावी, यासाठी नाशिक शहर पोलिस आयुक्तालयाच्या वाहतूक शाखेकडून वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या बेशिस्त वाहनांची टोईंग करण्यासाठी ठेका दिला आहे. मात्र, ठेका देताना ठेकेदाराकडील कर्मचाऱ्यांसाठी काही नियम आहेत. वाहतूक पोलिसांसाठीही काही नियमावली आहे. त्यानुसार, नो-पार्किंगमधील दुचाकी वा चारचाकी वाहनांचे टोईंग करण्यापूर्वी जागेवर माईकद्वारे आवाहन करणे, वाहन टोईंग केल्यानंतर त्या जागेवर वाहतूक शाखेचा संपर्क क्रमांक लिहिणे, वाहनाचे टोईंग करीत असताना, वाहनमालक वा चालक आल्यास जागेवर दंड आकारून वाहनाचा ताबा देणे, टोईंग वाहनांवरील ठेकेदाराच्या कर्मचाऱ्यांचे चारित्र्य पडताळणी करणे, या कर्मचाऱ्यांनी निश्चित केलेला गणवेश परिधान करणे, वाहनचालक वा मालकाशी वाद न घालणे आदी प्रमुख नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.
मात्र, यातील बहुतांशी नियमांची वाहतूक पोलिस आणि टोईंग कर्मचाऱ्यांकडून सर्रासपणे पायमल्ली केली जाते. टोईंग वाहनावर नियुक्तीला असलेले वाहतूक पोलिस वाहनाच्या खाली न उतरताच वाहनांची टोईंग केली जाते. टोईंग कर्मचारी गणवेशात नसतात. तसेच ते वाहनमालक वा चालकाशी अरेरावी करण्याच्या अनेक घटना घडल्या असून, त्या नित्याच्याच झाल्या आहेत. वाहतूक पोलिसाकडून वाहनचालक वा मालकाला गुन्हेगारासमान वागणूक दिली जाते. चारचाकी वाहनांपेक्षा दुचाकी वाहनांची टोईंग करण्याकडे वाहतूक पोलिस शाखेचा व टोईंग कर्मचाऱ्यांचा कल अधिक असल्याने दुचाकीचालकांना नाहक मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे.
ना गणवेश ना अनाऊंसिंग
मेहेर सिग्नल ते अशोक स्तंभ या स्मार्ट रोडवरील दुतर्फा सायकल ट्रॅकवर चारचाकी वाहनांची पार्किंग सर्रासपणे केली जाते. मात्र, या वाहनांवर टोईंगची कारवाई होत नाही, तर याच ठिकाणी दुचाकी पार्क केलेली असेल, तर तत्काळ टोईंग केली जाते. दुचाकीमालक जागेवर येऊनही वाहन सोडले जात नाही. टोईंग करणारे कर्मचारी त्यांच्या गणवेशात नसतात. वाहतूक पोलिस वाहन टोईंग करण्यपूर्वी कोणतीही अनाऊंसिंग करीत नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.