"कोरोना संकटात खाकी वर्दीचा "जोश' हाय ठेवण्यासाठी वेगळे प्रयत्न!"

vishwas-nangre-patil-nashik_.jpg
vishwas-nangre-patil-nashik_.jpg
Updated on

"सद्रक्षणाय खलनिग्रहणाय' या ब्रीदाप्रमाणे पोलिसांवर खऱ्या अर्थाने समाजाच्या संरक्षणाची जबाबदारी आहे. केवळ गुन्हेगारांपासून नव्हे, तर कोरोनासारख्या संकटात सामान्यांच्या रक्षणासाठी रस्त्यावर उतरलेल्या खाकी वर्दीचे मनोबल (जोश) टिकविणे, हे ध्येय असल्याचे पोलिस आयुक्त विश्‍वास नांगरे-पाटील यांनी "सकाळ'शी बोलताना सांगितले. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी संचारबंदीची काटेकोर अंमलबजावणी करीत असलेल्या पोलिसांची परीक्षा पाहत बंदोबस्त ढिला तर पडत नाही ना, याची चाचपणी करीत नांगरे-पाटील यांनी "हाउ द जोश'चा प्रत्यय दिला आहे. यानिमित्त त्यांच्याशी झालेला संवाद. 

खाकी वर्दीचे मनोबल टिकविणे, हे ध्येय 
गुन्हेगारी पलीकडचे उद्‌भवलेले कोरोना संकटाकडे आपण कसे पाहता? 
विश्‍वास नांगरे-पाटील : गुन्हेगारच नव्हे, तर संपूर्ण समाजाच्या रक्षणाची जबाबदारी पोलिसांची आहे. कोरोनामुळे जागतिक संकट मानवजातीवर आले आहे, हे संकट फक्त नाशिक-महाराष्ट्रापुरता वा देशावर आलेले नाही तर सारे जग कोरोनाविरुद्ध लढा देत आहे. त्यामुळे वैश्‍विक संकटावर मात करण्यासाठी सामूहिक जबाबदारीने सामोरे जाण्याची ही वेळ आहे. या संकटावर मात करण्यासाठी खाकी वर्दीतील पोलिस उतरला आहे. संचारबंदी व जमावबंदी लागू झाल्यानंतरही काही नागरिक विनाकारण घराबाहेर येतात. अत्यावश्‍यक सेवा वगळता कोणी बाहेर येऊ नये, अशी अपेक्षा आहे. 

कोरोनाची परिस्थिती हाताळताना कोणकोणत्या उपाययोजना पोलिसांकडून केल्या जात आहेत? 
नांगरे-पाटील : राज्यातच नव्हे, तर देशात संचारबंदी आणि जमावबंदी लागू असल्याने नागरिकांनी स्वतःच होम क्वारंटाइन करून घेणे गरजेचे आहे. त्यासाठी शहरभर नाकाबंदी केली आहे. आयुक्तालय हद्दीत 65 पोलिस चौक्‍यांच्या ठिकाणी ध्वनिक्षेपक लावून नागरिकांना सूचना देण्यात येत आहेत. गर्दीवर लक्ष ठेवण्यासाठी ड्रोनचा वापर सुरू आहे. सुरवातीचे काही दिवस वगळता नागरिकांनाही या संकटाची तीव्रता लक्षात आली आहे. त्याचा सकारात्मक परिणाम दिसत आहे. 24 तास सुरू असलेल्या पोलिस नियंत्रण कक्षाकडे माहिती येत असते. 

तरीही पोलिसांना कायद्याचा बडगा उगारावाच लागतो आहे? 
नांगरे-पाटील - शहरातील एकूण परिस्थिती पाहता पोलिसांना खूप कमी कारवाई करावी लागत आहे. पोलिसांच्या मदतीला काही स्वयंसेवकही आहेत. पोलिसांनी आतापर्यंत दोन हजार 336 जणांना पास दिले आहेत. जुने नाशिक, मुंबई नाका या गर्दीच्या ठिकाणी बारकाईने लक्ष ठेवण्यासाठी स्वतंत्र सहाय्यक पोलिस आयुक्त समीर शेख यांची नियुक्ती केली आहे. विनाकारण घराबाहेर पडणारे, वाहनचालकांवर संचारबंदीचे उल्लंघन केल्याचे गुन्हे दाखल केले आहेत. सुमारे पावणेदोनशे वाहने जप्त केली आहेत. 

मॉर्निंग वॉक करणाऱ्यांनाही आपण धडा शिकवला? 
नांगरे-पाटील - संचारबंदीत घराबाहेर न येणे अपेक्षित आहे. तोंडाला मास्क लावून सकाळी फिरायला वा रनिंगला जाणे गैर आहे. त्यामुळे मॉर्निंग वॉक करणाऱ्यांनाही सूचना दिल्या. त्यानंतर काही कायदेशीर कारवाया केल्या आहेत. काही ज्येष्ठ नागरिक चौकातील वा उद्यानात बाकावर बसतात, ते टाळण्यासाठी बाकांवर ऑइल वा डांबर टाकण्यात आले. सुरक्षित अंतर महत्त्वाचे आहे. 

पोलिसांचे मनोबल टिकून राहण्यासाठी काय केले जात आहे? 
नांगरे-पाटील - पोलिसही माणूस आहे. त्याचेही कुटुंब आहे. तेही नाकाबंदीतून घरी जातात. त्यामुळे त्यांच्याही संरक्षणाची जबाबदारी महत्त्वाची असून, त्यांचे मनोबलही टिकविण्याचे ध्येय आहे. त्यासाठी वेल्फेअरच्या माध्यमातून प्रत्येक पोलिस कर्मचाऱ्यास सॅनिटायझर, मास्क दिले आहे. पोलिस मुख्यालयात स्वच्छता, फवारणी केली आहे. कुटुंबीयांकडे व्हिटॅमिन सीच्या गोळ्या, होमिओपॅथीच्या गोळ्या दिल्या आहेत. मंगळवार (ता. 14)पर्यंत लॉकडाउन आहे. यास नागरिकांनी 100 टक्के सकारात्मक प्रतिसाद दिला, तर कोरोनावर मात करणे शक्‍य आहे, त्यासाठी पोलिसांना आणखी कठोर अंमलबजावणी करण्याची वेळ येणार नाही, अशी अपेक्षा आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.