नाशिक / मालेगाव कॅम्प : लाखो मल्हारभक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीक्षेत्र चंदनपुरीच्या खंडोबानगरीला लॉकडाउनचा मोठा फटका बसला. यामुळे पूजासाहित्य, नारळ विक्रेते, वाघ्या, मुरळी यांच्यासह छोट्या व्यावसायिकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर झाला आहे. बानूबाईच्या चंदनपुरीत पुन्हा येळकोट येळकोट जय मल्हारचा गजर कधी सुरू होतो, याची कसमादेसह खानदेशवासीयांना प्रतीक्षा आहे. तीन महिन्यांपासून मंदिर बंद असल्याने गावाचे अर्थचक्र मंदावले आहे.
बंदमुळे सर्वांनाच झळ
चंदनपुरी (ता. मालेगाव) येथे राज्याच्या अनेक भागांसह गुजरातमधील भाविक दर्शनास येतात. यात्रेनंतर लग्नसराईत गोंधळ व दिवट्या- बुधल्याचे कार्यक्रम होतात. यानिमित्त खंडोबारायाचा जागर करत मंगळवार, शुक्रवार, रविवारी या दिवशी मोठे भाविक येतात. जानेवारी ते मेदरम्यान प्रत्येक रविवारी 40 ते 50 हजार भाविक गोंधळाच्या कार्यक्रमानिमित्त येथे येतात. लॉकडाउनमुळे गावातील चारशे कुटुंबांचे अर्थकारण बिघडले आहे. हातावर पोट असलेल्या अनेकांना बानूबाईच्या चंदनपुरीत मोलमजुरी व छोटी- मोठी कामे मिळतात. मात्र तीन महिन्यांतील बंदमुळे सर्वांनाच झळ बसल्याने कुटुंबाचे आर्थिक गणित बिघडले आहे.
उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण
लग्न जमलेल्या नवरदेवाचा गोंधळाच्या कार्यक्रमानिमित्त एका कुटुंबासमवेत चारशे ते पाचशे नातेवाईक येतात. स्थानिक युवक जय मल्हार रिसॉर्टसह शेड उभारत ठोक कार्यक्रम करून देतात. त्यामुळे खासगी शेडलाही मोठी मागणी असते. पूजासाहित्य, बेलभंडारा, नारळ, पाणी जार, स्वयंपाकाची भांडी, कार्यक्रमाचे शेड, मंडप, कारागीर, वाघ्या- मुरळी यांसह हॉटेल व्यावसायिकांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला.
लॉकडाउनमधून बाहेर पडण्यास किती वेळ लागेल?
प्रत्येक नारळ विक्रेत्यांचे 50 हजारांवर, तर वाघ्या- मुरळींचे 25 ते 30 हजारांचे नुकसान झाले आहे. बहुतांश छोट्या व्यावसायिकांची आठवड्याभरातील कमाई रविवारच्या उत्पन्नातून होते. त्यामुळे येणाऱ्या काळात हातावर पोट असलेल्या कुटुंबीयांसह पुजारी, मंदिर ट्रस्ट व ग्रामपंचायतीला लॉकडाउनमधून बाहेर पडण्यास किती वेळ लागेल, हे सांगता येत नाही.
लॉकडाउनचा फटका बसलेले घटक
नारळ, पूजासाहित्य विक्रेते 50
वाघ्या मुरळी संच 45
शेड, खासगी जागा 20
मंडप व इतर साहित्य 20
पाणी जार 4
स्वयंपाकाची भांडी केटरर्स 10
हॉटेल 15
यात्रेनंतरचा काळ महत्त्वपूर्ण असतो. या कालावधीत दिवट्या- बुधल्या व गोंधळ हेच खरे उत्पन्नाचे स्त्रोत असते. या कार्यक्रमास हजारो भाविक येतात. पूजासाहित्य व नारळाची मोठी विक्री होते. तीन महिन्यांत या व्यवसायावर परिणाम झाला आहे. - मधुकर अहिरे, नारळ विक्रेते, चंदनपुरी
परंपरा व संस्कृती जोपासताना भगवंताचा जागर केला जातो. गोंधळाच्या कार्यक्रमास वाघ्या-मुरळीचे महत्त्व आहे. लॉकडाउनमध्ये या कलेवर उपजीविका करणाऱ्या दोनशे कुटुंबीयांना फटका बसला आहे. - गुलाब कसेकर, वाघ्या, चंदनपुरी
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.