Water Crisis : लासलगावसह 16 गावांचा पाणीप्रश्न पेटला! 22 ते 25 दिवसांपासून पाणीपुरवठा बंद
Water Crisis : विंचूर लासलगावसह सोळा गाव पाणीपुरवठा योजनेच्या ढिसाळ नियोजनामुळे नागरिकांचे पाण्यासाठी होत असलेले हाल आणि गढूळ पाणीपुरवठा प्रकरणी निफाड तालुका पूर्व शिवसेनाप्रमुख प्रकाश पाटील यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारींना पत्र व्यवहार करत महाराष्ट्र दिनापासून बेमुदत उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.
समितीच्या ढिसाळ नियोजनामुळे अनेक गावांना २० ते २५ दिवसांपासून पाणीपुरवठा बंद आहे. (Water crisis of 16 villages including Lasalgaon Water supply off from 22 to 25 days nashik news)
श्री. पाटील यांनी दिलेल्या पत्रानुसार लासलगाव- विंचूरसह सोळा गाव योजनेचा पाणीपुरवठा सध्या खूप विस्कळित झाला आहे. ऐन मार्च- एप्रिल महिन्यात ऊन वाढत असून शिवाय सर्वधर्मीयांचे धार्मिक सण उत्सव सुरू होते.
या काळात लासलगावचा पाणीपुरवठा पुन्हा विस्कळित होत होता. तब्बल वीस ते बावीस दिवस झाले, तरीही पिण्यासाठी पाण्याचा पुरवठा केला जात नाही. कोणतेही कारण नसताना जनतेला पाण्यासाठी वेठीस धरण्याचा प्रकार समिती व सचिव करत आहे.
पालकमंत्री दादा भुसे यांच्याकडे २५ सप्टेंबर २२ ला पाणीपुरवठा नियोजनासंदर्भात कैफियत मांडली होती. त्यावर ऑक्टोबर २०२२ मध्ये या योजनेची पाहणी करून त्यांनी सूचना केल्या होत्या. त्यानंतर किमान पाच- सहा दिवसाआड पाणीपुरवठा सुरु होता, तोही अशुद्धच होता.
जलशुद्धीकरण केंद्रही दुर्लक्षित
विंचूरसह सोळा गाव पाणीपुरवठा देखभाल दुरुस्ती करणाऱ्या समितीकडून नांदुरमध्यमेश्वर धरणातून येणाऱ्या पाण्याचे विंचूर येथील जलशुद्धीकरण केंद्रात प्रक्रिया होऊ शकते. अत्याधुनिक यंत्रसामुग्रीने परिपूर्ण असूनही त्याचा कुठल्याही प्रकारे वापर होत नसल्याने तेही बंद स्थितीत आहे. त्यामध्ये प्रमुख आलम व टिसीएल पावडर मिक्सरबंद आहे.
हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार
पाण्यासाठी सेटलमेंट टँक (मिक्सर) बंद आहे. जलशुध्दीकरणासाठी वापरली जाणारी वाळू देखील अनेक वर्षापासून बदलेली नसल्यामुळे फिल्टर बेड देखील खराब झाले आहे. बॅकवॉश वॉटरचे उपकरण व क्रोलींग गॅस युनिट बंद आहे.
वरील कारणांसाठी वापरले जाणारे वीजपंप देखील धूळखात पडून आहेत. त्यामुळे लासलगाव, विंचूरसह सोळा गाव देखभाल दुरुस्ती समितीकडून राजरोसपणे नागरिकांना अशुद्ध पाण्याचा पुरवठा केला जात आहे असे श्री. पाटील यांनी म्हटले आहे.
समितीच बरखास्त करावी
वीस ते बावीस दिवसाआड होणाऱ्या या अशुद्ध पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरू आहे. सध्या नागरिकांना ऐन उन्हाळ्यात पिण्याच्या पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. विकतचे पाणी घेऊन आपली तहान भागवावी लागत आहे.
लासलगाव विंचूरसह सोळा गाव पाणीपुरवठा देखभाल दुरुस्ती योजना समितीचे पदाधिकारी याकडे अक्षम्य दुर्लक्ष करत आहेत.
चौकशी करून ही समिती बरखास्त करावी तसेच कामात दिरंगाई करणाऱ्या समितीच्या सचिवांवर कडक कारवाई करावी व नवीन अधिकारी नेमणूक करून नागरिकांना शुध्द पिण्याच्या पाण्याचा पुरवठा नळाव्दारे किमान दिवसा आड करावा अशी मागणी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.
पिण्याच्या पाण्यासाठी त्रस्त असलेल्या नागरिकांतर्फे तसेच आम्ही आपणास ३ एप्रिलला प्रत्यक्षात भेटून पत्रक देऊन कळकळीची विनंती केली होती. आज २५ ते २६ दिवस उलटूनही आपण आमच्या तक्रारीची गांभीर्यपूर्वक दखल घेतलेली नाही, असे आमच्या निदर्शनास आले आहे.
त्यामुळे एक मे २०२३ ला महाराष्ट्र दिनी सकाळी अकराला लासलगाव ग्रामपंचायत कार्यालय आवारात शुध्द पिण्याच्या पाण्याच्या समस्या सुटेपर्यंत बेमुदत उपोषणाला बसण्याचा इशारा शिवसेनेचे निफाड तालुकाप्रमुख प्रकाश पाटील यांनी दिला आहे.
पत्राची प्रत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री दादा भुसे, केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. भारती पवार, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री, राज्य आरोग्यमंत्री, गटविकास अधिकारी, पंचायत समिती निफाड, लासलगाव पोलिस, पाणीयोजनेचे अध्यक्ष व सचिव यांनाही देण्यात आले आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.