पंचवटी (नाशिक) : काही काळ उसंत घेतलेल्या पावसाचे कालपासून गंगापूर धरणसमुहाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पुनरागमन केलेल्या पावसामुळे गोदावरी नदीपात्रात तब्बल तीनवेळेस पाण्याचा विसर्ग करण्यात आला. त्यामुळे यंदा नदीच्या पाणीपातळीत तिस-यांदा मोठी वाढ झाली आहे. प्रशासनाने नदीकाठी खबरदारीचा इशारा दिला असून त्यामुळे टप-या हलविण्यासाठी विक्रेत्यांची लगबग सुरू होती. दरम्यान रामसेतूच्या कमानीपर्यंत पुराचे पाणी पोहोचल्यावर खबरदारी म्हणून प्रशासनाने हा पूल नागरिकांसाठी बंद केला होता तर गाडगे महाराज पुलावर पूर पाहण्यासाठी मोठी गर्दी उसळली होती.
गत आठवड्यापासून सुरू असलेल्या पावसामुळे पाण्याच्या पातळीत तिस-यावेळी वाढ झाली आहे. त्यामुळे आज सकाळपासूनच नदीकाठच्या व्याववसायिकांची टप-या व अन्य व्यवसाय हलविण्याची लगबग सुरू होती. दुपारनंतर पाणीपातळीत मोठी वाढ झाली. त्यामुळे सांडव्यावरील सर्व वाहतूक पुलांवरून सुरू झाली. पूर पाहण्यासाठी आलेले नागरिक, बुधवारचा आठवडे बाजार व मोठ्या प्रमाणावरील वाहनांमुळे गाडगे महाराज पुलावर वाहतुकीची मोठी कोंडी झाली होती. वाहतुकीच्या कोंडीमुळे पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला.
टपऱ्या हलविण्याची लगबग
गंगापूर धरणातून आठ वाजता प्रथम पाण्याचा विसर्ग सुरू झाल्यावर सकाळी दहानंतर पाणीपातळीवर वाढ होण्यास सुरवात झाली. त्यामुळे मनपासह पोलिसांची वाहनांनी गस्त वाढवत नदीकाठच्या व्यावसायिकांना सुचना केली. त्यानंतर अनेक व्यावसायिकांची टप-या हलविण्यासाठी लगबग सुरू होती.
नागरिकांसाठी रामसेतू बंद
पुराचे परिमाण समजल्या जाणा-या दुतोंड्या मारूतीच्या छातीपर्यंत पाणी पोहोचल्याने महापालिकेसह पोलिसांची गस्ती वाहने नदीकाठच्या नागरिकांना सुरक्षिततेसाठी सतर्कतेचा इशारा देत गस्त घालत होती. सायंकाळी पाचनंतर पुराच्या लाटा रामसेतू पुलावर आदळू लागल्यावर खबरदारी म्हणून प्रशासनाने हा पूल वाहतुकीसाठी बंद केला, तरीही अनेक उत्साही पोलिसांची नजर चुकवत पुलावर जाण्याचा प्रयत्न करत होते.
जागा मिळेल तेथे आठवडे बाजार
गंगाघाटावर दर बुधवारी आठवडे बाजार भरतो. कोरोना संसर्गामुळे प्रशासनाने विरोध केल्याने जवळपास वर्षभर हा बाजार बंदच होता. गेल्या महिन्यापासून हा बाजार पुन्हा बहरू लागला होता. परंतु आज पुराचे पाणी थेट मरिमाता मंदिरापर्यंत पोहोचल्याने अनेक व्यावसायिकांनी जागा मिळेल, त्याठिकाणी व्यवसाय करण्यास पसंती दिली. विशेष म्हणजे भाज्यांना फारशी मागणीही नव्हती.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.