Nashik Water Cut : महापालिकेने जलसंपदा विभागाकडे ६१०० दशलक्ष घनफूट पाणी आरक्षणाची मागणी केली. परंतु गोदावरी पाटबंधारे विभागाने आरक्षणावर आक्षेप घेतल्यानंतर ५३०४ दशलक्ष घनफूट पाणी आरक्षण उपलब्ध करून दिले जाणार आहे.
परंतु गत पाणी आरक्षण वर्षात शहरासाठी ५७५० दशलक्ष घनफूट पाणी देण्याची शक्यता निर्माण झाल्याने नाशिककरांवरचे पाणीकपातीचे संकट पुढे ढकलले जाणार आहे. (water resources department will provide 5304 million cubic feet of water reservation in nashik news)
नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात पुरेसा पाणीसाठा पावसाळ्यात जमा झाला होता. परंतु जायकवाडी धरणात पाण्याची तूट निर्माण झाल्याने नाशिक व नगरच्या धरणातून पाणी सोडण्याच्या सूचना गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळाने दिल्या. मेंढीगिरी समितीच्या अहवालानुसार नाशिक व नगरच्या धरणांमधून जायकवाडीसाठी ८.६ टीएमसी पाणी सोडण्याचे आदेश दिले.
त्यानुसार पाणी सोडण्यात आले. १५ ऑक्टोबर २०२३ ते ३१ जुलै २०२४ या कालावधीसाठी महापालिकेने गंगापूर धरण समूहातून ४४००, मुकणेतून १६०० तर दारणेतून १०० अशाप्रकारे एकूण ६१०० दशलक्ष घनफूट पाणी आरक्षणाची मागणी महापालिकेकडून नोंदविण्यात आली होती. परंतु त्यामुळे नाशिककरांच्या आरक्षित पाण्यावर संकट आले. जिल्हाधिकाऱ्यांच्या पत्रानुसार ५,३०४ दशलक्ष घनफूट पाणी आरक्षण देण्याची भूमिका जलसंपदा विभागाने घेतली.
त्यामुळे नाशिककरांवर पाणी संकट अटळ राहणार असून, महापालिका प्रशासनानेदेखील उन्हाळ्याच्या शेवटपर्यंत पाणी जपून वापरण्यासाठी पंधरा टक्के कपातीचा निर्णय घेतला. सकाळ व सायंकाळ पाणीपुरवठ्यात पंधरा टक्के कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. डिसेंबरपासून आठवड्यातील दर शनिवारी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा प्रस्ताव पाणीपुरवठा विभागाने आयुक्तांच्या मान्यतेसाठी सादर केला.
त्यानुसार कारवाई सुरू होत असतानाच राजकीय दबावाला सामोरे जावे लागले. त्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांची भेट घेत किमान मागील वर्षी ५७५० दशलक्ष घनफूट पाणी वापरले तेवढे देण्याची विनंती केली. सदरची विनंती मान्य होण्याची शक्यता आहे. त्यामुळे डिसेंबरपासून पाणीकपातीचे नियोजन करणाऱ्या महापालिका प्रशासनाला दिलासा मिळणार असून उन्हाळ्याच्या अखेरीस पाणीकपात होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.