नाशिक : नाशिक एज्युकेशन सोसायटीने आपल्या २२ शाळांमधील २२ हजार विद्यार्थ्यांमध्ये जलबचतीचा संस्कार रुजवलाय. कोरोनाकाळातील दोन वर्षांचा अपवाद वगळता २२ मार्च २००३ पासून अव्याहतपणे ‘जलसाक्षरता अभियान’चा यज्ञ चाललाय. या संस्थेतील प्रत्येक जलदूत विद्यार्थी दिवसाला पाच लिटर याप्रमाणे एक लाख दहा हजार लिटर पाण्याची बचत करत आहेत.
आपणाला बँकेचे पासबुक ठाऊक आहे. त्याचधर्तीवर संस्थेने प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी ‘पाणीबचत बँकबचत पुस्तिका’ तयार केली आहे. त्यासाठी प्रत्येक महिन्यातील दिवस आणि वारनुसार पाणीबचतीचा तपशील त्यात नोंदवायचा. विशेष म्हणजे, पाल्यांच्या उपक्रमात पालकांचाही सहभाग घेण्यात आला असून, दिवसनिहाय पालकांनी त्यावर स्वाक्षरी करायची आहे. संस्थेचे माजी अध्यक्ष तथा माजी आमदार (स्व.) बापूसाहेब उपाध्ये यांचे पाण्याविषयीचे कार्य सर्वश्रुत आहे. (Water Saving Sanskar of Nashik Education 22 thousand students participated Nashik News)
त्यांचा संस्थेच्या सीडीओ मेरी शाळेच्या स्थापनेत पुढाकार राहिला. या शाळेच्या २००३ मधील रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त बापूसाहेबांच्या स्मृतीनिमित्त संस्थेचे अध्यक्ष प्रा. सूर्यकांत रहाळकर यांच्या कल्पनेतून आणि त्यांच्या नेतृत्वाखाली जलसाक्षरता अभियानाची मुहूर्तमेढ राज्यात पहिल्यांदा संस्थेत रोवली गेली. जलसाक्षरता उपक्रम विद्यार्थी, शाळा आणि घरापुरता मर्यादित राहू नये, इतरांनी जलबचतीच्या चळवळीत सहभागी व्हावे, यासाठी गेल्या १९ वर्षांमध्ये करण्यात आलेले प्रयत्न फलद्रुप झाले आहेत.
ऊर्ध्व गोदावरी जल सहभागीताच्या माध्यमातून जलसाक्षरताविषयक प्रशिक्षण पहिल्यांदा पदाधिकारी, नंतर शिक्षक व मग शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना देण्यात आले. पुढे २५ हजार विद्यार्थ्यांना हे प्रशिक्षण दिले गेले. संस्थेच्या माध्यमातून दर वर्षी विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले जाते. त्यामध्ये पाण्याची बचत कशी करावी, पाण्याचा वापर काटकसरीने कसा करावा, पाणी कधीही शिळे होत नसल्याने फेकून देऊन वाया घालवू नये आदी बाबींचा त्या प्रशिक्षणात समावेश असतो. चळवळीत सहभागी झालेले जलदूत शाळेच्या आवारात, आपण राहत असलेल्या भागामध्ये, घरामध्ये पाण्याची बचत कशी होईल, यादृष्टीने प्रयत्न करत आहेत.
जलदूत राहत असलेल्या भागात पाण्याचा अपव्यय होत असल्याचे निदर्शनास आल्यावर ते संबंधितांचा संपर्क क्रमांक घेऊन येतात. त्यावर शिक्षक संपर्क साधून पाण्याच्या बचतीविषयीची विनंती करतात. नळ तुटला असला, की विद्यार्थी सांगतात आणि त्यानुसार नळ ठीक केला जातो. हे कमी काय म्हणून, पर्यावरणाशी जलबचतीची चळवळ जोडण्यात आली आहे. शाळेत येताना ‘वॉटर बॅग’मधून आणलेले पिण्याचे पाणी उरल्यावर विद्यार्थी शाळेतील अथवा घराजवळील झाडांना घालतात.
शाळांमध्ये शाळा सुरू होण्यापूर्वी, मधल्या सुटीत, शाळा सुटताना जलदूत नळाजवळ उभे राहतात आणि पाण्याचा अपव्यय होणार नाही, याची काळजी घेतात. खरे म्हणजे, बालवाडीमधील चारशे विद्यार्थ्यांमध्ये जलबचतीचा संस्कार कसा रुजवायचा, हे आव्हान शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमध्ये होते. पण आपली मोठी भावंड करत असलेल्या कृतीच्या अनुकरणातून हे आव्हान सहजगत्या पेलता आले.
पूरक उपक्रमांची मांदियाळी
मेरी शाळेत चौथे राज्यस्तरीय जल साहित्य संमेलन घेण्यात आले होते. त्या वेळी पाण्यावर काम करणाऱ्या राज्यभरातील कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देत असताना जलदूतांच्या जलसाक्षरता अभियानाची माहिती त्यांना देण्यात आली होती. तसेच नाशिक एज्युकेशन सोसायटीतर्फे जलबचतीविषयीची चित्रकला स्पर्धा घेण्यात येते. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांचे चित्रांचे प्रदर्शन भरवले जाते. याशिवाय निबंध स्पर्धा घेण्यात येते. शंभर वर्षांहून अधिक वर्षांची परंपरा असलेल्या गो. ह. देशपांडे वक्तृत्व स्पर्धेतील विषयांमध्ये जलबचतीचे दोन विषय देण्यात येतात. याशिवाय प्रत्येक शाळेतून पाच विद्यार्थी आणि पाच विद्यार्थिनींची दर वर्षी उत्कृष्ट जलदूत म्हणून निवड केली जाते आणि त्यांचा सन्मान शाळेच्या स्नेहसंमेलनात केला जातो. या साऱ्या उपक्रमात संस्थेतील ७५० शिक्षक-शिक्षकेतर योगदान देतात.
पाण्याची आवश्यकता
(दिवसाला प्रत्येकाला लिटरमध्ये)
- ग्रामीण भाग - ५५
- शहरी भाग - दहा लाखापर्यंत लोकसंख्या-१३५ आणि दहा लाखांहून अधिक लोकसंख्या- १५०
(निवृत्त अधीक्षक अभियंता प्रकाश नंदनवरे यांनी दिलेली माहिती)
जल हेच जीवन!
जलं हि प्राणिनः प्राणाः
संस्कृतमधील जलविषयक हा श्लोक आहे. अर्थात, जल हे सजीवांचे जीवन आहे.
"दिवाळीच्या सुटीनंतर संस्थेतील प्रत्येक वर्गातील तीन विद्यार्थी आणि तीन विद्यार्थिनींची जलदूत म्हणून निवड करत त्यांच्या माध्यमातून पाणीबचत बँकेची बचत पुस्तिका संस्थेतील प्रत्येक जलदूतांपर्यंत पोचविण्यात येईल. जलसाक्षरता अभियानात सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांकडून ही पुस्तिका जमा करण्यात येईल. त्यातून १ एप्रिल २०२३ ला होणाऱ्या संस्थेच्या शतक महोत्सवामध्ये विद्यार्थ्यांचा आणि त्यांना प्रोत्साहन देणाऱ्या शिक्षकांचा गौरव केला जाणार आहे."
- प्रा. सूर्यकांत रहाळकर, अध्यक्ष, नाशिक एज्युकेशन सोसायटी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.