Water Crisis : यंदा अक्षरशः शेतातील पिके सडेपर्यंत पाऊस पडला तरीही ब्रिटिशकालीन दुष्काळी असलेल्या येवलेकरांची टंचाईची साडेसाती मात्र थांबलेली नाही. मार्चपासूनच तालुक्यात टंचाईचे ढग जमले असून सोमवारपासून (ता.१७) तब्बल आठ गावे व तीन वाड्यांना टॅंकरने पाणीपुरवठा सुरू झाला आहे.
वाढत्या उन्हासोबत टंचाई वाढत चालल्याने ही संख्या ५० वर पोचणार आहे. (water shortage despite record rainfall Water being supplied by tankers at yeola nahsik news)
यंदाच्या पावसाळ्यात ऑगस्टच्या मध्यानंतर टॉप गिअर टाकलेल्या पावसाने ऑक्टोबरपर्यंत ढगफुटीचे अनुभूती वेगवेगळ्या गावात शेतकऱ्यांना दिली. यामुळे पावसाच्या नुकसानीचे नवे आकडेही यंदा पाहायला मिळाले.
कधीकधी तालुक्याला वार्षिक पर्जन्याची सरासरीही गाठणे कठीण होते इतका अल्प पाऊस पडतो. यावेळी मात्र ४९३ मिलिमीटर वार्षिक सरासरी असताना तब्बल ७२४ मिलिमीटर (१४६ टक्के) पाऊस पडला आहे.
यामुळे यंदा टंचाईची शक्यता कमी होती, परंतु पावसाळा उघडला अन् शेतीसाठी पाण्याचा उपसा सुरू झाला तोच डिसेंबरनंतरच अवर्षणप्रवण उत्तर पूर्व भागातील विहिरी कोरड्या होऊ लागल्या होत्या. किंबहुना या भागातील अनेक शेतकऱ्यांना पिके जगविण्याची नामुष्की ओढवून विकत पाणी घ्यावे लागले होते.
पाण्यासाठी भटकंती सुरू
मार्चपासून अनेक भागात टंचाईचा वनवा पेटू लागला, अनेक वाड्यांवस्त्यांवर पाण्यासाठी भटकंती सुरू झाली होती. किंबहुना मार्चमध्येच पाण्याचे टँकरचे प्रस्ताव येऊ लागले होते. प्रशासनाच्या दिरंगाईमुळे या प्रस्तावाला तब्बल दोन आठवड्यापर्यंत मंजुरीला उशीर झाला आहे.
माजी मंत्री छगन भुजबळ यांनी देखील नाराजी व्यक्त करत प्रस्ताव तत्काळ मंजूर करावेत अशी मागणी केली होती. या सर्व पार्श्वभूमीवर अखेर टँकर मंजूर झाले असून तहानलेल्या गावांना टँकरचे पाणी सुरू झाले आहे.
हेही वाचा : What Is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’
ममदापूर गावाला सर्वाधिक झळ
तालुक्यातील नेहमीच टंचाईच्या वनव्यात भाजणाऱ्या उत्तर पूर्व भागातील आहेरवाडी, जायदरे, चांदगाव, ममदापूर, खरवंडी, देवदरी, वसंतनगर, गोरखनगर या आठ गावांसह ममदापूर तांडा, अनकाई येथील चव्हाण व भगत वस्ती तसेच गोरे व बोराडे वस्ती या ठिकाणी वस्त्यांवर टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू झाला आहे.
यासाठी सहा शासकीय टॅंकर प्रशासनाने मंजूर केले आहेत. या ११ ठिकाणी रोज १७ खेपाद्वारे पाणीपुरवठा केला जाणार आहे. ममदापूर गावाला सर्वाधिक झळ असल्याने येथे रोज तीन खेपाद्वारे पाणीपुरवठा केला जाणार आहे.
शहरालगतच्या नांदूर येथील विहिरीवरून हे टँकर भरून पाणीपुरवठा होईल. अजूनही तालुक्यातील ११ गावे व तीन वाड्यांचे प्रस्ताव पंचायत समितीकडे आले असून संयुक्त पाहणीनंतर सदरचे प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आले आहेत. या प्रस्तावांना वेळेत मंजुरी देऊन टंचाईत दिलासा द्यावा अशी मागणी होऊ लागली आहे.
"‘एकीकडे अनेक गावांमध्ये पाणीटंचाईची तीव्रता वाढत असताना टंचाई व टँकर मंजुरीचे ठोस निर्णय होत नाही. नागरिकांना पिण्याचा पाण्याचा पुरवठा करता येत नाही ही अतिशय गंभीर बाब असून नागरिक पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहत आहे. त्यामुळे टँकर मंजुरीचे अधिकार उपविभागीय अधिकारी (प्रांत) यांना द्यावे व वेळेत मागणी झालेल्या गावात पाणीपुरवठा करावा."
- छगन भुजबळ, माजी मंत्री
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.