नाशिक : शहर-जिल्ह्यात चोवीस तासात जिल्ह्यात सरासरी ६२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, पेठ या आदिवासी तालुक्यात अतिवृष्टी झाली. या पावसामुळे धरणसाठ्यात समाधानकारक वाढ झाली. नाशिकला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूरमध्ये १३ टक्क्यांनी वाढ होऊन साठा ५० टक्क्यांपर्यंत पोचला. दारणा धरण ७३ टक्के भरल्याने विसर्ग सुरु झाला. तसेच कसारा घाटात मध्यरात्री दरड कोसळल्याने मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प झाली. (water storage in dams in Nashik district increased due to average 62 mm rain in 24 hours)
मॉन्सून पुन्हा सक्रीय झाल्याचा फायदा भूजल पातळी वाढण्यासोबत धरणसाठा वाढण्यासाठी झाला आहे. पिण्याच्या पाण्यासाठी पावसाची मदत झाली आहे. रेल्वेमार्गावर ठिकठिकाणी दरड कोसळल्याने कर्जत मार्गावर काही ठिकाणी रेल्वे पूलाखालील खडी वाहून गेली. परिणामी, कर्जत मार्गावरील वाहतूक ठप्प होती. आठवड्यात दुसऱ्यादा दरड कोसळली. मध्य रेल्वेच्या मार्गावर आठवड्यात दुसऱ्यांदा दरड कोसळली. त्यामुळे मुंबई-नाशिक दरम्यान रेल्वेसेवा ठप्प झाली. कल्याण-कसारा मार्गासोबत कर्जत मार्गावर कोशाने गेट नंबर २५ जवळ रेल्वेरुळाखालील खडी वाहून गेली. या मार्गावरील विजेचे खांब उन्मळले.
खरिपाच्या पेरण्यांना वेग
ऐन पावसाळ्यात वरुणराजाने दडी मारल्याने खरिपाच्या पेरण्या झाल्या नव्हत्या. अपुऱ्या पावसामुळे दुबार पेरणीचे संकट उदभवले होते. अशा परिस्थितीत कृषी विभागातर्फे जमिनीत ओल झाल्याखेरीज पेरण्या करु नयेत, असा सल्ला शेतकऱ्यांना देण्यास सुरवात झाली होती. मात्र अलिकडच्या आणि २४ तासातील पावसामुळे खरिपाच्या पेरण्यांना वेग येणार आहे. शिवाय उगवणीच्या अवस्थेत पोचलेल्या पिकांना पावसाचा फायदा होईल. आदिवासी भागात पावसाने सातत्य राखल्याने भाताच्या रोपांची पुनर्लागवडीला वेग येईल.
दारणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरु असून पाणीसाठा आज सकाळी ७३ टक्के झाल्याने दारणातून विद्युत गृहाद्वारे आज सकाळी दहाला ५५० क्यूसेक्स विसर्ग सुरु करण्यात आला आहे. पाऊस सुरु राहिल्यास व पाणीसाठ्यात आणखी वाढ झाल्यास दारणा जलाशयाचे रेडियल गेटमधून आणखी विसर्ग करण्यात येईल. गंगापूर धरणातील पाणीसाठा वाढून आठवड्यातून एक दिवस पाणीकपातीचे संकट टळण्यास मदत होणार आहे.
धरणसाठा आणि साठ्याची टक्केवारी
(साठा दशलक्ष घनफूटामध्ये)
धरण - जलसाठा टक्के
गंगापूर - २ हजार ७९९ ५०
काश्यपी - ५३८ २९
गौतमी - गोदावरी - ५८६ ३१
आळंदी - ३२१ ३९
गंगापूर समूह - ४ हजार २४४ ४२
दारणा - ५ हजार २४० ७३
तालुकानिहाय २४ तासात झालेला पाऊस
(आकडे मिलीमीटरमध्ये)
तालुका- पाऊस
नाशिक - १९.०
इगतपुरी - २४०.०
दिंडोरी - २६.०
पेठ - ३१५.०
त्र्यंबकेश्वर - २१६.०
मालेगाव -१२.०
नांदगाव - २.०
चांदवड - २.०
कळवण - २२.०
बागलाण - २.०
सुरगाणा - ४५.३
देवळा - ४.१
निफाड - १६.१
सिन्नर - १०.०
येवला - ३.०
(water storage in dams in Nashik district increased due to average 62 mm rain in 24 hours)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.