Nashik Water Crisis : साडेसाती नशिबीच पुजलेल्या येवल्यात ३२ गावे व १५ वाड्यावस्त्यांची तहान भागविण्यासाठी टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. एप्रिलमध्ये सुरू झालेला टँकरच्या पाणीपुरवठ्याचा सलग आठवा महिना सुरू झाला आहे.
किंबहुना वाढत्या उन्हासोबत साठा आटू लागल्याने गावोगावी टंचाई अधिकच तीव्र होऊ लागल्याने येणाऱ्या दिवसांची चिंता नागरिकांना लागली आहे. (Water supply by tanker since 8 months In yeola 47 villages quench their thirst on tanker water crisis nashik)
ब्रिटिशकालीन दुष्काळी असलेल्या येवला तालुक्यात यंदा पर्जन्यमानाने धोका दिला. जून ते डिसेंबरची वार्षिक सरासरी ५४४ मिलिमीटर असताना, अवघा ४२५ मिलिमीटर पाऊस झाल्याने तालुक्यात खरिपाचा वनवा पेटून पालापाचोळा झाला आहे.
यंदा केवळ पावसाच्या सरी कोसळल्याने भूजल पातळीत मोठी घट झाली. पूर्व भागात चारही महिने विहिरींना पाणी न उतरल्याने खरिपाची पूर्ण वाट लागली. तालुक्यात दरवर्षीच टंचाईच्या झळा अल्प पावसामुळे डिसेंबरपासूनच जाणवतात. कितीही चांगला पाऊस झाला, तरी मार्चपासून टँकरने पाणीपुरवठा करावाच लागतो.
२०२१ मध्ये धो-धो पाऊस झाल्याने तालुक्याची पाण्याची परिस्थिती चांगली होती. परिणामी २०२२ मध्ये मार्चपासून टँकरची मागणी सुरू झाली. त्यावेळी प्रशासनाने चालढकल करत ११ एप्रिलपासून तालुक्यात टँकर सुरू केले.
पहिल्याच दिवशी तब्बल १२ गावांना टँकर मंजूर झाले. त्यादिवसापासून सुरू झालेले टँकर आजही आव्यातपणे सुरूच आहे. पावसाळ्याचे चार महिनेही संपले. मात्र, टँकर बंद होऊ शकलेले नाही, इतकी भयानक स्थिती उत्तर-पूर्व भागात आहे.
अल्प झालेल्या पावसावर जलस्रोतांना उतरलेले पाणी केव्हाच आटले असून, विहिरी, कूपनलिका माना टाकत असल्याने गावोगावी टंचाईची स्थिती भयानक आहे.
राजापूरसारख्या मोठ्या गावातील पाणीयोजनेला दोन ठिकाणाहून विहिरींचा उद्भव असताना, दोन्ही विहिरी कोरड्या पडल्याने वस्त्यांवर तीन टँकर सुरू असूनही पाणीटंचाई जाणवत आहे.
प्रशासनाने व्हावे दक्ष
शासनाने जाहीर केलेल्या दुष्काळी यादीत तालुक्याचा समावेश झाला आहे. पश्चिम भागातील पालखेड डाव्या कालव्याच्या लाभक्षेत्रातील गावांना पालखेडच्या आवर्तनामुळे काहीसा दिलासा मिळाला. सध्या येथे पाणी उपलब्ध आहे.
३८ गाव पाणीपुरवठा योजनेमुळे किमान ५५ ठिकाणी पाणीपुरवठा होत असल्याने मोठा आधार मिळाला. उत्तर पूर्व भागात कुठल्याच कालव्याचा आधार नसल्याने आणि जलस्रोत कोरडे पडल्याने या परिसरात टंचाईची व्याप्ती वाढत आहे.
त्यामुळे प्रशासनाने आतापासूनच दक्षता बाळगून संभाव्य टंचाईवर प्रभावी उपाययोजनांची तयारी करण्याची गरज आहे.
तीन वर्षांपूर्वी पावसाने दगा दिल्याने तब्बल १४ महिने पाणीपुरवठा सुरू होता. या वर्षीही जून-जुलैपर्यंत टँकर सुरू राहणार असल्याने सलग १४ ते १५ महिने टँकरने पाणीपुरवठा करण्याचा विक्रम तालुक्यात होणार आहे.
टँकरवर अवलंबून गावे
११ एप्रिलला आहेरवाडी, जायदरे, रेंडाळे, चांदगाव, ममदापूर, खरवंडी, देवदरी, वसंतनगर, अनकाई येथील भगत, चव्हाण, गोरे, बोराडे, जाधव, वाघ वस्तीसाठी टँकर मंजूर झाले होते.
त्यानंतर सायगाव, नगरसूलमधील वस्त्या, लहीत, हडपसावरगाव, पांजरवाडी, पिंपळखुटे बुद्रुक, भुलेगाव, कासारखेडे, कोळगाव, वाईबोथी, कोळम खुर्द व बुद्रुक, आडसुरेगाव, गारखेडे, सोमठाण जोश, रहाडी, देवठाण, नायगव्हाण, राजापूर, पन्हाळसाठे, धनकवाडी, धामणगाव, नगरसूलमधील सुमारे वीसवर वस्त्या, चिचोंडी बुद्रुक, देवठाण, खामगाव, मातुलठाण, खैरगव्हाण या ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे.
मातुलठाण खैरगव्हाण व राजापूर गावासाठी सप्टेंबरमध्ये टँकर मंजूर करायची वेळ आली आहे. सद्यस्थितीत पुन्हा देशमाने, कुसूर व राजापूर येथील टँकरचे प्रस्ताव प्रशासनाला प्राप्त झाले असून, त्यावर कार्यवाही सुरू असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागप्रमुख रफिक शेख यांनी दिली.
रोज लाखोंचा चुराडा
तालुक्यातील ३२ गावे व १५ वाड्यांसाठी रोज २३ खासगी टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू असून, सात शासकीय टँकर इंधनाअभावी बंद आहेत. रोज ४७ खेपाद्वारे या सर्व गावांना पाणीपुरवठा होत असल्याने शासनाचे लाखो रुपये पाणीपुरवठ्यावर चुराडा होत आहे.
येत्या जानेवारीनंतर ग्रामीण भागात टंचाईची स्थिती अधिकच गंभीर होण्याची भीती व्यक्त होत आहे.
"अवर्षणप्रवण असलेल्या उत्तर-पूर्व भागात पाणीटंचाई अधिक आहे. या भागात अव्याहातपणे टँकर सुरूच आहे, तसेच टँकरसाठी आलेल्या प्रस्तावावर कार्यवाही करून वेळेत टँकर सुरू करण्याची प्रशासन काळजी घेत आहे. तालुका दुष्काळी जाहीर झाल्याने शासनाच्या सूचनेनुसार विविध उपाययोजना राबविल्या जातील." - अभिजीत पाखरे, गटविकास अधिकारी, येवल
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.