Nashik News : निसर्गाने नटलेल्या लोणावळा येथे दिवसागणिक पर्यटकांची संख्या वाढत असल्याने त्याला पर्याय म्हणून इगतपुरी, त्र्यंबकेश्वर परिसरात वेलनेस सेंटर उभारण्यासाठी राज्याच्या पर्यटन विभागाकडून घोषणा झाली.
मात्र, २०१९ मध्ये झालेल्या सत्तांतरानंतर वेलनेस सेंटरचा प्रस्ताव अद्यापही कागदावरच रेंगाळलेला आहे. पर्यटन विभागाला जागा मिळत नसल्याने विलंब होत असल्याचे कारण यापूर्वी सांगितले जात होते. आता तर अधिकारी बदलल्याने असा प्रस्ताव होता का, असा सवाल उपस्थित केला जात आहे. (wellness center proposal is still on paper nashik news)
मुंबई-पुणेकरांचा ओढा लोणावळा, खंडाळा भागाकडे असला, तरी सध्या पर्यटनाचा वाढता कल लक्षात घेता मुंबईपासून नजीक असलेल्या इगतपुरी येथे वेलनेस सेंटर उभारण्याचा प्रस्ताव ‘तान’ व नाशिक सिटिझन फोरम या संस्थांकडून देण्यात आला होता. राज्याचे तत्कालीन पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी त्यासाठी सकारात्मक भूमिका घेतली होती; पण अद्याप वेलनेस सेंटरचा प्रस्ताव कागदावरच अडून पडला.
पर्यटन विभागाकडून प्राप्त माहितीनुसार वेलनेस सेंटरसाठी १०० ते १५० एकर जागेचा शोध सुरू आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात सरकारी जागा उपलब्ध नसल्याने मध्यंतरीच्या काळात खासगी जागेचा पर्याय शोधला जात होता. वेलनेस सेंटरसाठी पर्यटन विभागाने इगतपुरी तालुक्याची निवड केली आहे.
नैसर्गिक सौंदर्य, पाण्याची उपलब्धता, टेकड्या, डोंगरमाथे व जंगलाचा भाग यामुळे इगतपुरी योग्य असल्याचा दावा त्या वेळी करण्यात आला होता. वेलनेस सेंटरमध्ये मनोरंजनापासून आरोग्यापर्यंतच्या सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. इगतपुरीबरोबरच त्र्यंबकेश्वर, शिर्डी व मुंबई असे सर्किट विकसित करण्याचे नियोजन होते.
योग विद्यापीठाचा प्रस्ताव
योगाला चालना देण्यासाठी केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयातर्फे २०१५ मध्ये देशात योग विद्यापीठ स्थापण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यादृष्टीने धार्मिक व नैसर्गिक महत्त्व लक्षात घेऊन त्र्यंबकेश्वर भागात योग विद्यापीठाची स्थापना करावी, अशी मागणी नाशिकरांतर्फे तत्कालीन केंद्रीय आयुष राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांच्याकडे केली होती.
मुंबईत यासंदर्भात बैठकही पार पडली. ‘मेक इन नाशिक’ उपक्रमाच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांकडेही मागणी करण्यात आली. पण, आतापर्यंत फक्त ‘आश्वासन’च पदरात पडले आहे.
"उत्तम दर्जाची गुंतवणूक आणि प्रतिभा आकर्षित करून स्थानिक अर्थकारणाला चालना देण्याच्या हेतूने आजमितीस जगभरातील विकसनशील देशांमध्ये स्पर्धा सुरू आहे. त्या शहरांतील नागरिकांना संपन्न जीवनशैली लाभणे ही या स्पर्धेच्या यशाची गुरुकिल्ली म्हणावी लागेल. बाराही महिने आल्हाददायी हवामान, देशातील मोठ्या आर्थिक आणि ज्ञान केंद्र असलेल्या शहरांचे सान्निध्य, निसर्गाची वैविध्यपूर्ण संपन्नता लाभलेला भूभाग यांचे नाशिकला वरदान लाभलेले आहे. ...आणि हाच नाशिकचा यूएसपी आहे.
अन्य शहरांच्या तुलनेत नाशिक खास ठरते, ते त्यामुळेच! नाशिकच्या प्रगतीला गती देण्यासाठी इथल्या नेतृत्वाने याच यूएसपीचे बळ वापरावे, हेच तर्कसंगत आहे. या मार्गाने होणारा विकासच शाश्वत ठरेल. वेलनेस, पर्यटन, इनोव्हेशन, सेवा या क्षेत्रांतूनच रोजगाराचे दर्जेदार आणि दरडोई उत्पन्न वाढविणारे पर्याय उपलब्ध होणार आहेत. ते वाढविण्यावरच आपला भर असला पाहिजे, स्थलांतरितांचे लोंढे आणणारे आणि शहराची लोकसंख्या वाढविणारे कामगार-केंद्रित उद्योग आणण्यावर नव्हे! नाशिकमध्ये वेलनेस सेंटर होणे, त्या क्षेत्राची वाढ होणे म्हणूनच आवश्यक आहे." - आशिष कटारिया अध्यक्ष, नाशिक सिटिझन्स फोरम
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.