नामपूर (जि. नाशिक) : शहर व परिसरात तापमानाचा पारा घसरल्यामुळे गुलाबी थंडीचे आगमन झाले असून, चौकाचौकात अनेक ठिकाणी शेकोट्या पेटू लागल्या आहेत. आरोग्यवर्धक थंडीमुळे सकाळी फिरायला जाणाऱ्या नागरिकाच्या संख्येतही वाढ झाली आहे. आगामी काळात होणाऱ्या पोलिस, सैन्य भरतीच्या पार्श्वभूमीवर जिमखाने, मैदानावर तरुणांची गर्दी वाढल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. (Winter Season bonfire by harshness of winter Crowd of youths in gymnasiums and ground nashik news)
मध्यंतरीच्या काळात ढगाळ वातावरणामुळे थंडी गायब झाली होती. आता ढगाळ वातावरण निवळल्याने दोन दिवसांपासून गुलाबी थंडी वाढू लागली आहे. त्यामुळे नागरिक उबदार कपडे परिधान करून थंडीपासून संरक्षणाचा प्रयत्न करीत आहेत. काही जण शेकोट्या पेटवून थंडीपासून बचाव करताना दिसत आहेत. थंडी रब्बीच्या पिकांसाठी पोषक असल्याने उत्पादनात वाढ होण्याची आशा आहे. यंदा मोसम खोऱ्यात पावसाचे प्रमाण जास्त असल्याने मोसम नदी गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून वाहत असल्याने परिसरात यावर्षी थंडीचे प्रमाण अधिक राहील, असा अंदाज व्यक्त होत आहे.
या थंडीमुळे रात्रीच्यावेळी शेतकऱ्यांना मात्र चांगलीच धावपळ करावी लागत आहे. पिकांना पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांची दमछाक होत आहे. त्यातच वीज भारनियमनामुळे बऱ्याचदा रात्रीच्यावेळी लाईट असते. त्यामुळे थंडी असली तरी शेतकऱ्यांना पिकांना पाणी देण्यासाठी शेतात जाण्याची कसरत करावी लागत आहे. थंडीचा कडाका चांगलाच जाणवत आहे.
उत्तर भारतात थंडीची लाट आल्यामुळे परिसरात थंडीत वाढ झाली आहे. दोन दिवसांपूर्वी तापमापकातील पारा ११ ते १२ अंश सेल्सिअसच्या खाली घसरला होता. त्यामुळे उबदार कपड्यांच्या खरेदीसाठी नामपूरकरांनी बाजारपेठेत गर्दी होत असल्याचे चित्र आहे. बुधवारी (ता. ३०) १२.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असून, मध्यंतरी गायब झालेल्या थंडीचे पुनरागमन झाले आहे. गेल्या पंधरा दिवसांच्या काळात नामपूरकर तापमानाचा चढउतार अनुभवत आहेत.
वातावरणात गारवा
गेल्या आठवड्यात दिवसभर उकाडा तर रात्री काहीअंशी थंडी, अशा वातावरणाचा अनुभव नागरिकांनी घेतला. या आठवड्याच्या सुरवातीला तापमान पुन्हा घसरत असल्याने गायब झालेली थंडीही परतली असल्याने वातावरणात गारवा जाणवू लागला आहे. त्यामुळे आगामी काळात नामपूरकरांना पुन्हा गुलाबी थंडीचा आनंद लुटता येणार आहे. पहाटेच्यावेळी फिरणाऱ्या तरुणांची संख्याही वाढलेली दिसून येत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.