जांभूळमाळच्या महिलांची पायपीट कधी थांबणार?
नाशिक : पेठपासून दहा किलोमीटरवरील जांभूळमाळ हा साडेसातशे वस्तीचा पाडा सध्या पिण्याच्या पाण्यासाठी झुंजतोय. तीनपैकी एक विहीर (Well) बुजलीयं. दुसरी पडायला आली असून ती कोरडीठाक आहे. एक किलोमीटरवरील डोंगर उतरून गेल्यावर असलेली विहीर पाण्याची तहान शमवत आहे. या विहिरीने तळ गाठल्याने महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी तीन किलोमीटर अंतरावरील उस्ताळे नदीवर जावे लागते. दरम्यान वनविभागाच्या मान्यतेने इथला पिण्याच्या पाण्याचा (Water Crisis) प्रश्न सुटणार आहे. (womens travel three kilometers for water Jambulmal Pada Nashik News)
महिलांनी अनेकवेळा दहा किलोमीटर पायी हंडा मोर्चा काढून अधिकाऱ्यांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. पण कुणीही आदिवासी महिलांच्या पाणीप्रश्नाकडे गांभीर्याने पाहत नसल्याची व्यथा मांडण्यात आली. एक किलोमीटरवरील विहिरच पिण्यासाठी, जनावरांसाठी, भांडी-कपडे धुण्यासाठी पर्याय आहे. त्यामुळे इथे पाण्यावरून महिलांचे वाद रोज होतात. विहिरीचे पाणी संपल्यावर महिलांना डोंगर उतरून तीन किलोमीटरवरील उस्ताळे नदीवर जाण्यासाठी धोकादायक प्रवास करावा लागतो. सकाळी चटणी-भाकर रुमालात बांधून महिला दरी उतरून पिण्याच्या पाण्यासाठी प्रवास करतात. अनेक महिलांनी वयाची साठी ओलांडली आहे. पाण्यासाठी डोक्यावर दोन हांडे ठेवून येताना दिसतात.
पावसाळ्यापूर्वी रस्ता अपेक्षित
पाड्याची पाण्याची समस्या मिटवण्यासाठी नाशिकच्या सोशल नेटवर्कींग फोरमतर्फे विहीर खोदून जलवाहिनी करून देण्याची तयारी दर्शवली. जवळील वन विभागाच्या जागेत विहीर खोदली जाणार होती. साठ महिला आणि पुरुष श्रमदान करण्यास तयार झाले. लोकवर्गणी काढण्यात आली. पण वन विभागाने घेतलेल्या हरकतीमुळे ते काम बंद पडले. वनाधिकार कायद्याप्रमाणे ग्रामसभेत प्रस्ताव मंजूर करून वन विभागास अर्ज आणि निवेदन दिल्यावर परवानगी मिळू शकते, अशी माहिती वन विभागाच्या अधिकाऱ्यांशी साधलेल्या संवादातून पुढे आली. इथे येण्यासाठी रस्ता असून नसल्यासारखा आहे. रुग्णाला दवाखान्यात नेण्यासाठी झोळी करणे हा मार्ग उरला आहे.
"अधिकाऱ्यांना अनेकदा निवेदन दिले. हंडा मोर्चा काढला. पण कुणीही दखल घेत नाही. एका विहिरीवर पूर्ण गाव पाण्यासाठी जमा होते. गावात बोअर आहे. पण त्याला पाणी नाही. वन विभागाने परवानगी दिल्यास आमचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटणार आहे."
- तुळशीदास बोरसे (ग्रामस्थ)
"माझे वय झाले आहे. पिण्याच्या पाण्यासाठी या वयात डोंगर उतरून विहिरीवर यावे लागते. पाय थकले आहेत. पण आमच्या समस्या जाणून घेण्यासाठी कुणाकडे वेळ नाही. घरापर्यंत पाणी आल्यास बरे होईल." - राधाबाई भांगरे (स्थानिक महिला)
"पाण्याची एकमेव विहीर कोरडी झाल्याने आम्हाला दरी उतरून नदीवर जावे लागते. नदीवर झरे शोधून पाणी आणावे लागते. पूर्ण दिवस पाणी आणण्यासाठी जातो. मग आम्ही शेताची कामे कधी करावी असा प्रश्न आहे." - छबीबाई बोरसे (स्थानिक महिला)
"एकीकडे पिण्याच्या पाण्याची अडचण आणि दुसरीकडे रस्त्याची समस्या. रस्ता खूप खराब असल्याने झोळीतून न्यावे लागते. पावसाळ्यात आम्हाला पायी पेठ रस्त्यापर्यंत जावे लागते."
- चंद्राबाई बोरसे (स्थानिक महिला)
"सामुदायिक वन हक्क अधिनियमानुसार वन विभागाच्या जागेत शाळा, पाणी, विहीर अशी कामे करता येते. वन हक्क दाव्याचा प्रस्ताव करावा लागतो. तसेच ग्रामसभेचा ठराव, वन हक्क समितीचे पत्र, सात-बारा उतरा अशी कागदपत्रे सादर करावी लागतात. वरिष्ठांकडून त्यास मंजुरी मिळते. आम्ही त्यासाठी ग्रामस्थांना सर्व मदत करायला तयार आहोत."
- अरुण सोनवणे (वन परिक्षेत्र अधिकारी, पेठ)
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.