सिन्नर (जि.नाशिक) : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाच्या (mumbai-nagpur samruddhi highway) टप्पा क्रमांक १२ अंतर्गत वावी येथील कॅम्पमधील शेकडो कामगार दारूच्या शोधात गावभर भटकत असतात. त्यांच्या जोडीला अनेक वाहनचालक थेट वाहने घेऊन गावातील गल्लीबोळांत येऊ लागले असून, शनिवारी (ता. ५) रात्री मद्यपान केलेल्या एका जेसीबीचालकाने बसस्थानक परिसरात अरुंद गल्लीत जेसीबी घुसवून धुमाकूळ घातला. यात एका दुकानाचे नुकसान झाले. संबंदित जेसीबीचालकास रोखण्यासाठी पुढे गेलेल्या स्थानिक पत्रकारासह दोघांच्या अंगावर जेसीबी घालण्याचा जीवघेणा प्रकारही घडला आहे. (workers-in-search-of-alcohol-nashik-marathi-news)
मद्याच्या शोधात समृद्धीची वाहने गल्लीबोळांत
कंपनी व्यवस्थापनातील अधिकाऱ्यांना हा प्रकार माहिती असूनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने रविवारी (ता. ६) सकाळी संतप्त ग्रामस्थांनी गावाच्या परिसरातून जाणारी वाहने रोखून धरली. मात्र, सायंकाळपर्यंत कंपनीचा एकही प्रतिनिधी यासंदर्भात बोलण्यासाठी पुढे न आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. वावी येथील कॅम्पवर शेकडो परप्रांतीय कामगार आहेत. हे कामगार सायंकाळी सुटी झाल्यानंतर किराणा, भाजीपाला खरेदीच्या नावाखाली गावात येऊन मद्याची तलफ भागवत असतात. कोरोना नियमावलीमुळे मद्य विक्रीची दुकाने बंद असली तरी गावात ठिकठिकाणी उघडपणे अवैध मद्य विक्री केली जात आहे. स्थानिक पोलिस यंत्रणेच्या आशीर्वादाने हा प्रकार बिनबोभाट सुरू असल्याने सायंकाळनंतर मद्यपींसाठी संपूर्ण गावात रस्ते मोकळे असतात. त्यामुळे समृद्धी कामगारांचे देखील फावले असल्याने थेट जेसीबीसारखे अवजड वाहन गावाच्या गल्लीबोळांत फिरवण्याचा प्रकार शनिवारी रात्री घडला. मद्याच्या नशेत असलेल्या चालकाने जेसीबीसह बसस्थानक परिसरात सुमारे अर्धा तास फेरफटका मारला. या घटनेत अहिल्यादेवी चौकातील दशरथ आहेर यांच्या दुकानाच्या दरवाजाचे नुकसान झाले. याच दरम्यान येथील पत्रकार संतोष भोपी हे नितीन शिवदे या मित्रासमवेत बसस्थानकाकडे येत असताना त्यांनी जेसीबीचालकाला हटकले. मात्र, त्याने उलट शिवीगाळ करत समृद्धी कॅम्पच्या दिशेने जेसीबी घेऊन पळ काढला. दोघांनी दुचाकीवरून त्याचा पाठलाग करून नूतन विद्यालयाजवळ जेसीबी थांबविण्याचा प्रयत्न केला. तेथे चालकाने दोघांच्या अंगावर जेसीबी घातला.
मद्यधुंद जेसीबीचालकाचा शनिवारी रात्री धुमाकूळ
दरम्यान, या प्रकाराबाबत ग्रामस्थांनी सरपंच कन्हय्यालाल भुतडा, माजी सरपंच विजय काटे यांच्या नेतृत्वाखाली समृद्धीची वाहने अडवायला सुरवात केली. दुपारी तीनपर्यंत सुमारे ४० च्या वर वाहने उभी करूनही कंपनीचा प्रतिनिधी त्यासंदर्भात विचारणा करण्यासाठी फिरकला नव्हता. त्यामुळे ग्रामस्थांच्या संतापात अधिकच भर पडली. यापुढे समृद्धीचे एकही वाहन गावाच्या परिसरातून पुढे जाऊ द्यायचे नाही, असा इशारा ग्रामपंचायत सदस्य प्रशांत कर्पे, विनायक घेगडमल, विजय सोमाणी, सचिन वेलजाळी, विलास पठाडे, संतोष जोशी, दशरथ आहेर, ज्ञानेश्वर खाटेकर, राकेश आनप, गणेश वेलजाळी, किशोर मालपाणी, सुनील जाधव, नितीन आनप यांनी दिला आहे.
भोपी यांना रुग्णालयात हलवले
गावात धुमाकूळ घालणाऱ्या जेसीबीचालकाला अडवण्यासाठी पुढे गेलेल्या पत्रकार संतोष भोपी यांच्या अंगावर जेसीबी घालण्याचा प्रयत्न झाला. त्यांनी प्रसंगावधान दाखवल्याने इजा झाली नाही. मात्र, त्यांचा रक्तदाब तीव्रतेने कमी झाला. स्थानिक डॉक्टरांनी त्यांना उपचारासाठी सिन्नरला नेण्याचा सल्ला दिला. तेथेही दाखल करून घ्यायला डॉक्टरांनी नकार दिल्याने नाशिक येथील खासगी रुग्णालयात त्यांना उपचारासाठी नेण्यात आले. भोपी यांना या घटनेत हृदयविकाराचा सौम्य झटका आल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.