नाशिक : (इंदिरानगर) द्राक्षबागेत काम करणारे गायधोंड (ता. पेठ) येथील अकरा मजूर अडकून पडले असून, त्यांनी आपल्या गावी जाण्याची परवानगी मागितली आहे.
काशीराम वाघमारे यांच्यासह सहा पुरुष आणि पाच महिला अशा अकरा जणांचा त्यात समावेश आहे.
द्राक्षबागेत काम करण्यासाठी हे मजूर आले
आठ दिवसांपासून पाथर्डी शिवारातील अंताराम जाधव यांच्या द्राक्षबागेत काम करण्यासाठी हे मजूर आले होते. त्यानंतर ते नितीन जाधव यांच्या द्राक्षबागेत काम करीत आहेत. त्यांना पोलिसपाटील विठ्ठल खुरकुटे यांनी गावी परत येण्याचा निरोप दिला. मात्र जाण्यासाठी वाहने बंद असल्याने हे सर्व आदिवासी बांधव अडकून पडले आहेत. त्यांनी गावी जाण्यासंदर्भात "सकाळ'शी संपर्क साधला असता "सकाळ' प्रतिनिधीने स्थानिक नगरसेविका संगीता जाधव यांचे पती आणि माजी नगरसेवक अमोल जाधव यांच्याशी याबाबत चर्चा केली असता त्यांनी पोलिसांमार्फत आवश्यक ते पत्र मिळाले, तर या सर्व लोकांना गावी पोहचवण्याची व्यवस्था करतो, असे सांगितले. त्या दृष्टीने वरिष्ठ निरीक्षक नीलेश माईनकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी ही परवानगी नियंत्रण कक्षाकडून प्राप्त होऊ शकते, असे सांगितले.
मात्र उपाय मिळाला नाही
त्यानुसार श्री. जाधव यांच्या सह्याद्री युवक मंडळाचे पदाधिकारी शैलेश कार्ले यांनी पोलिसांतर्फे देण्यात आलेल्या व्हॉट्सऍप क्रमांकावरून संबंधित लिंक मिळवली. त्यात सर्व माहिती भरली. मंडळाचे नाव, अर्ज, मजुरांना पोचवण्यासाठी वापरण्यात येणारा वाहनाचा क्रमांक आदी बाबी नोंदवल्या. मात्र मजुरांचा फोटो त्यात अपलोड करावा, या रकान्यातील माहिती भरताना तांत्रिक चूक निदर्शनास येऊ लागली. त्यावर त्यांनी संबांधितांकडे विचारणा केली. मात्र उपाय मिळाला नाही. त्यामुळे ते हा अर्ज पाठवू शकले नाहीत. या परवानगीअभावी मात्र हे सर्व मजूर आपल्या गावी आज पोहोचू शकले नाहीत.
"सकाळ'च्या माध्यमातून या मजुरांबाबत माहिती मिळाली. त्यांना पोचवण्यासाठी सर्व व्यवस्था करून देण्याची तयारी आहे. मात्र अडवणूक नको म्हणून अधिकृत परवानगी
पोलिसांतर्फे आवश्यक आहे. ही परवानगी घेण्यासाठी पोलिसांनी जारी केलेल्या लिंकद्वारे अर्ज करण्याचा देखील प्रयत्न केला. मात्र तांत्रिक अडचणी आल्याने हा अर्ज सादर होऊ शकला नाही. ती मिळाल्यानंतर तातडीने या आदिवासी बांधवांना त्यांच्या गावी पोचविण्यात येईल. - अमोल जाधव, माजी नगरसेवक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.