YCMOU News : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या प्र-कुलगुरूपदाचा कार्यभार प्रा. जोगेंद्रसिंह बिसेन यांनी शनिवारी (ता.४) स्वीकारला. कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे यांनी त्यांचे स्वागत केले. विद्यापीठाच्या प्रगतीत योगदान देणार असल्याची ग्वाही त्यांनी पदभार स्वीकारल्यावर दिली.
प्रा. जोगेंद्रसिंह बिसेन हे यापूर्वी नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात प्र-कुलगुरूपदी कार्यरत होते. प्रा. बिसेन यांचे शिक्षण एम.ए., एम. फिल., पीएच. डी., बी.पी.एड. आहे. गेली २७ वर्षे लातूरच्या दयानंद कला महाविद्यालयात हिंदी विषयाचे प्राध्यापक व नंतर प्राचार्य म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली. (ycmou Pro Chancellor Prof Jogendra Singh Bisen nashik news)
त्यांना राज्य शासनातर्फे महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमीचा छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय एकता पुरस्कार आणि इतरही बरेच पुरस्कार मिळालेले आहेत. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२० च्या अंमलबजावणीसाठी शासनातर्फे गठीत केलेल्या सुकाणू समितीचे ते सदस्य आहेत.
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सोनवणे यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. या वेळी कुलगुरू डॉ. सोनवणे यांनी विद्यापीठाबद्दल, विविध नवीन उपक्रम, अभ्यासक्रमांबद्दल माहिती दिली. प्राचार्य व प्र-कुलगुरूपदाचा अनुभव असून, त्याचा मुक्त विद्यापीठास नक्कीच उपयोग होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
पदभार स्वीकारल्यावर प्रा. बिसेन म्हणाले, की मुक्त विद्यापीठात काम करण्याची संधी मिळाली आहे. कुलगुरूंनी केलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन केले जाईल. पारंपरिक विद्यापीठातून आलो असलो, तरी मुक्त विद्यापीठाबद्दल पूर्णपणे जाणून घेऊन, विद्यापीठासाठी अधिकाधिक योगदान देण्याचा प्रयत्न असेल. त्यांनी विद्यापीठ परिसरातील यशवंतराव चव्हाण यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्प अर्पण करून वंदन केले.
या वेळी विद्यापीठाचे वित्त अधिकारी डॉ. गोविंद कतलाकुटे, विद्यार्थी सेवा विभागाचे संचालक डॉ. प्रकाश देशमुख, अंतर्गत गुणवत्ता आश्वासन केंद्राचे संचालक डॉ. राम ठाकर, ग्रंथालय प्रमुख डॉ. मधुकर शेवाळे, जनसंपर्क अधिकारी महेंद्र बनसोडे, कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. नितीन ठोके, उपकुलसचिव डॉ. कैलास बोरसे, डॉ. चंद्रकांत पवार, प्रा. रमेश धनेश्वर उपस्थित होते.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.