येवला (जि. नाशिक) : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी अद्यापही कुणाचे पॅनल होणार आणि लढणार हे स्पष्ट झालेले नाही, त्यामुळे पॅनल निर्मितीही रखडली आहे. म्हणूनच अर्ज भरण्यासही थंड प्रतिसाद मिळत असून सोमवारी (ता. ३) शेवटचा दिवस असताना आतापर्यंत केवळ चौदाच अर्ज दाखल झाले आहे.
येथे महाविकास आघाडी झाल्यास दोन, अन्यथा तीन पॅनल होण्याची शक्यता असून सोमवारच्या घडामोडींकडे लक्ष लागले आहे. भाजप, ज्येष्ठ नेते माणिकराव शिंदेचा पॅनल जवळपास निश्चित मानला जात आहे. (Yeola Market Committee Election NCP Shiv Sena entanglement of panel not decided nashik news)
राज्यात महाविकास आघाडी असली तरी येथे मात्र राष्ट्रवादी व शिवसेना (ठाकरे) यांच्यात खूप सख्य नाही. त्यातच आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बाजार समितीची निवडणूक एकत्रित व्हावी अशी दोन्ही बाजूंनी इच्छा आहे. त्यादृष्टीने गुप्त चर्चाही होत आहेत, मात्र फॉर्मुला ठरविण्यासाठी प्रमुख नेत्यांची बैठकच होत नसल्याने गुंता आहे, तसाच आहे.
शिवसेनेचे माजी सभापती संभाजी पवार तसेच, जिल्हाप्रमुख कुणाल दराडे यांच्या उपस्थितीत पदाधिकाऱ्यांची बैठक शिवसेना कार्यालयात झाली. यामध्ये राष्ट्रवादीकडून सकारात्मक प्रतिसाद मिळून सन्मानजनक जागा मिळाल्या तर महाविकास आघाडी करण्यावर एकमत झाले आहे. मात्र दोन्ही बाजूची अद्याप एकही बैठक झाली नसल्याने चित्र अस्पष्ट आहे.
बैठक नसल्याने चित्र अस्पष्टच
ज्येष्ठ नेते छगन भुजबळ आजारी असल्याने येथील निरीक्षक दिलीप खैरे नियोजन करत आहेत. मात्र अद्याप राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी तसेच, शिवसेनेचे संभाजी पवार, कुणाल दराडे, भास्कर कोंढरे, रतन बोरनारे, राजेंद्र लोणारी आदी प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत बैठक नसल्याने नेमके चित्र अस्पष्टच आहे.
हेही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??
त्यातच आमदार किशोर दराडेही अद्याप अलिप्त असल्याने नेमके राजकारण काय व कसे सुरु आहे हे कळेनासे झाले आहे. ज्येष्ठ नेते माणिकराव शिंदे व भाजपचे नेते बाबा डमाळे, समीर समदडीया, राजू परदेशी, आनंद शिंदे, नाना लहरे आदींच्या बैठका होऊन एकत्रित लढण्याचे ठरले आहे.
शिवसेना (शिंदे) गटाचे अतुल पालवे, पांडुरंग शेळके तसेच प्रहारचे हरिभाऊ महाजन, स्वाभिमानीचे श्रावण देवरे, रयतचे वाल्मीक सांगळे आदींची बैठक झाली असून तेही पॅनल निर्मितीच्या प्रवाहात आहे.
२०६ अर्ज विक्री
उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा सोमवारी शेवटचा दिवस आहे. तरीही आतापर्यंत केवळ १४ अर्ज दाखल झाले असून २०६ अर्ज विक्री झाली आहे. शेवटचा दिवस असल्याने सोमवारी विक्रमी संख्येने अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे.
सध्या अर्ज भरण्यासह कागदपत्रे जुळवाजुळव करण्याची धावपळ सुरू आहे. बाजार समितीत निवडणूक अधिकारी तहसीलदार प्रमोद हिले, सहाय्यक विजय बोरसे, सचिव कैलास व्यापारे आदी निवडणुकीचे कामकाज पाहत आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.