Nashik Traffic Crisis: येवला-नांदगाव महामार्गावर वाहतुकीचा खेळखंडोबा! मनमाडचा पूल खचल्याने ताण

एक तर रस्ता छोटा, त्यात वळणे, घाट, रेल्वे पूल आदी अडथळे असल्याने सातत्याने वाहतूक कोंडी होत असून, अपघातांचे प्रमाण वाढले आहे.
Traffic jam on Yevala-Nandgaon highway.
Traffic jam on Yevala-Nandgaon highway.esakal
Updated on

येवला : मनमाड येथील रेल्वे पूल खचल्याने मार्गावरील नगर, धुळे, इंदूरपर्यंतची सर्व वाहतूक बंद आहे. ही सर्व वाहतूक सध्या येवला-नगरसूल-राजापूरमार्गे नांदगाव, मालेगावहून पुढे जात आहे.

या मार्गावर अतिरिक्त ताण येऊन वाहतुकीचा खेळखंडोबा झाला आहे. एक तर रस्ता छोटा, त्यात वळणे, घाट, रेल्वे पूल आदी अडथळे असल्याने सातत्याने वाहतूक कोंडी होत असून, अपघातांचे प्रमाण वाढले आहे.

यामुळे रस्त्यावरील गावोगावचे नागरिकही त्रस्त झाले आहेत. शिवाय अवजड वाहनांमुळे रस्त्यांची वाट लागत असल्याने नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे. (Yeola Nandgaon highway traffic jam Stress due to Manmad bridge collapse nashik)

कर्नाटक, तामिळनाडू, पुणे, नगर या भागातून मालवाहतुकीसह बस व प्रवासी वाहतुकीची सर्व वाहने येवलामार्गे पुढे मनमाड, मालेगाव, धुळे, इंदूर, मध्य प्रदेश, गुजरातसह इतर राज्यात जातात. लांबचा पल्ला असल्याने या मार्गावर कंटेनर व ट्रकची संख्या अधिक असते.

१५ दिवसांपासून मनमाड येथील रेल्वे पूल खचल्याने ही संपूर्ण वाहतूक बंद केली आहे. या वाहतुकीला सुरुवातीला लासलगाव-चांदवडमार्गे पर्याय सुचविला होता.

अत्यंत लांबचा व आडगळीचा मार्ग ठरत असल्याने सध्या येवल्याहून सर्व वाहतूक नगरसूल-राजापूरमार्गे नांदगाव, मालेगावकडे वळविली आहे. परिणामी, या मार्गावर चारपटीने वाहनांची वर्दळ वाढली आहे.

मुळात येवला ते नांदगाव रस्ता मागील वर्षी झाला असून, अवजड वाहनांसाठी रस्त्याचा दर्जा नाही. या मार्गावर सर्व गावे शेतकरी व शेती व्यवसायाशी निगडित असल्याने बस व शेतमालाची वाहतुकीपलीकडे वाहने दिसत नाहीत.

मात्र, अचानक कंटेनर व मालवाहतुकीची वाहने जाऊ लागल्याने रस्ता ठीकठिकाणी उखडू लागल्याच्या तक्रारी होत आहेत.

येवला ते नांदगावदरम्यान वाहतुकीची कोंडी कधी नागरिकांना माहिती नव्हती. सध्या दिवसभर वाहने सुरू राहत असल्याने गावोगावचे नागरिक त्रस्त झाले आहेत. विशेषत: येवला रेल्वेगेट बंद असले, तर थेट दोन्ही बाजूने दीड-दोन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागत आहेत.

यामुळे रेल्वे गेटवर प्रचंड वाहतूक कोंडी होऊन प्रसंगी पोलिसांना या ठिकाणी थांबण्याची वेळ येत आहे. नगरसूलजवळ रेल्वे भुयारी मार्ग आहे. तोही भरलेल्या ट्रकसाठी अडचणीचा ठरत आहे.

शिवाय या ठिकाणी पाणी जाण्याच्या खड्ड्यात वाहने अडकून रोज वाहतूक कोंडी होत आहे. येवल्याहून नगरसूलला जाण्यासाठी दहा ते बारा मिनिटे, तर राजापूरला जाण्यासाठी २० ते २५ मिनिटे लागतात.

Traffic jam on Yevala-Nandgaon highway.
Nashik News: शेतकऱ्यांना फटका अन्‌ आरक्षण आंदोलनाचा खटका! येवलेकरांना चौफेर नुकसान

येवला-नांदगाव रस्ता अवघ्या एका तासाचा आहे. मात्र, रोजच्या वाहतूक कोंडीमुळे नगरसूलपर्यंत जाण्यासाठीच अर्धा तास नागरिकांना खर्च करावा लागत आहे. शिवाय छोटे-मोठे अपघाताचे प्रमाण वाढल्याने परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत.

येवला ते मनमाड चौपदरी महामार्ग आहे. त्या तुलनेत येवला-नांदगाव रस्त्यावर दुहेरी वाहतूक होऊ शकते. क्षमतेपेक्षा जास्त वाहने धावू लागल्याने या रस्त्यावर अतिरिक्त गर्दी होत आहे.

त्यामुळे मनमाड येथील पूल तातडीने दुरुस्त करून नगरसूल भागातून जाणारी अवजड वाहने बंद करावीत व वाहतूक कोंडी थांबवावी, अशी मागणी नगरसूल, मातुलठाण, वडाचा मळा, राजापूर, बाणगाव, शिर्डी, नांदगाव येथील ग्रामस्थांनी केली आहे.

सावरगावमार्गही वाहतूक कोंडी

अनेक वाहनधारक नगरसूल-धामोडा-सावरगावमार्गे येवल्याला ये-जा करीत आहेत. अनेक बसही याच मार्गाने जातात. विशेष म्हणजे हा एकेरी व अतिशय साधा रस्ता असून, ठिकठिकाणी उखडलेला आहे.

या रस्त्यावरही वर्दळ वाढल्याने वाहतूक कोंडी होत आहे. आमच्या रस्त्यांची वाट लावण्यापेक्षा मनमाडची वाटच दुरुस्त करा, अशी मागणी आता सर्व स्तरातून होत आहे. या भागातील ग्रामस्थ बल्हेगाव, नागडेमार्गे येवल्यात येतात.

Traffic jam on Yevala-Nandgaon highway.
Nashik News: कांदा निर्यातबंदी प्रश्नी लासलगावला जानेवारीत महामेळावा!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.