नाशिक : समृद्ध नाट्य परंपरा असलेल्या मराठीतील निवडक गाजलेल्या अन् त्याचवेळी काही नवोदित नाटकांमधील विविध पात्र शुक्रवारी (ता. ११) मविप्र संस्थेच्या आयएमआरटी सभागृहाच्या व्यासपीठावर पुन्हा अवतरले. नव्या पिढीतील उगवत्या रंगकर्मींचा हा कलाविष्कार परीक्षकांसह उपस्थितांना निश्चितच सुखावणारा होता. (YIN Art Festival monologue Competition Nashik News)
‘सकाळ’च्या यिन कला महोत्सवांतर्गत आयएमआरटीच्या मुख्य सभागृहात एकपात्री अभिनय स्पर्धा उत्साहात झाली. संपूर्ण जिल्हाभरातील विविध महाविद्यालयांच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींनी या स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवत व्यासपीठाचा ताबा अन् प्रेक्षकांची भरभरून दाद मिळविली. सकाळी साडेअकरापासून सुरू झालेली ही स्पर्धा दुपारी उशिरापर्यंत सुरू होती.
एकपात्री अभिनयात अगदी अलीकडच्या काळातील काही गाजलेल्या आणि अभिनयाला पुरेसा वाव असणाऱ्या काही पात्रांचा अभिनय नव्या पिढीतील उगवत्या रंगकर्मींनी सादर केला. विविध विषय आणि अभिनयातील नावीन्यही यानिमित्ताने अनुभवयास मिळाले. केटीएचएम महाविद्यालयाचे नाट्यशास्त्र विभागप्रमुख तेजस बिल्दीकर, नाट्य व चित्रपट अभिनेत्री केतकी कुलकर्णी परीक्षक होत्या.
"विविध विषयांवरील सादरीकरण हे या स्पर्धेचे वैशिष्ट्य सांगता येईल. स्पर्धकांनी अशा स्पर्धांमध्ये सहभागी होताना नेहमी नव्या विषयांचा विचार करावा. त्याचवेळी सादरीकरणात अनुकरण करणे टाळावे, असे वाटते. ठराविक भूमिका, त्यांचे सादरीकरण यामधून बाहेर पडून कलावंतांनी सादरीकरणासाठी नवा विचार करावा."
-तेजस बिल्दीकर, परीक्षक, नाट्यशास्त्र विभागप्रमुख, केटीएचएम महाविद्यालय
"स्पर्धा अत्यंत उत्साहात व छान झाली. मात्र, स्पर्धकांवर सोशल मीडियाचा प्रभाव दिसून येत होता. खरंतर एकपात्री अभिनय स्पर्धेत सहभागापूर्वी वेगवेगळे विषय, नाटकं, पुस्तकं यांचा अभ्यास करायला हवा. नाशिक ही कलाकारांची भूमी आहे. त्यामुळे अशा स्पर्धांमधून उत्तमोत्तम कलाकार घडावेत, यासाठी सर्व कलाकारांनी अधिक मेहनत घ्यायला हवी."
-केतकी कुलकर्णी, परीक्षक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.