नाशिक : विद्यार्थिदशेपासूनच कलावंतांची जडणघडण होत असते. मात्र, त्यासाठी पूरक उपक्रम नसतील, तर सृजनशिलतेची प्रक्रिया खुंटते. परंतु, ‘सकाळ-यिन’च्या कला महोत्सवाने विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिलेल्या व्यासपीठामुळे आपल्या सुप्तगुणांना व्यक्त करण्याचीच जणू संधी मिळाली आहे. त्यामुळेच आजपासून सुरू झालेल्या कला महोत्सवात मन लावून शिल्पकृती साकारताना महाविद्यालयीन विद्यार्थी तल्लीन झाले होते. (YIN Art Festival Young artists engaged in making sculptures competition nashik news)
गंगापूर रोडवरील मविप्रच्या एमएसडब्ल्यू महाविद्यालयाच्या प्रांगणात ‘सकाळ-यिन’च्या कला महोत्सवाला शुक्रवार (ता. ११)पासून प्रारंभ झाला. मातीपासून आखीव-रेखीव बनविलेले शिल्प नेहमीच आकर्षणाचा विषय असतो. परंतु ते साकारत असतानाचे प्रत्यक्ष काम पाहण्याची संधी विविध स्पर्धांच्या निमित्ताने कला महोत्सवात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना पाहावयास मिळाली. एवढेच नव्हे, तर एमएसडब्ल्यू महाविद्यालयाचे शिक्षक व विद्यार्थीही शिल्पकृती साकारत असलेल्या विद्यार्थ्यांची कलाकृती अगदी तल्लीन होऊन न्याहाळताना दिसले.
त्यामुळे शिल्पकृती प्रकारात सहभागी झालेल्या स्पर्धकांमध्येही उत्साह वाढला. महाविद्यालयीन विद्यार्थी छत्रपती शिवाजी महाराज यांची शाडूपासूनची शिल्पकृती करण्यात तल्लीन झाला होता. तर, कोणी उडता गरुड, हत्ती साकारत होते. काही विद्यार्थिनींनी मोर, स्तंभ साकारले. एका विद्यार्थिनीने सुंदर असे मायलेकराचे शिल्प साकारले होते. ही सारे शिल्प साकारत असताना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यांवरही समाधानाचे भाव उमटत होते.
या स्पर्धेमध्ये नाशिक शहरातील विविध महाविद्यालयांसह मालेगाव, सटाणा, संदीप फाउंडेशन, केटीएचएम, के. के. वाघ कृषी महाविद्यालय, आरवायके महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या स्पर्धेसाठी मविप्र संस्थेच्या औद्योगिक विद्यालयाचे निर्देशक सोपान मते परीक्षक होते.
"ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी ‘सकाळ-यिन’च्या कला महोत्सवाचे योगदान अतुलनीय आहे. कला महोत्सव या विद्यार्थ्यांसाठी व्यासपीठच आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना आपली कला साकारण्याची संधी तर मिळतेच, शिवाय त्यांना प्रोत्साहनही मिळते. सर्वसामान्य कलावंत विद्यार्थ्यांसाठी ‘सकाळ-यिन’ कला महोत्सव ‘फॅक्टरी’च आहे. कलावंत विद्यार्थ्यांनी अशा उपक्रमांचा लाभ घेत त्यातून संधी साधली पाहिजे." - सोपान मते, परीक्षक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.