मंत्री रावलांकडून नौकानयनपटू मनीषा माळीला एक लाखाची मदत

मंत्री रावलांकडून नौकानयनपटू मनीषा माळीला एक लाखाची मदत
Updated on

न्याहळोद (जि. धुळे) : विश्‍वकरंडक नौका नयन ड्रॅगन बोट स्पर्धेत राज्याचे नाव गाजविणारी न्याहळोद (ता. जि. धुळे) येथील जिगरबाज नौकानयनपटू मनीषा माळीची आर्थिक परिस्थितीमुळे आगामी अमेरिकेत होणाऱ्या स्पर्धेतील सहभागाची संधी हुकणार होती. यासंदर्भात 'सकाळ'ने आज (शुक्रवार) लक्ष वेधल्यानंतर दोंडाईचास्थित उद्योगपती सरकारसाहेब रावल आणि रोहयो व पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी पुढाकार घेत मनीषाला एक लाख रुपयांची मदत दिली. 

मनीषाला मदतीसाठी न्याहळोद येथेही लोकवर्गणी संकलित केली जात आहे. तिला सद्यःस्थितीत अमेरिकेतील स्पर्धेत सहभागासाठी दोन लाखांच्या निधीची गरज आहे. मनीषा ही ड्रॅगन बोट स्पर्धांमध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर महाराष्ट्राचे नाव गाजवित आहे. चीनमध्ये नुकत्याच झालेल्या ड्रॅगन बोट चॅम्पियनशिप स्पर्धेत तिने दमदार कामगिरी करत भारताला रौप्यपदक मिळवून दिले. तिला आता अमेरिकेत होणाऱ्या स्पर्धेतही अशीच उत्तुंग कामगिरी करून दाखवायची आहे; परंतु आर्थिक मदतीअभावी तिची ही संधी हुकण्याची भीती व्यक्त होत होती. या संदर्भात "सकाळ'ने लक्ष वेधल्यानंतर दखल घेत दोंडाईचास्थित उद्योगपती सरकारसाहेब रावल, पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी भाजपचे दोंडाईचाचे शहराध्यक्ष प्रवीण महाजन यांच्यामार्फत "सकाळ'शी संपर्क साधला. 

रावल गढीवर गौरव 

मनीषाला दोंडाईचा येथे बोलाविण्यात आले. रावल गढीवर मनीषाच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव करत तिच्याकडे उद्योगपती सरकारसाहेब रावल यांनी मंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते एक लाखाचा मदत निधी सुपूर्द केला. महाजन, भाजप किसान आघाडीचे प्रदेश चिटणीस रामकृष्ण खलाणे, मनीषाचे वडील हरीलाल माळी, नगरसेवक जितेंद्र गिरासे ,कृष्णा नगराळे आदी उपस्थित होते.

न्याहळोदसारख्या ग्रामीण भागातून रसायनशास्त्र विषयात पुण्यातून पदव्युत्तर शिक्षण घेत नौकानयनात प्रावीण्य मिळविणारी मनीषा देशाचे नाव चमकवित राहील. तिने तीन वेळा राष्ट्रीय स्तरावर ठसा उमटवत कांस्य पदके पटकावली आहेत. ऑलिंपिक स्पर्धेत भारताला सुवर्णपदक मिळवून देण्याचे तिचे स्वप्न आहे. ते पूर्तीसाठी उद्योगपती रावल, मंत्री रावल यांनी शुभेच्छा दिल्या. त्यांचेही मनीषाने आभार मानले. तिची आर्थिक स्थिती सर्वसाधारण आहे. वडील हरिलाल राजमल माळी हे गिरणी कामगार आहेत. तिला मदतीसाठी 98810 90464 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.