Dhule Electricity News : वीज महावितरण कंपनीच्या जळगाव परिमंडलात ऑनलाइन वीजबिल भरण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. सप्टेंबरमध्ये धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील सरासरी एक लाख ६१ हजार ८४८ ग्राहकांनी ४० कोटी १२ लाखांचा ऑनलाइन वीजबिल भरणा केला.
ऑनलाइन ग्राहकांची ही संख्या लघुदाब वर्गवारीतील आहे, अशी माहिती मुख्य अभियंता कैलास हुमणे यांनी दिली.(Online electricity bill payment is increasing day by day dhule news)
ऑनलाइन वीजबिल भरणा पद्धतीमुळे ग्राहकांना रांगेतून अधिकचा वेळ खर्ची घालण्याची गरज नाही. ऑनलाइन वीजबिल भरणामुळे ग्राहकांचा वेळ वाचतो. परिणामी, वीज यंत्रणेवरील वसुलीसाठीचा अतिरिक्त ताण कमी होण्यात मदत होत आहे.
एसएमएस सेवा
ग्राहकांना वीजसेवेबाबतचे एसएमएस देण्यासाठी ग्राहकांच्या मोबाईल क्रमांकाची नोंदणी सुरू आहे. ग्रामीण भागातील वीजग्राहकांची भाषेची सोय व्हावी म्हणून महावितरण कंपनीने आता इंग्रजीसह मराठी भाषेतूनही एसएमएस सेवा सुरू केली आहे.
धुळे जिल्ह्यातील एक लाख सहा हजार ६७७ ग्राहकांनी २८ कोटी ५३ लाख, तर नंदुरबार जिल्ह्यातून ५५ हजार १७१ ग्राहकांनी ११ कोटी ५९ लाख असा एकूण ४० कोटी १२ लाखांचा सप्टेंबरमध्ये ऑनलाइन वीजबिल भरणा केला. या प्रणालीस ग्राहक सकारात्मक प्रतिसाद देत आहेत.
ग्राहकांसाठी सुविधा
संगणकावर किंवा महावितरण मोबाईल-पे व महापॉवरपेच्या मदतीने वीजबिल भरण्याची सोपी पद्धत उपलब्ध आहे. ग्राहकांचा वेळ आणि श्रम वाचावेत, रांगेत तिष्ठत उभे राहाण्याची गरज भासू नये म्हणून महावितरणच्या www.mahadiscom.in या संकेतस्थळावर ग्राहकांना चालू वीजबिल भरण्याची सुविधा आहे.
ऑनलाइन बिल भरल्यास संगणकीकृत पावती ग्राहकाला मिळते. महावितरणचे मोबाईल ऑनलाइन ॲप्लिकेशन मराठी आणि इंग्रजी भाषेत उपलब्ध आहे. ही सेवा चोवीस तास उपलब्ध आहे. त्यामुळे ग्राहकांना वीजबिल केव्हाही आणि कुठूनही भरता येते.
अशी सुविधा आणि फ्री सेवा
एसएमएस सेवेसाठी वीजग्राहकांनी महावितरणकडे आपल्या मोबाईल क्रमांकाची नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणीसाठी ग्राहकांनी मराठी भाषेसाठी (कॅपिटलमध्ये MLANG) टाईप करून स्पेस देऊन आपला बारा अंकी वीजग्राहक क्रमांक टाकून ९२२५५९२२५५ या क्रमांकावर एसएसएस करावा.
महावितरणच्या ग्राहकांना विविध सेवांची माहिती तसेच त्यांच्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी आठवड्यातील सातही दिवस व चोवीस तास टोल फ्री सेवा उपलब्ध करून दिली आहे. ग्राहकांना १९१२ व १८००२३३४३५, १८००१०२३४३२ या क्रमांकावर तक्रार नोंदविता येईल, असे मुख्य अभियंता हुमणे यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.