Dhule News : विकासासाठी बळ देणाऱ्यांच्या मदतीसह सामुदायिक प्रयत्नांनी प्रगतीचे विविध टप्पे पार करीत स्वयंपूर्णतेकडे यशस्वीपणे वाटचाल करीत असल्याचे जिवंत चित्र आंबे (ता. शिरपूर) ग्रामपंचायतींतर्गत खड्डाफळी येथे पाहायला मिळते. ()
विविध भाज्यांनी बहरलेली परसबाग, वैशिष्ट्यपूर्ण फळझाडे लावून जोपासलेली आमराई, वृक्षारोपणाने हिरवागार झालेला परिसर, स्वतंत्र अंगणवाडी आणि जिल्हा परिषदेची शाळा, असा मनमोहक देखावा येथे द्वेता पटेल यांच्या संकल्पातून साकारला गेला आहे.
भावाची स्वप्नपूर्ती
खड्डाफळी हा चारशे लोकवस्तीचा पाडा आहे. मुरमाच्या टेकड्यावर वसलेल्या या पाड्याशेजारची शेतीही मुरमाड व त्यामुळे अल्प उत्पन्न देणारी होती. गावात ये-जा करण्यासाठी धड रस्ताही नव्हता. (कै.) मुकेशभाई पटेल यांचे सुपुत्र (कै.) तपन पटेल यांनी या पाड्याच्या विकासाचा निश्चय केला. त्यांनी एकेक काम हाती घेऊन सुरवात केली.
ही उजाड भूमी निसर्गरम्य पर्यटनस्थळात रूपांतरित करण्याचा संकल्प प्रत्यक्षात आणण्याचे काम सुरू असतानाच त्यांचे दुर्दैवी अपघाती निधन झाले. नंतर माजी नगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांची कन्या द्वेता पटेल यांनी खड्डाफळीच्या विकासाची धुरा खांद्यावर घेतली. भावाची स्वप्नपूर्ती करण्यासाठी त्यांनी नियोजन करून विविध उपक्रम राबविले.
तपन स्मृतिवन
वृक्षप्रेमी असलेल्या तपन पटेल यांनी येथे मोठी आमराई व फळबाग उभारणीचे नियोजन केले होते. द्वेता पटेल यांनी ग्रामस्थांशी चर्चा केली. सीताराम पावरा यांनी त्यांची दोन एकर शेती फळबागेसाठी उपलब्ध करून दिली. मुकेश पटेल चॅरिटेबल ट्रस्ट, भूपेशभाई ग्रीन आर्मी व आंबे ग्रामपंचायतीला सोबत घेऊन द्वेता पटेल यांनी आमराई तयार केली.
सोबतच विविध जातींची फळझाडे व बहुउपयोगी वृक्षांचीही लागवड केली. या बागेचे तपन स्मृतिवन असे नामकरण करण्यात आले आहे. ग्रामस्थांनी स्वयंस्फूर्तीने या झाडांच्या देखभालीची जबाबदारी स्वीकारली असून, त्यांची उत्तम निगा राखली आहे.
परसबाग फुलली
माँ गंगा परसबाग मंडल हा द्वेता पटेल यांचा महत्त्वाकांक्षी उपक्रम आहे. पाड्यावरील कुटुंबांची गरज भागेल इतक्या सकस व सेंद्रिय पालेभाज्या, फळभाज्या व वेलवर्गीय भाज्यांचे उत्पादन घेणारी परसबाग त्या साकारतात. त्यासाठी आवश्यक बियाणे, पाणी यांची उपलब्धता करून देतात.
खड्डाफळी येथे जागेच्या उपलब्धतेनुसार चौरस आकारात सुमारे ५० प्रकारच्या भाज्यांची लागवड केली आहे. येत्या काही दिवसांतच त्यातून प्रत्यक्ष उत्पन्न हाती येण्यास सुरवात होणार आहे. पाड्याची गरज भागविल्यानंतर उरलेला भाजीपाला बाजारात विक्री केला जाणार आहे. सेंद्रिय भाजीपाल्यास मिळणारा दर लक्षात घेता नियमित ठोस उत्पन्नाचे साधन ग्रामस्थांना गवसणार आहे.
शिक्षणाची सोय
खड्डाफळीसाठी माजी मंत्री तथा आमदार अमरिशभाई पटेल यांनी पाठपुरावा केल्याने जिल्हा परिषद प्रशासनाने स्वतंत्र अंगणवाडी आणि जिल्हा परिषद शाळा उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे पाड्यावरील मुलांना गावातच शिक्षण घेणे शक्य झाले आहे. तेथील शिक्षणावरही द्वेता पटेल यांचे लक्ष असून, वेळोवेळी त्या सूचना करीत असतात.
याकामी आंबे येथील सरपंच मीनाक्षी पावरा, उपसरपंच शिवाजी पावरा, ग्रामसेवक व्ही. बी. भोई, बाजार समिती संचालक कृष्णा पावरा, विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे अध्यक्ष आर. आर. माळी यांचे सहकार्य लाभते.
''ज्या तालुक्याने पटेल कुटुंबावर इतकी वर्षे अखंड विश्वास ठेवला, त्यांचे उतराई होण्याचा प्रयत्न करीत आहे. स्वयंपूर्ण गावांच्या माध्यमातूनच ग्रामीण भागाच्या विकासाला हातभार लागू शकेल.
आपल्या मूलभूत गरजा भागवताना अन्न, पाणी, निवाऱ्यासह शिक्षणाचा दर्जा उच्च असावा हा प्रत्येकाचा हक्क आहे. त्यादृष्टीने कामास मी प्राधान्य दिले आहे. हा प्रयोग ठिकठिकाणी राबविण्यात येणार आहे.''-द्वेता पटेल, संचालक, मुकेश पटेल चॅरिटेबल ट्रस्ट
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.