नंदुरबार : अपहृत, हरविलेले, भिक्षा मागणारे, कचरा गोळा करणारे तसेच समाजाच्या मुख्य प्रवाहापासून वंचित असणाऱ्या अल्पवयीन मुलामुलींचा शोध घेऊन त्यांच्या पालकांकडे किंवा बाल संरक्षण गृहाकडे सुपूर्द करण्यासाठी जिल्ह्यात ऑपरेशन मुस्कान दरवर्षी राबविण्यात येते.
यावर्षी १ ते ३१ डिसेंबर या कालावधीत जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्याअंतर्गत ही मोहीम राबविण्यात येत असून आत्तापर्यंत आठ मोहीम पूर्ण झाल्या आहेत.त्यात २४१ बालकांचा शोध घेऊन त्यांना त्ंयाचा पालकांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
शासनाची दरवर्षी मोहीम
महाराष्ट्रात सन २०१४ पासून ऑपरेशन मुस्कान ही मोहीम दि.१ ते ३१ जुलै या कालावधीदरम्यान राबविण्यात येते. संपूर्ण जिल्ह्यात सर्व पोलिस ठाण्यांमध्ये ही मोहीम राबविण्यात येत असून या मोहिमेंतर्गत अपहृत, हरविलेले, भिक्षा मागणारे, कचरा गोळा करणारे तसेच समाजाच्या मुख्य प्रवाहापासून वंचित असणाऱ्या अल्पवयीन मुलामुलींचा शोध घेऊन पालकांच्या स्वाधीन करण्यात येते. त्यानुसार अद्यापपावेतो आठ मोहीम राबविण्यात आल्या असून हजारो बालकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न राज्यासह नंदुरबार जिल्हा पोलिस दलाने केला आहे.
ऑपरेशन मुस्कान पथक
मुस्कनची नववी मोहीम १ ते ३१ डिसेंबर या कालावधीत जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्यांमध्ये राबविण्यात येत आहे. त्यामध्ये प्रत्येक पोलिस ठाण्यातून एक अधिकारी व चार अंमलदारांचे स्वतंत्र पथक स्थापन करण्यात आले आहे. याशिवाय जिल्हा बालकल्याण समिती, जिल्ह्यातील बाल संरक्षण गृहे, बालकांसाठी काम करणाऱ्या अशासकीय संस्था व बाल पोलिस पथकातील अधिकारी, अंमलदार यांचा देखील या मोहिमेत सहभाग आहे. या सर्व घटकांची जिल्हा पोलिस अधिक्षक कार्यालयात समन्वय बैठक घेऊन ऑपरेशन मुस्कान प्रभावीपणे राबविण्यासाठी रुपरेषा ठरविण्यात आली.
घर सोडलेले व हरविलेले परतले घरी
मोहिमेदरम्यान जिल्ह्यातील वेगवेगळे रेल्ये स्टेशन, बसस्थानक, धार्मिक स्थळे, हॉटेल्स, ढाबे या ठिकाणी काम करणारी बालके, भीक मागणारी व कचरा गोळा करणारी बालके यांचा शोध घेतला जात आहे. यात अद्यापपावेतो संपूर्ण कारवाईमध्ये अपहृत ३, हरविलेले २५ व्यक्ती तसेच बाल कामगार म्हणून काम करीत असलेल्या सुमारे २४१ मुलामुलींचा शोध घेऊन त्यांना पालकांच्या स्वाधीन करण्यात जिल्हा पोलिस दलाला यश आले आहे.
अधिकाऱ्यांचे विशेष प्रयत्न
ऑपरेशन मुस्कान-९ ही मोहीम पोलिस अधिक्षक महेंद्र पंडित, अपर पोलिस अधिक्षक विजय पवार, उपविभागीय पोलिस अधिकारी नंदुरबार, शहादा, अक्कलकुवा यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक विजयसिंग राजपूत यांच्या समन्वयातून सर्व पोलिस ठाणे, प्रभारी अधिकारी येथील विशेष पथकातील अधिकारी, अंमलदार यांच्या सहभागातून राबविण्यात येत आहे.
संपादन- भूषण श्रीखंडे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.