Nandurbar News : गणेशोत्सवात दर वर्षी येथील श्री काका गणेशमंडळातर्फे विविध जनहिताचे व समाजहिताचे उपक्रम राबवून जनजागृती करण्यात येते.
गणेशोत्सवाला काही दिवसांचा अवधी असला तरी या वर्षीदेखील श्री काका गणेशमंडळ सरसावले असून, सेंद्रिय शेती प्रकल्पातून रसायनमुक्त अन्नधान्य आरोग्यासाठी कसे उपयुक्त आहे याबाबत मंडळाने प्रबोधन सुरू केले आहे.
तसेच स्वखर्चाने जलपुनर्भरणाचा स्तुत्य उपक्रम राबवीत ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ असा संदेश दिला आहे. (Organic farming message from Shri Kaka Ganesh Mandal nandurbar news)
या स्तुत्य उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. भारतीय अर्थव्यवस्था कृषिप्रधान म्हणून ओळखली जाते. लोकसंख्या वाढल्यामुळे लोकांच्या गरजादेखील वाढल्या आहेत. त्यात पिकांचे उत्पादन घेताना शेतकऱ्यांचे जमिनीकडे दुर्लक्ष होत आहे. रासायनिक खते व औषधांच्या अतिवापरामुळे जमिनीचे आरोग्य खालावत चालले असून, जमीन नापीक होत आहे.
तसेच कीटकनाशकांच्या असंतुलित वापरामुळे जमिनीचा पोत खराब होत आहे. त्यातच कीटकनाशके व खतांच्या किमती प्रचंड वाढल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेती खर्चात वाढ होत आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीकडे वळून प्रदूषणमुक्त व रसायनमुक्त शेती करण्याची वेळ आली आहे. कमी उत्पादन खर्चामध्ये सेंद्रिय शेती करून शेतकऱ्यांमध्ये त्याचे महत्त्व वाढविणे गरजेचे झाले आहे.
दरम्यान, सेंद्रिय शेतीत नैसर्गिक साधनांचा वापर करून औषध, खते तयार करून व पारंपरिक बियाण्याचा वापर केला जातो. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या शेतात आरोग्यासाठी उपयुक्त सेंद्रिय मालाचे उत्पादन घेतले पाहिजे हा मंत्र देण्यासाठी येथील श्री काका गणेशमंडळ पुढे आला आहे.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
या वेळी विजय शेंडे, संजय शेंडे, महेंद्र शेंडे, अमर पिंपरे, राजेश शेंडे, सचिन राणे, श्रीनिवास पिंपरे, व्यंकटेश मगरे, दिनेश सागर, हितेश राणे, दिनेश बचकर, नचिकेत पिंपरे, मनीष सागर, मेहुल पिंपरे, विवेक राणे, वैभव कर्णकार, कार्तिक राजकुळे, वेदांत राणे, सुधांशू राणे यांसह सर्व गणेशभक्त उपस्थित होते.
पाणी अडवा, पाणी जिरवा
सर्व शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीकडे वळावे. नागरिकांनीदेखील सेंद्रिय भाजीपाला, फळे सेवन करून त्याबाबत आग्रही असावे. शेतकऱ्यांकडे सेंद्रिय शेती उत्पादनांची मागणी वाढल्यास तेदेखील सेंद्रिय शेतीकडे वळतील, असे प्रबोधन श्री काका गणेशमंडळ करीत आहे आणि यासाठी मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत. त्याचप्रमाणे मंडळ जलपुनर्भरणाचा महत्त्वपूर्ण संदेशदेखील देत आहे.
शासनाने प्रयत्न करूनदेखील कुणी जलपुनर्भरण म्हणजेच रेन वॉटर हार्वेस्टिंगकडे गांभीर्याने पाहत नाही ही शोकांतिका आहे. फक्त ‘पाणीपातळी खोल झाली’ अशीच ओरड सर्वच जण करतात. मात्र हव्या त्या उपलब्ध सुविधांचा वापर करून नियोजनबद्ध पद्धतीत जलपुनर्भरण करता येते. याचा अनुभव श्री काका गणेशमंडळाने दिला आहे.
येथील काकेश्वर मंदिर परिसरात जलपुनर्भरणासाठी स्वखर्चाने १०० फूट पाइप टाकला आहे. हा उपक्रम राबवून शहरात पाणी अडवा, पाणी जिरवा याचा संदेश मंडळातर्फे देण्यात आला आहे. या स्तुत्य उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.