पिंपळनेर (जि. धुळे) : येथील भूमिपुत्र जितेंद्र पुंडलिक बर्डे लिखित-दिग्दर्शित ‘टॉर्टुगा मोशन पिक्चर्स’ निर्मित ‘मोऱ्या’ची ढाका (Dhaka) सिनेमेकिंग इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये (Cinemaking International Film Festival) ‘मोऱ्या’ची एंट्री झाली आहे. चित्रपटात पिंपळनेर शहर व परिसरातील कलाकारांना संधी देण्यात आली असून, चित्रीकरणही (Shooting) शहरात व परिसरात झाले आहे. (Pimpalners jitendra barde film Morya to be screened in Dhaka Dhule News)
शहराचा रोज घाण होणारा चेहरा जिवावर उदार होऊन, कोणत्याही मूलभूत सोई - सुविधांविना आपले आरोग्य पणाला लावून नरकयातना भोगत गल्ल्या-गटारांची साफसफाई करणाऱ्या सीताराम जेधे उर्फ मोऱ्याची हृदयस्पर्शी कथा आगामी ‘मोऱ्या’ या चित्रपटातून पाहायला मिळणार आहे. लेखक, दिग्दर्शक आणि प्रमुख अभिनेता अशी त्रिसूत्री सांभाळण्यात यशस्वी ठरलेल्या जितेंद्र पुंडलिक बर्डे यांची ही पहिलीच कलाकृती ‘ढाका फेस्टिवल’ आयोजित 'सिनेमेकिंग इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल’ मध्ये निवडली गेली आहे. या चित्रपटाच्या टीझरचे प्रदर्शन जगप्रसिद्ध ‘कान्स महोत्सवात’ करण्यात आले होते, तेव्हाच चित्रपटाचा टिझर पाहून अनेक चित्रपट रसिक - समीक्षकांची उत्सुकता शिगेला पोचली होती.
या चित्रपटाची निर्मिती टॉर्टुगा मोशन पिक्चर्सचे तृप्ती कुलकर्णी, राजेश अहिवळे, सहनिर्माता मंदार मांडके यांनी केली आहे. उमेश जगताप, संजय भदाणे, धनश्री पाटील, राहुल रोकडे, सूरज अहिवळे, रुद्रम बर्डे, कुणाल पुणेकर, शिवाजी गायकवाड, दीपक जाधव, विजय चौधरी, अविनाश पोळ, रुपाली गायके आणि जितेंद्र बर्डे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटासाठी पिंपळनेर शहरातील अप्पर तहसीलदार विनायक थविल, अॅड. ज्ञानेश्वर एखंडे, संभाजी अहिरराव, नितीन नगरकर आदींनी सहकार्य केले आहे.
"‘मोऱ्या’ चित्रपटाचा विषय आणि सादरीकरणासाठी केलेले सखोल संशोधन, या निवडीने सार्थकी लागल्याचे सिद्ध झाले आहे. जगभरातील तसेच तळागाळातील सर्व सामान्य प्रेक्षकांपर्यंत ही ही कलाकृती पोचावी अशी सर्व कलावंतांची इच्छा होती आणि ती सुरवात 'सिनेमेकिंग इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल’ पासून होत असल्याने चित्रपटातून जे दाखवायचे आहे ते नक्की शेवटच्या प्रेक्षकांपर्यंत पोचेल अशी खात्री झाली आहे." - जितेंद्र बर्डे, दिग्दर्शक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.