महाविकास आघाडीतील सामंजस्य कायम राहील? 

mahavikas aghadi
mahavikas aghadi
Updated on

तळोदा : महाविकास आघाडीचे घटकपक्ष काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची येथील कृषी उत्पन्न बाजार समितीवर अशासकीय प्रशासक म्हणून नेमणूक झाली आहे. यामुळे पुढील काळात येणाऱ्या निवडणुकांतही या सामंजस्याचे परिणाम पाहावयास मिळू शकतात. त्यामुळे मात्र किमान तळोदा शहर व तालुक्यात तिन्ही पक्ष एकत्रित राहतील का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. याबाबत तिन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये चर्चा सुरू असून, येणाऱ्या काळात तळोदा तालुक्यात राजकीय वारे कोणत्या दिशेने वाहतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. 

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीवर राज्याच्या पणन विभागाने माजी सभापती व माजी आमदार उदेसिंग पाडवी यांच्या नेतृत्वाखाली अशासकीय प्रशासक मंडळ नेमले आहे. या मंडळात मुख्य प्रशासक म्हणून पाडवी, तसेच ज्येष्ठ संचालक व माकपचे नेते जयसिंग माळी, राष्ट्रवादीचे निखिलकुमार तुरखिया, आंबालाल पाटील, काँग्रेसचे गौरव वाणी, जितेंद्र सूर्यवंशी, दत्तात्रय पाटील, शिवसेनेचे गौतम जैन, संजय पटेल या पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत एकत्रित असणाऱ्या या पक्षांतील पदाधिकारी आता बाजार समितीचा कारभार पाहणार आहेत. तालुक्यात पुढील काळात ग्रामपंचायत निवडणूक तसेच तळोदा पालिका निवडणूक होणार आहे. माजी आमदार पाडवी भाजपमध्ये असताना त्यांच्याच नेतृत्वाखाली तळोदा पालिका भाजपकडे आली होती. किंगमेकरच्या भूमिकेत ते होते. आता मात्र ते राष्ट्रवादीत आहेत. त्यात पालिका निवडणुकीत त्यांची भूमिका नेहमीच महत्त्वाची राहिली आहे. त्यात अशासकीय प्रशासक मंडळ नेमल्याने तिन्ही पक्षांतील पदाधिकारी व कार्यकर्ते एकत्रित ठेवून त्यांनी भविष्यासाठी संदेश दिल्याचे मानले जात आहे. येणाऱ्या काळात ग्रामपंचायत व पालिका निवडणूक महाविकास आघाडी म्हणून लढविली गेली, तर आश्चर्य वाटायला नको, अशी परिस्थिती आहे. त्यात तळोदा तालुक्यातील राजकीय कार्यकर्ते महाविकास आघाडीतील या समन्वयाचे स्वागत करीत आहेत. 

बाजार समितीला ऊर्जितावस्‍था 
मागील संचालक मंडळ माजी आमदार उदेसिंग पाडवी यांच्याच नेतृत्वाखाली होते. त्या वेळी त्यांनी बाजार समितीचे रूप पालटत समितीची उलाढाल वाढविली होती. सर्वांना सोबत घेऊन बाजार समितीला ऊर्जितावस्था प्राप्त करून दिली होती. तेव्हा संचालक मंडळाला सहा महिने मुदतवाढही मिळाली होती. मात्र त्यानंतर कोरोनामुळे निवडणूक घेता आली नव्हती, तर पाडवी राष्ट्रवादीत आले आहेत. महाविकास आघाडीत राष्ट्रवादी घटक असल्याने अशासकीय प्रशासक मंडळ नेमताना तिन्ही पक्षांतील पदाधिकाऱ्यांची नेमणूक करून त्यांनी राजकीय मुत्सद्देगिरी दाखविली आहे.  

संपादन- भूषण श्रीखंडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.