चाळीसगाव : गिरणा पट्ट्यात यंदा पावसाने टक्केवारीतील शंभरी ओलांडली आहे. सलग तीन दिवस परिसरात मुसळधार पाऊस झाला. अगोदरच ढगाळ वातावरणामुळे कपाशीवर प्रतिकूल परिणाम झाला आहे. त्यात जमिनीतील अतिरिक्त पाण्यामुळे कपाशीवर लाल्या रोग पडला असून, बोंडअळी, फुलकिडे व पांढरी माशी या रोगांनी पिकांचे नुकसान होत आहे. यावर्षी जास्तीच्या पावसाचा फटका बसल्याने कापूस उत्पादनात पंचवीस टक्के घट होण्याची शक्यता आहे. नगदी पीक हातचे गेल्याने ग्रामीण अर्थकारणावर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त होत असल्याने बळीराजा हताश झाला आहे.
कपाशीवर‘लाल्या’रोगाची भीती
चाळीसगाव तालुक्यात सतत पडणाऱ्या या पावसामुळे कपाशी लाल पडत चालली आहे. तालुक्यातील ९० हजार ४२८ हजार हेक्टरवर जमीन लागवडीखाली आहे. त्यामध्ये बागायत कपाशी २३ हजार हेक्टर व जिरायत कपाशी २८ हजार हेक्टरने लागवड झाली असून एकूण ५१ हजार ९१४ हेक्टर कपाशी लागवड असून काही भागात होणाऱ्या सततच्या पावसामुळे मर रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता कृषी विभागाने वर्तविली आहे.
पंचनामे करण्याची मागणी
खरिपाच्या सुरवातीला पुरेसा पाऊस झाल्यानंतर कापसाची लक्षणीय लागवड झाली. किमान पाच हजार रुपयांपेक्षा प्रतिक्विंटल दर मिळणे अपेक्षित असल्याने क्षेत्र वाढले. पावसाची गरज असताना मध्यंतरी खंड पडला होता. सप्टेंबरच्या अखेरीस जोरदार पाऊस होत आहे. सततच्या या पावसाने कापसासह मका, ज्वारी, बाजरी या पिकांना सर्वाधिक फटका बसला आहे. नदीकाठच्या पिकांची अवस्था बिकट आहे. जमिनीत पाणी असल्याने पिकांना ‘नत्र’ घेता येत नाही. काही काळ ही परिस्थिती कायम राहिल्यास कपाशीवर ‘लाल्या’ रोग पडतो असे कृषितज्ज्ञांनी सांगितले.
कापूस उत्पादनात घट होण्याची शक्यता
सध्या रसशोषक किडी वाढण्यासाठी ढगाळ वातावरण कारणीभूत ठरले आहे. फुलकिडे, पांढरी माशी आणि बोंडअळी या रोगांनी झाडांवर परिणाम झाला आहे. पावसात फवारणी शक्य नसल्याने ठिकठिकाणी नुकसान झाले. तीन दिवस शेतात पाणी राहिल्यास नुकसानीची तीव्रता जास्त असते. मुसळधार पावसाचा दुष्परिणाम झाल्यामुळे कापूस उत्पादनात २५ टक्के घट होण्याची शक्यता आहे. काही भागात पावसाचा जोर जास्त असल्याने जवळपास निम्मे उत्पादन घटले आहे. लागवड आणि मशागतीवर मोठा खर्च झाल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. अतिवृष्टी आणि रोगराईने नुकसान झालेल्या क्षेत्राचा तातडीने पंचनामा करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
कापसाची प्रत खराब
शेतात साचलेले पाणी तातडीने बाहेर काढणे आवश्यक असते. पिकांचे नुकसान टाळण्यासाठी मॅग्नेशिअम सल्फेट व युरियाची फवारणी करतात. या उपाययोजना करणाऱ्या शेतकऱ्यांचे नुकसान कमी झाल्याचे दिसत आहे. मात्र, इतर ठिकाणी प्रचंड नुकसान झाले आहे. जास्तीच्या पाण्यामुळे बोंडे परिपक्व झाली नाही. याचा परिणाम उत्पादनावर झाला असून कापसाची प्रत बिघडली आहे.
मेहुणबारे परिसरात जोरदार पाऊस
मेहुणबारे परिसरात शुक्रवारी (ता.२७) दुपारी तीनला जवळपास अर्धा तास जोरदार पाऊस झाला. पावसाचा एवढा वेगात होता, की रस्त्यावरील समोरुन येणारे वाहन देखील दिसत नव्हते. दुपारी काही वेळ उघडीप घेतल्यानंतर पुन्हा सायंकाळी सहाच्या सुमारास जोरदार पाऊस सुरू झाला होता. सततच्या पावसामुळे शेतकरीही आता वैतागला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.