तळोदा : अत्यंत विषारी जातीतील व दुर्मिळ आढळणारा हिरव्या रंगाचा बांबू पीट वायपर अर्थात हिरवा घोणस साप अस्तंबा शिखराच्या उतरंडीवर अस्तंबा यात्रेकरूंना आढळला.
ज्या ठिकाणाहून यात्रेकरू शिखरावरून खाली उतरतात अशाच ठिकाणी झुडूप वजा झाडावर साप बसलेला आढळला. दुसरीकडे मात्र या दुर्मिळ पीट वायपरचे दर्शन झाल्याने सातपुड्यातील जैवविविधता पुन्हा एकदा चर्चेत आली.
दुसरीकडे तळोद्यातील यात्रेकरूंना गोऱ्यामाळ टेकडीजवळ अस्वलांचेदेखील दर्शन झाल्याने सुखद अनुभव यात्रेकरूंना आला आहे. त्यात सर्वांची यात्रा सुखरूप पार पडल्याने सर्वांनीच ‘अस्तंबा ऋषी की जय’चा घोष केला आहे. (Rare poisonous bamboo peat viper found in Satpuda range Astamba rushi devotee Sights Snake to Pilgrims Nandurbar News)
सातपुडा पर्वतातील जैवविविधता नेहमीच चर्चेचा विषय असते. अनेक दुर्मिळ वनौषधींचे व प्राण्यांचे सातपुडा हे माहेरघर आहे. सध्या सातपुड्याच्या दऱ्याखोऱ्यांत अस्तंबा ऋषींच्या यात्रेनिमित्त भाविकांची अलोट गर्दी झाली आहे.
तळोद्यातील भाविक दिनेश कोळी व त्यांचे मित्र अस्तंबा शिखरावरून खाली उतरत असताना रस्त्यालगत एका झाडावर काही मित्रांचे लक्ष गेले. त्या वेळी हिरव्या रंगाच्या त्रिकोणी आकाराचे तोंड असलेला साप त्यांच्या दृष्टीस पडला.
दिनेश कोळी यांना सर्पाचे ज्ञान असल्याने त्यांनी लागलीच सर्वांना सतर्क केले व हा साप अत्यंत विषारी जातीतील असल्याचे सांगितले. सापास ‘चापडा’ अथवा ‘हिरवा घोणस’ असेदेखील म्हटले जाते.
हा साप लहान झुडपांच्या फांद्यांवर व वेलींवर राहतो. हिरवा घोणस अंडी न घालता थेट पिल्लांना जन्म देतो. वेळेचे भान ठेवून कोणतीही हालचाल न करता तसेच सापाला आहे त्याच अधिवासात राहू देऊन यात्रेकरूंनी पुढचा मार्ग स्वीकारला.
मात्र अत्यंत विषारी जातीतील दुर्मिळ साप दृष्टीस पडल्याने यात्रेकरूंना छायाचित्र काढण्याचा आवर घालता आला नाही व त्यांनी सुरक्षितपणे छायाचित्र काढले. मात्र यानिमित्ताने पुन्हा एकदा सातपुड्याच्या डोंगरदऱ्यांत असलेली जैवविविधता जगासमोर आली आहे.
अस्वलांचेदेखील दर्शन
गोऱ्यामाळ टेकडीजवळ अस्वलांचेदेखील दर्शन तळोद्यातील यात्रेकरूंना झाले आहे. दोन पिल्ले व त्यांची आई अशी तीन अस्वले यात्रेकरूंच्या दृष्टीस पडली. मात्र सुरक्षितपणे सर्वांनी आपली यात्रा सुरू ठेवली व वन्यजीवांनाही कोणताही त्रास झाला नाही.
त्यामुळे सुरक्षितपणे आपली यात्रा पूर्ण झाल्याने यात्रेकरूंनी अस्तंबा ऋषी ‘महाराज की जय’चा घोष केला.
"आम्ही मित्रांसह अस्तंबा शिखराखाली उतरत असताना हिरव्या रंगाचा अत्यंत विषारी बांबू पीट वायपर साप दृष्टीस पडला. आम्ही सर्व जण सुरक्षितरीत्या तेथून खाली उतरलो. सातपुड्याच्या जैवविविधतेत बांबू पीट वायपर दृष्टीस पडणे मोठी घटना आहे."
-दिनेश कोळी, अस्तंबा यात्रेकरू, तळोदा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.