Diwali 2023 : गोड-धोडसोबतच वाहन, सोने, नवीन गृहप्रवेश, नवीन व्यावसायिक प्रारंभासोबतच सायंकाळी घरोघरी लक्ष्मीपूजनाने जिल्ह्यात दिवाळीचा आनंद व उत्साह दिसून आला. मित्र-आप्तेष्टांसोबतच राजकीय, सामाजिक नागरिकांनी दीपपर्वाच्या एकमेकांना शुभेच्छा दिल्या.
दिवाळी म्हणजे साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त मानला जातो. या मुहूर्ताची वाट नागरिक आतुरतेने पाहत असतात. (residents of Nandangari celebrate Lakshmi Pujan with enthusiasm nandurbar news)
एखाद्या वस्तूची खरेदी असो की नवीन प्रतिष्ठानाची सुरवात, नवीन गृहप्रवेश असो की नवीन वस्तूची खरेदी, वाहन, सोने खरेदी आदींसाठी नोकरदार असो, की सर्वसामान्य शेतकरी ते दिवाळीला खरेदी करू, असे उत्तर देत असतात. त्यामुळे दिवाळी ही आनंदाची पर्वणी मानली जाते. त्याचसोबत दिवाळीचा दीपोमय प्रकाशाने तिमिरातून तेजाकडे नेण्याचा मार्ग अनेकांना सापडतो.
दीपोत्सवानिमित्त आठ दिवसांपासून बाजारपेठेत खरेदीसाठी नागरिकांची झुंबड उडाली होती. ती रविवारी (ता. १२) लक्ष्मीपूजनाच्या दिवशीही दिसून आली. रविवारी अनेकांनी नवीन बांधकामाचे भूमिपूजन केले. काहींनी चारचाकी, मोटारसायकल, स्कूटी खरेदी करीत स्वतःसह मुला-मुलींच्या आनंदात भर घातली.
नवीन बांधकाम केलेल्या घरात मुहूर्तावर गृहप्रवेश करीत स्वतःच्या घरात राहण्याचा प्रारंभ केला. काहींनी नवीन व्यवसायाच्या प्रारंभांचा मुहूर्त साधला. यासोबतच व्यापारी-व्यावसायिकांनी आपल्या दुकानात झेंडूच्या फुलांच्या माळांनी सजवून सायंकाळी लक्ष्मीपूजन-चोपडीपूजनाचा मुहूर्त साधत दिवाळी पर्वणीचा आनंद लुटला.
मिठाईतून वाढला गोडवा
दरम्यान, रविवारी सकाळपासूनच मिठाई विक्रेत्यांकडे व ठिकठिकाणी लावलेल्या स्टॉलवर नागरिकांनी मिठाई, फरसाण, काजू कत्ली, बासुंदी, रबडी आदी खरेदीसाठी गर्दी केली होती. हजारो किलो मिठाई विक्रीतून लाखोंची उलाढाल झाली. नागरिकांनी घरासोबतच मित्र-आप्तेष्टांना मिठाई भेट देऊन दिवाळीचा गोडवा वाढविताना दिसून आले.
कपडे, सोने खरेदीला पसंती
कपडे, सोने खरेदीसाठी कापड बाजारात व सराफ बाजारात मोठी गर्दी दिसून आली. रेडीमेड कपडे व साड्यांचा दुकानात दोन दिवसांपासून व्यापाऱ्यांना जराही उसंत मिळाली नसल्याचे चित्र होते. अक्षरक्षः नागरिकांनी गर्दीमुळे पसंतीच्या दुकानात कपडे खरेदीची संधी मिळाली नाही. कारण दसऱ्याची बाजारपेठ थंड होती.
त्यातच दुष्काळी तालुक्यामुळे शेतकरी कुटुंबाकडे आर्थिन नियोजन नव्हते. मात्र दिवाळीला साऱ्यांनीच गर्दी केली होती. तशीच परिस्थिती सराफ बाजारात होती. नोकरदार वर्गाकडून व व्यावसायिकांकडून सोने खरेदीला प्रतिसाद असल्याचे चित्र होते. मात्र या वर्षी शेतकरी कुटुंब सराफ बाजाराकडे फिरकलेच नसल्याचे चित्र होते.
लक्ष्मीपूजन उत्साहात
रविवारी व्यापारी-व्यावसायिकांसाठीची दिवाळी होती. म्हणजेच व्यापाऱ्यांची दिवाळी लक्ष्मीपूजन मानली जाते. सकाळपासूनच व्यापारी-व्यावसायिक दैनंदिन व्यापारासोबत लक्ष्मीपूजनाच्या तयारीचा गडबडीत दिसून आले. दुकानांची स्वच्छता, फुलमाळा लावत सजावट करणे, चोपडे आणणे या धावपळीत होते.
सायंकाळी पाचनंतर व्यावसायिकांनी प्रतिष्ठानांमध्ये लक्ष्मीपूजन केले. त्यानंतर घराघरांत नागरिकांनी आपल्या कुलदैवत पूजनासह घरातील लक्ष्मीदेवतेचे मनोभावे पूजन केले. वाहनांची स्वच्छता करीत फुलमाळा घालून पूजन केले. त्यामुळे दिवसभर शहरासह जिल्ह्यात दिवाळीचा उत्साह दिसून आला.
झेडूची फुले तेजीत
दसरा-दिवाळी सणाला झेंडूच्या फुलांना विशेष मागणी असते. शेतकरी त्या नियोजनाने त्याची लागवड व काढणी करतात. दसऱ्याच्या वेळेस बाजारपेठेत ३० ते ५० रुपये किलो झेंडूची फुले विक्री झाली होती.
मात्र दिवाळीची संधी साधत फुले विक्रेत्यांनी रविवारी १०० रुपये किलो दराने फुलांची विक्री केली. शेतकऱ्यांकडून मात्र १० ते २० रुपये दराने खरेदी केली. शेतकऱ्यांपेक्षा फुले विक्रेत्यांनीच खरी दिवाळी साजरी केली.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.