Dhule News: शासकीय सेवेतील कर्मचाऱ्यांना नोकरीचा प्रारंभ दिवस जितका महत्त्वाचा असतो तितकाच निवृत्तीचा दिवसदेखील महत्त्वाचा असतो. हा दिवस संस्मरणीय व्हावा यासाठी प्रत्येक जण प्रयत्नशील असतो.
येथील तहसील कार्यालयातील शिपाई अशोक धर्मा भामरे यांचा निवृत्तीचा दिवसदेखील संस्मरणीय राहिला. त्याला निमित्त ठरले तहसीलदार साहेबराव सोनवणे यांनी त्यांचा केलेला अनोखा सन्मान. (retired peon has honor of sitting on Tehsildar chair in dhule news)
येथील तहसील कार्यालयात शिपाई म्हणून कार्यरत भामरे त्यांच्या महसूल विभागातील ४० वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर ६ डिसेंबरला निवृत्त झाले. निवृत्तीनिमित्त त्यांचा कार्यालयात सत्कार, सन्मान करण्यात आला.
चाळीस वर्षांच्या सेवेत अनेक तहसीलदारांचा सहवास लाभलेल्या श्री. भामरे यांच्या नोकरीचा शेवटचा दिवस सर्वांच्या आठवणीत राहावा यासाठी तहसीलदार सोनवणे यांनी त्यांचा अनोखा सन्मान केला. तहसीलदार सोनवणे यांनी भामरे यांना थेट त्यांच्या तहसीलदारांच्या खुर्चीवर बसवून सन्मान केला. तहसीलदारांच्या या अनोख्या कृतीचे श्री. भामरे यांच्यासह उपस्थित सर्वांनाच कौतुक वाटले.
बेल वाजल्यानंतर आणला चहा
अशोक भामरे तहसील कार्यालयात शिपाई म्हणून कार्यरत असताना आजवर अनेक तहसीलदार, विविध अधिकारी यांच्या सेवेसाठी ते तत्पर राहिले.
नेहमी तहसीलदारांना हवी असणारी फाइल आणून देणे, त्यांना अन् त्यांच्याकडे येणाऱ्या पाहुण्यांना चहा-पाणी देणे, त्यांनी सांगितलेली सर्व कामे पार पाडणे, ही कामे त्यांनी केली.
अशा वेळी त्यांच्या याच सेवेची कृतज्ञता म्हणून निवृत्ती समारंभात श्री. भामरे तहसीलदारांच्या खुर्चीवर बसले असताना त्यांनी बेल वाजविल्यानंतर त्यांना स्वतः तहसीलदार सोनवणे यांनी चहा आणि पाणी आणून दिले. तहसीलदार सोनवणे यांच्या या कृतीचे सर्वांनी कौतुक करत ज्या शिपायाने तहसीलदारांच्या खुर्चीची काळजी वाहिली त्याच खुर्चीवर त्याच्या नोकरीचा शेवटचा दिवस सन्मानपूर्वक जावा हे सर्वांसाठी अनपेक्षित होते.
या निवृत्ती सोहळ्याप्रसंगी तहसीलदार सोनवणे, नायब तहसीलदार गोपाळ पाटील, सी. जे. शिंपी, राजेंद्र सोनवणे आदींसह महसूल विभागातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.