वणी (नाशिक) : महाराष्ट्रातील साडेतीन शक्ती पीठापैकी अर्धे पीठ असलेल्या आदिशक्ती सप्तश्रुंगी गडावर उद्या (ता. २५) पासून चैत्रोत्सवास सुरुवात होत असून भाविकांच्या सोयी सुविधेसाठी प्रशासकीय यंत्रणेबरोबरच सप्तश्रृंगी देवी ट्रस्ट व सप्तश्रृंगी ग्रामपंचायत सज्ज झाली आहे.
सप्तश्रृंगी गडावर (वणी) रामनवमी- २५ मार्चपासून २ एप्रिलपर्यंत च्या कालावधीत होणाऱ्या चैत्रोत्सवासाठी गुजरात, मध्यप्रदेश राज्यासह धुळे, जळगाव, नंदुरबार या खांदेशातील जिल्हे तसेच कसमा भागातून सुमारे १० लाखांवर भाविक गडावर हजेरी लावतात. त्यातील दीड लाखावर भाविक पदयात्रेने गडावर हजेरी लावतात. यावर्षी निसर्गाने थोडयाफार प्रमाणात साथ दिल्याने पिके समाधानकारक आली, मात्र शेतीमालास अपेक्षीत भाव नसल्यामुळे बळीराजावरचे आर्थिक संकट कायम आहे. असे असले तरी आदीमायेचे माहेर असलेल्या खांदेशातून आई भगवतीच्या भेटीसाठी आपले सर्वकामे अडीअडचणी दूर ठेवून सप्तश्रृंगी गडावर हजेरी लावतात.
अडीचशे, तीनशे किलोमीटर पायी प्रवास करुन आईच्या दर्शनास येणार्या या भाविकांचा मिलन सोहळा चावदस म्हणजेच चतुर्दशीच्या (खांदेशात चतुर्दशीला चावदस म्हणतात) दिवशी पाहाण्यासारखा असतो. यंदाच्या चैत्रोत्सवात २९ मार्च ते १ एप्रिल या दरम्यान सलग चार दिवस सुट्टया आल्याने तसेच दहावी व बारावीच्या परीक्षाही संपल्यामुळे या कालावधीत गडावर भाविकांची उच्चांकी गर्दी होण्याची शक्यता असून त्यादृष्टीने प्रशासकीय यंत्रनेबरोबरच सप्तश्रृंगी देवी देवस्थान ट्रस्ट, सप्तश्रृंगी गड ग्रामपंचायतीने नियोजन केले आहे.
उत्सव कालावधीत श्री भगवती मंदिर २४ तास खुले ठेवण्यात येणार आहे. मंदिर ते पहिली पायरी, धर्मशाळा तसेच महत्त्वाच्या ठिकाणी गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी ७५ सीसीटीव्ही कॅमेरे, ध्वनिक्षेपण, मंदिर व पहिली पायरी येथे चार डोअर मेटल डिटेक्टर, नऊ हॅण्ड मेटल डिटेक्टर, मर्क्युरी लाइटची व्यवस्था करण्यात आली आहे. भाविकांसाठी नारळ फोडण्यासाठी पहिली पायरी येथे मशिनची व्यवस्था केली आहे. पुजेच्या साहित्या व्यतिरीक्त मंदीरात इतर साहित्य नेण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच न्यासाने सुरक्षेच्या दृष्टिने पाच बंदुकधारी सुरक्षारक्षक तसेच २५ इतर सुरक्षारक्षक यांची नेमणूक केली आहे. सोळा ठिकाणी बारींची व्यवस्था केली आहे. यासाठी ६० कर्मचाऱ्यांची नेमणूक केली आहे.
न्यासाने श्री भगवती मंदिर, सभामंडप, पायऱ्या, भक्तनिवास, परतीचा रस्ता, भक्तांगण, शिवालय तलाव आदी ठिकाणी पुरेशा लाइटची व्यवस्था केली आहे. पायऱ्यांच्या ठिकाणी प्रशिक्षित कर्मचाऱ्यांसह अग्निशमन सिलिंडरची व्यवस्था केली आहे. तसेच गडावरील आग विझविण्यासाठी नाशिक महानगरपालिकेकडून अग्निशमन बंबांची व्यवस्था करण्यात येते. साफसफाई अस्तीत्व मल्टीपर्पज या एजन्सीची नेमणूक करण्यात आली आहे. न्यासातर्फे भाविकांसाठी २०० खोल्यांची आवश्यक सुविधेसह केली आहे. प्रसादालयात सकाळी ११.३० ते रात्री १०.३० या कालावधीत भाविकांना मोफत महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे.
गडावर सुरक्षेच्या दृष्टीने पावला पावलावर चोख पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. गर्दी तपासणीमुळे थोपवून राहू नये याची काळजीही घेण्यास पोलिस यंत्रणेला सुचना देण्यात आले असून एका मीनटास सर्वसाधारण ७० भाविक दर्शन घेवून बाहेर पडतील असे नियोजन करण्यात आले आहे. भाविकांना मंदीरातील देवीच्या विधीचे दर्शन व्हावे यासाठी मंदिर, पहीली पायरी, प्रसादालय व मुख्य कार्यालयात क्लोज सर्किट टीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत.
गडावरील हॉटेल्स व खादय पदार्थ विक्री करणाऱ्या दुकानातून भेसळीचे प्रकार होवू नये म्हणून अन्नभेसळ प्रतिबंधासाठी जिल्हा परिषद आरोग्य विभागातर्फे तपासणी अधिका-यांच्या नेमणूका करण्यात आल्या आहेत. भाविकांना मोफत आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी गडावरील न्यासाच्या रूग्णालयात न्यास व जिल्हा परिषदे मार्फत मोफत औषधोपचार उपलब्ध करून देण्यात आले असून चार रूग्णवाहिकांसह १० वैद्यकिय अधिकारी, सुमारे 40 आरोग्य सेवक - सेविकांचे पथक तैनात करण्यात आले आहे. यात्रोत्सव काळात गडावर खासगी वाहनांना जाण्यास पूर्णत: बंदी असून नांदुरी येथे १६ एकर जागेत वाहनतळ उभारण्यात आले आहे. या कालावधीसाठी फक्त परिवहन महामंडळाच्या बसेस धावणार आहे. त्यासाठी ६० बसेस गडावर जाण्यासाठी दर मिनिटाला नांदुरीहून बस सोडण्यात येतील. नाशिक येथून जुन्या सीबीएस बस स्थानकातून ७५ तर जिल्हयातील अन्य अागारातून शंभरावर बसेस सोडण्याचे नियोजन महामंडळाने केले आहे.
पहिल्या पायरीवरील न्यासाच्या कार्यालयात नियंत्रण कक्ष उघडण्यात येणार आहे. गडावर एैन वेळेस उद्भवणाऱ्या आपत्तीसाठी २४ तास अग्निबंब सुविधा व प्रथोमोपचार केंद्र कार्यान्वित करण्यात आले आहे. भाविकांना २४ तास लॉकर, चप्पल स्टॅन्डची व्यवस्था करण्यात आली असून २४ तास सुरळीत विद्युत पुरवठा सुरळीत राहाण्यासाठी नियोजन करण्यात येणार आहे. यात्रोत्सव काळात मुबलक प्रमाणात पिण्याचे पाणी उपलब्ध करुन देण्यासाठी न्यासाचे दोन , प्रशासनाच्यावतीने ५ पाण्याचे टॅंकरद्वारे गडावर पाणी पुरवठा करण्यात येत आहे.
चैत्रोत्सव यशस्वी करण्यासाठी सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रातांधिकारी अमन मित्तल यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार कैलास चावडे, उपविभागीय पोलिस अधिकारी देविदास पाटील, न्यासाचे विश्वस्त मंडळ, मुख्य कार्यकारी अधिकारी सुदर्शन दहातोंडे, व्यवस्थापक भगवान नेरकर, जनसंपर्क अधिकारी भिकन बाबळे, सरपंच सुमन सुर्यवंशी, उपसरपंच राजेश गवळी, सर्व प्रशासकीय विभागाचे अधिकारी, कर्मचारी, ग्रामस्थ प्रयत्नशिल आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.