Sarangkheda Yatra : देशात पहिल्या क्रमांक असलेल्या व विविध वैशिष्ट्ये जपलेल्या सारंगखेडा येथील एकमुखी दत्ताच्या यात्रेला मंगळवारी (ता. २६) हजारो भाविकांच्या साक्षीने ‘दत्त प्रभू की जय’चा जयघोष करीत उत्साहात सुरवात झाली.
तत्पूर्वी सायंकाळी दत्ताच्या मूर्तीला अभिषेक व महाआरती करून पालखीतून मिरवणूक काढण्यात आली होती. यात्रेच्या पहिल्या दिवशी दहा हजार भाविकांनी दर्शन घेतले. या वेळी मंदिर परिसरात भक्तांनी मोठ्या प्रमाणावर नवस फेडण्यासाठी गर्दी केली होती.
दरम्यान, अश्व बाजारात आतापर्यंत २७० घोड्यांच्या विक्रीतून एक कोटी सहा हजारांची उलाढाल झाली. (Sarangkheda Yatra 10 thousand devotees attended on first day nandurbar news)
हुडहुडी भरणाऱ्या थंडीतही आज पहाटेपासून मंदिरात दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. नवस फेडण्यासाठी तुला केली जात होती. दिवसभरात आठशेहून अधिक तुलाचे नवस फेडण्यात आले. नवसपूर्तीसाठी संबंधितांचे कुटुंबीय व नातेवाइकांची हजेरी लागली.
‘श्री दत्तात्रेय प्रभू महाराज की जय, गोपाळ कृष्ण महाराज की जय’च्या जयघोषाने महानुभाव पंथीय, अन्य दहा हजारांहून अधिक भाविकांनी दर्शन घेतले. या ठिकाणी महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र बॅरिकेडिंग लावण्यात आले आहेत. मंदिरापासून ८०० मीटरपर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूला रांगा लागल्या होत्या. मंदिर प्रशासनातर्फे भाविकांसाठी सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
पोलिस बंदोबस्त वाढवावा
यात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी पोलिसांना गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागली. ऐन यात्रोत्सवाच्या काळात येथील पोलिस ठाण्याचे निरीक्षक संदीप पाटील यांच्यावर लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली. त्यांचा जागेवर पोलिस विभागाने प्रभारी पोलिस अधिकारी दिले असले तरी त्यांना यात्रेचा अनुभव, माहिती नसल्याने यात्रेवरील गर्दीवर नियत्रंण मिळविता आलेले नाही.
यात्रेच्या ठिकाणी पोलिस चौक्या उभारल्या आहेत. मात्र त्या रिकाम्या दिसून आल्या. यात्रास्थळांवर पोलिस कर्मचारी दिसून न आल्याने भुरट्या चोऱ्या, पाकीटचोरी असे किरकोळ प्रकार घडून आले. मुख्य रस्त्यावर अवजड वाहनांमुळे वाहतुकीची कोंडी झाली होती.
घोडे बाजारात चैतन्य
अश्व बाजारात यंदा मोठ्या प्रमाणावर उमदे घोडे विक्रीसाठी आले आहेत. यात पांढरे, काळे व सब्जा रंगाचे घोडे अधिक आहेत. आतापर्यंत तीन हजार घोडे दाखल झाले आहेत. यंदा सर्वाधिक विक्रमी घोडे विक्रीसाठी आले आहेत. आज अखेर २७० घोडे विक्रीतून एक कोटी सहा हजारांची उलाढाल झाली आहे. सर्वाधिक किमतीचा कोणता घोडा विक्रीला जातो, याकडे लक्ष्य आहे. त्यासाठी देशभरातून अनेक खरेदीदार येथे दाखल झाले आहेत.
अनेकांची पायी वारी
परिसरातून अनेक भाविक भक्तांनी आपल्या मूळ गावापासून पायी वारी करून सारंगखेडा येथील श्री दत्ताचे दर्शन घेतले. त्यांच्यासाठी गावागावात अनेक ठिकाणी त्यांना चहा- नाश्त्याची सोय ग्रामस्थांतर्फे करण्यात आली होती. दर वर्षी भाविकांचा पायी वारीचा ओढा वाढत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.