Nandurbar News : येथील प्राथमिक शाळा जीर्ण असल्याने गेल्या वर्षी शासनस्तरावरून दखल घेत, खबरदारी म्हणून शाळेचे निर्लेखन करण्यात आले. त्या जागी नवीन निर्मितीसाठी शासनस्तरावर ग्रामपंचायत व शालेय व्यवस्थापन समितीमार्फत प्रस्तावही पाठविण्यात आले.
मात्र एक वर्षाहून अधिक वेळ उलटूनही नवीन शाळा उभारण्यासाठी मंजुरी आदेश मिळत नसल्याने पालक वर्गाकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. (School premises in Kalambur are in dilapidated condition due to lack of funds nandurbar news)
येथील जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा अंगणवाडीच्या अगदी जवळ लागून आहे. यामुळे विद्यार्थ्यांना सांभाळण्याची शिक्षकांची जबाबदारी वाढली होती. विद्यार्थ्यांच्या जिवाला होणारा धोका लक्षात घेता, ग्रामपंचायत, शिक्षक, पालक व शालेय व्यवस्थापन समितीने पुढाकार घेत शासनस्तरावर जीर्ण वर्गखोल्यांचे निर्लेखन करण्यासाठी प्रस्ताव सादर केला व याची दखल जिल्हा परिषद प्रशासनाने घेत, जीर्ण वर्गखोल्यांचे निर्लेखन केले व येथील साहित्य लिलाव पद्धतीने देऊन याच जागेवर नवीन शाळा उभारण्यासाठी शासनस्तरावरून निधीचा अभाव असल्याने, गेल्या एक वर्षापासून काही हालचाली दिसून येत नाहीत.
शाळेची जागा पडक्या व भग्नावस्थेत असल्याने येथील विद्यार्थ्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागत असल्याची खंत पालकांनी व्यक्त केली. येथील शाळेत सद्यःस्थितीत एक डिजिटल वर्ग हे मुख्याध्यापक कार्यालय व हेच कार्यालय मिळून इतर चार वर्गखोल्यांमध्ये विद्यार्थ्यांच्या बैठकीचे नियोजन करण्यात आले आहे.
त्यात पहिल्या वर्गात २६ विद्यार्थी, दुसऱ्या वर्गात ४१, तिसऱ्या वर्गात ३१ व चौथीच्या वर्गात २५ असे एकूण १२३ विद्यार्थिसंख्या सध्याच्या स्थितीत आहे. यात स्थलांतरित कुटुंबातील विद्यार्थिसंख्या वाढल्यावर वर्गखोल्यांअभावी विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागणार असल्याने, लवकर मंजुरी मिळून येत्या उन्हाळी सुटीत वर्गखोल्यांचे बांधकाम सुरू झाल्यास विद्यार्थ्यांना सोयीचे ठरणार आहे. यासाठी संबंधितांनी वेळीच दखल घेऊन येथील शाळेच्या नूतन वर्गखोल्यांच्या बांधकामासाठी वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा करावा, अशी मागणी पालक वर्गाकडून करण्यात येत आहे.
''ग्रामपंचायत व शालेय व्यवस्थापन समितीमार्फत आम्ही जिल्हा परिषद प्रशासन स्तरावर वेळोवेळी पाठपुरावा केला आहे, पण हा प्रश्न दुर्लक्षित करण्यात येत आहे. मात्र कमी वर्गखोल्यांअभावी विद्यार्थ्यांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. सध्या दोन वर्गखोल्यांच्या दुरुस्ती कामास मंजुरी मिळाली आहे. दुरुस्ती कामास लवकरच सुरवात करण्यात येणार आहे.''-संजय भदाणे, अध्यक्ष, शालेय व्यवस्थापन समिती, कळंबू
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.