धुळे : पांझरा नदीकाठी वसलेले कोरडवाहू न्याहळोद (ता. धुळे) पूर्वी मल्लांचे गाव म्हणून ओळखले जात होते.
गावाचा विस्तार होऊ लागला तसा रोजगाराचा (Employment) प्रश्नही उभा ठाकत होता. (Self reliance from budding youth of village nyahalod is known as plumbers village dhule news)
यातून आत्मनिर्भरतेची कास धरत असंख्य युवक, तरुणांनी प्लंबिंग व्यवसायात पाय रोवण्यास सुरवात केली आणि आज न्याहळोद प्लंबरचे गाव म्हणून ओळखले जात आहे.
धुळे शहरापासून १७ किलोमीटरवर सरासरी दहा ते बारा हजार लोकवस्तीचे न्याहळोद आहे. ते पांझरा नदीकाठी आहे. तरीही सिंचनाच्या पुरेशा सोयी-सुविधा उपलब्ध नसल्याने शेतीसंबंधी रोजगाराची साधने निर्माण होऊ शकलेली नाहीत.
त्यामुळे तरुणांना स्वतःच्या पायावर उभे राहायचे असेल तर त्यांना स्वयंरोजगाराची कास धरण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. न्याहळोदला कनिष्ठ महाविद्यालयापर्यंत शिक्षण व्यवस्था आहे. त्यामुळे शिक्षणापासून रोजगारापर्यंत या गावातील नागरिकांसह तरुण आणि विद्यार्थ्यांना धुळे शहराशी संपर्क ठेवावा लागतो
हेही वाचा : ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!
शहराची गरज ओळखली
अनेक होतकरू तरुणांनी धुळे शहराची गरज ओळखत प्लंबिंगसह विविध व्यवसायात पाय रोवण्यास सुरवात केली. न्याहळोदमध्ये मराठा-पाटील, माळी, कोळी, मुस्लिम आणि अनुसूचित जाती संवर्गातील विविध घटक गुण्यागोविंदाने नांदतात. साहजिकच विविध समाजांतील होतकरू तरुणांनी प्लंबिंग व्यवसायातील तंत्रकौशल्य आत्मसात करण्यास सुरवात केली.
ते या कामासाठी धुळे शहरातील बांधकाम व्यावसायिक, प्लंबिंग क्षेत्रातील ठेकेदारांकडे रुजू झाले. तेथून होतकरू तरुणांनी प्लंबिंग व्यवसायातील धडे गिरविण्यास सुरवात केली. ते न्याहळोदसह पंचक्रोशी आणि धुळे शहरात कामे करू लागले.
तरुणांची मुंबईपर्यंत झेप
न्याहळोदमधील प्लंबर हे आता धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, पुणे, मुंबई येथे प्लंबिंग कामासाठी जातात. कामकाजात गुणवत्ता, दर्जा राखत असल्याने त्यांना पसंती दिली जाते.
धुळे शहराजवळ लळिंग किल्ल्याच्या पायथ्याशी दिवाणमळ्यालगत सडगाव मार्गावर वॉटर पार्क विकसित झाले आहे. तेथील प्लंबिंगची कामेही न्याहळोदचे प्लंबर संतोष वाघ यांनी केली आहेत. त्यामुळे या क्षेत्रात न्याहळोदचा नावलौकिक उंचावत आहे.
साखळी पद्धतीचा आदर्श
न्याहळोद येथील जे प्लंबर जम बसल्याने आता ठेकेदार झाले आहेत, ते गावासह समाजाचे काही देणे लागते या उदात्त भावनेने आणि साखळी पद्धतीने गावातील इतर बेरोजगार तरुणांना प्लंबिंगचे काम शिकवितात.
त्यांच्याही उदरनिर्वाहाचा प्रश्न सोडवीत आहेत. आपल्याला दोन पैसे मिळतात, तसे इतर तरुणांनाही मिळावे यासाठी बेरोजगार तरुणांना वर्ष-दोन वर्षे हे काम शिकवून ठेकेदार बनवितात. अशा आदर्शवत साखळी पद्धतीने आजमितीस शंभर ते दोनशे तरुणांना प्लंबर म्हणून घडविले आहे. असे होतकरू तरुण ठेकेदार धुळे शहरात आपली वेगळी ओळख निर्माण करून आहेत.
रोजगाराला मिळते चालना
न्याहळोद येथील जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (स्व.) सुकलाल कढरे यांचा मुलगा भालचंद्र ऊर्फ श्याम कढरे यांचा धुळे शहरात नगावबारी चौफुली परिसरात पाटकर व अनमोलनगरलगत प्रथमेश डिस्ट्रिब्यूटर्स नामक बांधकाम साहित्य विक्रीचा व्यवसाय आहे. अशा अनेक विक्रेत्यांच्या संपर्कात राहून गावातील प्लंबर सहज काम मिळवितात.
न्याहळोदसारख्या ग्रामीण भागात २० ते २५ वर्षांपूर्वी कुणाला प्लबिंगच्या कामाचा गंध नव्हता. त्या वेळी निरंजन माळी, प्रभाकर वाघ आदींनी धुळे शहरातील अग्रेसर प्लंबर कवीश्वर यांच्याकडून या व्यवसायाचे धडे गिरविले होते. त्यांच्या माध्यमातून आज अनेक तरुण सुरवातीस बिगारी, नंतर कारागीर, ठेकेदार म्हणून रोजगारप्रधान बनले आहेत. अशी आत्मनिर्भरतेची कास जिल्ह्यासाठी अनुकरणीय ठरत आहे.
"आपण जे व्यावसायिक कौशल्य आत्मसात करतो, ते इतर बेरोजगार तरुणांना शिकविले पाहिजे. त्यातून बेरोजगारी कमी करण्याचे समाधान मिळत असते." -संतोष वाघ, प्लंबर ठेकेदार, न्याहळोद
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.