नंदुरबार : राज्यात भाजपच्या सत्तस्थापनेचा आणि 78 तासातच पायउतार होण्याच्या धक्कादायक घटनेनंतर सत्तेचा पायउतार आणि भविष्यात त्याला पूरक घडलेल्या शहाद्यातील काही घटनांची सांगड घालत राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. निवडणूक प्रचाराच्या शेवटी काळात येथे आलेला मुख्यमंत्री अथवा पंतप्रधान पुन्हा सत्तेवर येत नाही अशी ही चर्चा आहे. औटघटकेचे ठरलेले भाजपचे सरकार आणि प्रचारापूर्वी आलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अशी ही सांगड घालत राजकीय धुरीण आपापल्यापरीने अर्थ लावत आहेत.
शहादा हे नंदुरबार जिल्ह्यातील महत्त्वाचे राजकीय सत्ता केंद्र. शरद पवार यांनी 1979 मध्ये पुलोद आघाडी स्थापन करून मुख्यमंत्रपद मिळविले, तेव्हा (स्व) पी. के. अण्णा पाटील हे शहाद्याचे आमदार होते. नंतर हे सरकार पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी बरखास्त करून टाकले. तेव्हापासून शहाद्यात कुणीही आले, की आता याचा राजकीय पाडाव होणार असे नेहमीच बोलले जात असे. त्यानंतर 1991 मध्ये तत्कालिन पंतप्रधान चंद्रशेखर हे शहाद्यात आले होते. ते येथून गेल्यानंतर काही दिवसातच त्यांचे सरकार कोसळले.
बडे बडे शहरो में...चा किस्सा
मुंबईवर 2008 मध्ये हल्ला झाला; तेव्हा राज्यात कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे सरकार होते. तत्पूर्वी दोन दिवस आधी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांची प्रकाशा तर उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांची म्हसावद (ता. शहादा) येथे जिल्हा परिषद निवडणुकीसाठी प्रचारसभा होती. हल्ल्यानंतर त्यांना लगेच परतावे लागले. तेव्ही आर. आर. पाटील यांनी "बडे बडे शहरो में, छोटे छोटे हादसे होते है' असे वक्तव्य केल्याने प्रचंड टीका झाल्याने त्यांना राजीनामा द्यावा लागला होता. दुसरीकडे मुख्यमंत्री देशमुख हे असा संवेदनशीलवेळी चित्रपट निर्माता रामगोपाल वर्मा यांना ताजमधील दृश्ये पाहण्यास घेऊन गेले होते. त्यावरही जोरदार टीका होऊन त्यांना राजीनामा द्यावा लागला होता.
आधार लॉचिंग अन् आला "आदर्श' घोटाळा
यानंतर मुख्यमंत्री झालेले अशोक चव्हाण यांच्या काळात 29 सप्टेंबर 2010 मध्ये देशातील पहिल्या आधारकार्ड वितरणाचे लॉंचिंग शहादा तालुक्यात झाले होते. यावेळी कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि पंतप्रधान मनमोहन सिंग हेही उपस्थित होते. यानंतर पंधराच दिवसात श्री. चव्हाण यांच्यावर आदर्श प्रकरणी कोर्टाने ताशेरे ओढल्याने त्यांना राजीनामा द्यावा लागला. योगायोगही असा की त्यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसचा दारूण पराभव झाला.
अन् पुन्हा सरकार कोसळले
शहादा आणि सत्तेच्या पायउताराच्या योगायोगाची ही चर्चा खानदेशाच्या राजकीय वर्तुळात सुरू असताना राज्यात भाजपचे सरकार आले आणि हाच योगायोग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत खरा ठरला. श्री. फडणवीस हे दसऱ्यानंतर शहादा येथे भाजपच्या प्रचारासाठी आले होते. तत्पूर्वी ते महाजनादेश यांत्रेसाठी शहाद्याला येणार होते; मात्र राज्यातील पूरस्थीतीमुळे त्यांचा शहादा दौरा रद्द झाला होता. तेव्हाही अनौपचारिक चर्चेत मुख्यमंत्र्यांचे पद शाबूत राहणार अशी चर्चा सुरू झाली. मात्र नंतर ते प्रचाराला आले अन् ती चर्चा पुन्हा सुरू झाली होती. राज्यात पुन्हा देवेंद्र फडणवीस यांचे सरकार आल्यानंतरही शहादा पॅटर्न कायम राहणार अशी काही राजकीय मंडळी कुजबूज होती. अन् घडलेही तसेच केवळ 78 तासातच त्यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला.
हा निव्वळ योगायोग
राजकीय घडामोडींत हा निव्वळ योगायोग आहे. त्याचा शहादेकर जनतेच्या भावना दुखावण्याचा हेतू नाही की टीका नाही, मात्र असे घडलेले आहे. हेच वाचकांना सांगण्याचा हेतू आहे असे शहादा तसेच जिल्ह्यातील काही राजकीय नेत्यांनी "सकाळ'शी बोलताना सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.