शौर्य केले कोणी, अन्‌ छाती फुगवतंय कोण - शरद पवार

शौर्य केले कोणी, अन्‌ छाती फुगवतंय कोण - शरद पवार
Updated on

नाशिक - पाकव्याप्त काश्‍मीर भागात हवाई हल्ले केल्याने जगभरात भारताची प्रतिष्ठा वाढली असून, त्याचे सर्व श्रेय जवानांना जाते. परंतु भाजपकडून हल्ल्याचे राजकारण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच शौर्य केल्याचा गावागावांत झेंडे नाचवून देखावा निर्माण केला जात आहे. जवानांच्या शौर्याचे राजकारण करण्याचा हा किळसवाणा प्रकार असून, शौर्य केले कोणी अन्‌ छाती फुगवतंय कोण, या शब्दांत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडताना नाकर्त्या सरकारला सत्तेतून बाहेर फेकण्याचे आवाहन केले. 

चोपडा लॉन्स येथे झालेल्या नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या कार्यकर्ता संवाद कार्यक्रमात ते बोलत होते. पवार म्हणाले, ""दिल्लीतील सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीत हल्ल्याचे राजकारण करायचे नाही असे ठरले असतानादेखील पंतप्रधानांपासून ते अमित शहा यांच्यापर्यंत भाजपचे सर्वच नेते श्रेयाच्या राजकारणात गुंतले. जिनिव्हा करारानुसार वैमानिक अभिनंदन यांना पाकिस्तानने सोडले, त्या घटनेचा राजकीय फायदा घेऊ नये असे अभिनंदन यांच्या पत्नीस भाजप नेत्यांना उद्देशून सांगावे लागले हे दुर्दैव आहे. संरक्षणमंत्री असताना यशवंतराव चव्हाण यांनी पाकिस्तानला पहिला झटका दिला. इंदिरा गांधी यांनी पाकिस्तानचे दोन तुकडे करून इतिहासच नाही घडविला, तर त्या देशाचा भूगोलदेखील बदलल्यानंतर सैन्याच्या शौर्याचे राजकारण झाले नाही. परंतु भाजपकडून सध्या शौर्याचे जे राजकारण सुरू आहे, ते देशाला परवडणारे नाही. सरकारला साडेचार वर्षांत ठोस कामे करता आली नाही. परदेशातील काळा पैसा आणण्याचे आश्‍वासन फसले, नोटाबंदीतून कष्टकऱ्यांच्या कमाईचा पैसा काळा पैसा ठरवून त्यावर घाला घातला गेला. यूपीएचे सरकार असताना शेतकऱ्यांना सरसकट संपूर्ण कर्जमाफी दिली. मात्र, भाजप सरकारने दोन हजार रुपये बॅंक खात्यावर जमा करण्याची घोषणा करून चेष्टा केली. 

गांधी कुटुंबीयांचे योगदान 
पंडित जवाहरलाल नेहरू यांनी लोकशाहीचा पाया मजबूत केला. संघर्षाच्या काळात इंदिरा गांधींनी देशाला सक्षम नेतृत्व दिले. राजीव गांधी यांनी देशाला आधुनिक विज्ञानाची दृष्टी दिली. असे असताना त्यांच्या हत्या होत असतील, तर देशाला अजून किती योगदान हवे, असा सवाल करताना पवार यांनी गांधी कुटुंबाला बदनाम करणारे पंतप्रधान संकुचित मनाचे असून, त्यांच्याकडून देशाच्या प्रगतीची अपेक्षा करणे चुकीचे असल्याचे सांगितले. 

दाल मे कुछ काला 
मोदी भ्रष्टाचार बंद करणार होते, तर राफेल विमानाची किंमत 530 कोटींहून 1600 कोटी रुपयांपर्यंत कशी पोहोचली? संरक्षण विभागात एजंट नसावेत असा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने घेताना तसे आदेशित केले होते, मग अंबानींचा संबंध कसा आला? मिग कराराप्रमाणे राफेल विमाने विकत घेऊन देशात उत्पादन करायचे होते, मग अंबानींच्या कंपनीला राफेलच्या सर्व्हिसिंगचे काम दिलेच कसे? त्याच काळात नागपूरच्या एमआयडीसीत अंबानी यांनी 300 एकर जागेचे उद्‌घाटन केले, हे काम नाशिकच्या एचएएल कंपनीला का दिले नाही? आदी प्रश्‍न उपस्थित करून पवार यांनी दाल मे कुछ काला असल्याचे सांगत राफेल खरेदीवर शंका उपस्थित केली. 

पवार म्हणाले 
- 7 किंवा 8 मार्चला आचारसंहिता लागण्याची शक्‍यता. 
- निवडणूक यंत्राबाबत नाही, परंतू सरकारच्या भूमिकेवर संशय. 
- राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मतदान केंद्रांवर नजर ठेवावी. 
- देशात भाजपची सत्ता आल्यास लोकशाही संपुष्टात येणार. 
- 5 वर्षांत काहीच करता न आल्याने सरकारचा रडीचा डाव. 
- राफेल शब्द भ्रष्टाचाराच्या व्याख्येत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.