शहादा : सारंगखेडा येथील अश्वबाजारात भटिंडा (पंजाब) येथून आलेली दीड कोटी किंमत असलेली शाहीन व बडनगर (जि. उज्जैन, मध्य प्रदेश) येथून आलेला ५१ लाखांचा शेरा येथील आकर्षण ठरत आहेत. शाहीन व शेराचे देखणे रूपडे, रुबाबदार चाल अश्वशौकिनांच्या डोळ्यांचे पारणे फेडत आहे. विशेष म्हणजे संपूर्ण भारतात ७१ इंच उंची असलेली शाहीन एकमेव असल्याचे तिचे मालक निर्भय सिंग यांनी सांगितले.
सारंगखेडा (ता. शहादा) येथील अश्वबाजार जातिवंत, रुबाबदार घोड्यांसाठी देशभर प्रसिद्ध आहे. दर वर्षी विविध प्रांतांतून देखणे घोडे अश्वबाजारात दाखल होतात. येथे प्रदर्शनात आणले जाणारे महागडे घोडे त्यांचे मालक सहसा विकत नाहीत, फक्त आवडीसाठी ते त्यांना पाळतात. त्यांच्यात असलेली सुंदरता व देखणे रूप मजबुती असल्यानेच ते प्रदर्शनामध्ये दाखल होतात.
हेही वाचा: संयुक्त नावावरील गृहकर्जातून होईल प्राप्तीकराची बचत...
या वर्षीही विविध घोडे दाखल झाले आहेत. पंजाबमधून आलेले निर्भयसिंग यांनी आपल्या मित्राच्या सांगण्यावरून येथील प्रदर्शनात गुलजार वंशाची भारतातील सर्वांत उंच असलेली शाहीन आणली आहे. तिची उंची ७१ इंच असून, तिची किंमत दीड कोटीपर्यंत आहे. अश्वबाजारात ७० लाखांपर्यंत तिची मागणी झाली आहे.
शाहीनला दररोज चणे, दही, दूध, हंगामी फळांचा आहार दिला जातो. सध्या सफरचंदाचा हंगाम असल्याने दररोज पाच किलो सफरचंदे खात असून, दहा ते बारा लिटर दूधही ती घटाघटा पिते. तिचा खर्च मोठा असला तरी आम्हाला आवड असल्याने आम्ही तिचे पालनपोषण करतो, असे शाहीनचे मालक निर्भय सिंग यांनी सांगितले.
शेरा खातोय भाव...
त्याचबरोबर धिप्पाड शरीरयष्टी, देखणा व रुबाबदार असलेला ६२ इंच उंचीचा नुकरा (मारवाडी) जातीचा अश्वही बडनगर (जि. उज्जैन, मध्य प्रदेश) येथून दाखल झाला आहे. तोही यात्रेत येणाऱ्या प्रत्येक अश्वशौकिनाला भुरळ घालत आहे. सुंदर आणि देखणा असलेल्या शेराची किंमत ५१ लाख रुपये ठेवण्यात आली आहे.
''या वर्षी विक्रमी घोडे विक्री झाल्याचे चित्र शेवटी बघायला मिळेल. जवळपास दोन हजारांपर्यंत घोडे यात्रेत दाखल झाले आहेत. सात दिवसांतून जवळपास ५५० घोडे विक्री झाले असून, दोन कोटी रुपयांपर्यंत उलाढाल झाली आहे. या वर्षी घोडे विक्रेत्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. लम्पी आजारामुळे देशात बहुतांश ठिकाणी बाजार भरले नाहीत; परंतु येथे अश्वबाजार भरला आणि विक्रीही चांगली होत असल्याने सर्व विक्रेते खूश आहेत.'' -जयपालसिंह रावल, अध्यक्ष, चेतक फेस्टिव्हल, सारंगखेडा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.