Dhule News : धनतेरस आणि लक्ष्मीपूजनामुळे धनप्राप्तीचा उत्सव मानल्या जाणाऱ्या दिवाळीने शिरपूर आगाराला अक्षरशः कोट्यधीश केले. अवघ्या २० दिवसांत शिरपूर आगाराने चार कोटी १० लाख रुपयांची कमाई केली. अनेक वर्षांनंतर प्रथमच आगाराने हे लक्ष्य प्राप्त केले.
नोव्हेंबरच्या प्रारंभापासूनच बसस्थानक गर्दीने फुलण्यास सुरवात झाली. विशेषतः लांब आणि मध्यम पल्ल्याच्या बससेवेला मोठी मागणी होती. (Shirpur Agar earned 4 crores in 20 days due to diwali vacation dhule news)
महिला वर्गाला प्रवासभाड्यात ५० टक्के सूट असल्याने प्रवाशांमध्ये महिलांचा भरणा अधिक असल्याचे दिसून आले. आगार व्यवस्थापक व्ही. डी. देवराज, सहाय्यक वाहतूक अधीक्षक मनोज पाटील यांनी बसफेऱ्यांचे काळजीपूर्वक नियोजन केले. सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक मिलिंद परदेशी यांनी युद्धपातळीवर बसची दुरुस्ती, देखभाल करून प्रवासासाठी सज्ज केल्या.
परिणामी १ ते २० नोव्हेंबर या कालावधीत शिरपूर आगाराच्या बसने लांब व मध्यम पल्ल्याचा तब्बल सात लाख ७४ हजार ६३७ किलोमीटर प्रवास यशस्वीपणे केला. या वाहतुकीतून आगाराला चार कोटी दहा लाख ४४ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले.
आगाराची दिवाळी
दिवाळीचा कालावधी शिरपूर आगारासाठी लाभयोग घेऊन आला. नियमित बसफेऱ्यांसह आगारातून लांब आणि मध्यम पल्ल्यासाठी जादा बस सोडण्यात आल्या. त्यांनी २३८ फेऱ्यांतून ८५ हजार किलोमीटर प्रवासी वाहतूक करीत ८ ते १८ नोव्हेंबर या दहा दिवसांत ३५ लाख १६ हजार ७६३ रुपयांचे उत्पन्न मिळवून दिले. या कालावधीत प्रतिकिलोमीटर ४१ रुपये उत्पन्न मिळविण्याचा विक्रम शिरपूर आगाराने रचला आहे.
महादेव पावला
धुळे येथे पंडित प्रदीप मिश्रा यांच्या शिवमहापुराण कथा कार्यक्रमाची भाविकांमधील लोकप्रियता लक्षात घेऊन बस आगाराने विशेष नियोजन केले. शिरपूरच्या बसस्थानकातून थेट कथावाचन स्थळापर्यंत भाविकांच्या वाहतुकीची सोय आगाराने केली.
या उपक्रमालाही भाविक प्रवाशांनी उदंड प्रतिसाद दिला. या जादा १२६ बसफेऱ्यांच्या माध्यमातून आठ हजार ६४ किलोमीटर प्रवास करीत बसेसनी तीन लाख ६० हजार २०२ रुपयांचे उत्पन्न आगाराला मिळवून दिले.
नावीन्यपूर्ण उपक्रम
प्रवाशांचा कल, अपेक्षा आणि मागणी लक्षात घेऊन शिरपूर आगारातर्फे विविध नावीन्यपूर्ण उपक्रम राबविले जातात. यापूर्वी आगाराने अष्टविनायक यात्रा, नवरात्रात नवदुर्गा यात्रा आदी उपक्रम राबविले असून, त्यांना प्रवाशांचा मोठा प्रतिसाद लाभला.
''प्रवाशांचा आजही बससेवेवर विश्वास कायम आहे. सुरक्षित प्रवासाची हमी महामंडळ देत असते. प्रवाशांचा विमा असतो. आमचे चालक, वाहक बंधू, यांत्रिकी व पर्यवेक्षकीय कर्मचारी यांनी अथक परिश्रम केल्याने ही कामगिरी शक्य झाली.''-मनोज पाटील, सहाय्यक वाहतूक अधीक्षक
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.