Shiv Mahapuran Katha : बरेच भाविक परमेश्वरासाठी असणाऱ्या हिरवा वृक्षाची पाने, फुले तोडण्याऐवजी फांदी तोडतात. मात्र असे करू नका. मानव जन्म ८४ लाख योनीमधून फिरून आल्यानंतर मिळतो. यातील २० लाख योनी या वृक्षांच्या आहेत.
त्यामुळे हिरव्यागार वृक्षांना नष्ट करण्याचा प्रयत्न कोणीही करू नये, असे आवाहन पंडित प्रदीप मिश्रा यांनी केले. (shiv mahapuran katha in dhule guided by Pandit Pradeep Mishra dhule news)
दरम्यान, कथास्थळी रविवारी (ता. १९) सकाळी आठला श्री शिवमहापुराण कथेचे निरूपण केले जाईल. येथील सुरत- बायपासवरील हिरे मेडिकल कॉलेज लगत पंडित मिश्रा श्री शिवमहापुराण कथेचे निरूपण करीत आहेत.
शुक्रवारी (ता. १७) लाखो भाविकांच्या समुदायसमोर तिसरे पुष्प गुंफताना पंडित मिश्रा म्हणाले, की शिवकथा श्रवण केल्याने, भक्ती मार्गानेही पुण्य प्राप्त होते. धुळेकरांना हे पुण्य प्राप्त करण्याची संधी मिळाली आहे. प्रत्येक शिवभक्ताने आपण करू शकत असलेली सेवा दिली तरीही त्याला भगवान शंकराची कृपा प्राप्त होऊ शकते.
सध्या कलियुगाचा काळ
सध्या कलियुगाचा काळ सुरू आहे. या कलियुगात स्वार्थ मोठ्या प्रमाणावर वाढला असून घराघरांत वाद आणि स्वार्थ वाढला आहे. अशा काळात देखील लाखो भाविक एकत्र येऊन भगवान शंकराचे गुणगान गात आहेत. त्यामुळे हे कलियुग नसून शिवयुग असल्याचे पंडित मिश्रा यांनी सांगितले.
या कलियुगातील इतर गोष्टी तसेच भूतकाळात डोकविण्यात वेळ खराब करण्याऐवजी आपण आपल्या हृदयात असणाऱ्या सतीयुगात डोकावून पाहिले पाहिजे. मनात डोकावताना स्वतःच्या प्रतिमेतून परमात्म्याचे दर्शन होईल. प्रत्येकाने एकांतात बसून नामस्मरण केल्याने पुण्य मिळू शकते.
भक्तीत विश्वास हवा
परमेश्वराची भक्ती करताना मनात पूर्ण विश्वास ठेवला पाहिजे. पूर्ण विश्वासाने केलेल्या भक्तीमुळे आपल्या जीवनातील सर्व पापे नष्ट होतात. यानंतर इच्छित फळ प्राप्त होते. ही बाब स्पष्ट करीत असताना पंडित मिश्रा यांनी पुराणातील संतांच्या वचनामधून गिधाडाने केलेल्या कार्याचा विशेष उल्लेख केला.
प्रबळ विश्वास असेल तर भगवान शिवाची प्राप्ती होऊ शकते. महादेवाची कृपादृष्टी प्राप्त करण्यासाठी शिव मंदिरात गेल्यानंतर घरातून नेलेले जल चढवा. त्याचप्रमाणे मंदिरात सेवा करून नंदी महाराजांजवळ बसून श्री महादेवाकडे एकटक पाहून प्रार्थना केल्याने शिवकृपा प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही, असे त्यांनी सांगितले.
सेवा हाही उपायच
कोरोनाचा धोका टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक लस देण्यात आली. कोणतीही समस्या आणि आजार होऊच नये यासाठी अशा पद्धतीचे प्रतिबंधात्मक उपाय करणे आवश्यक आहे. रुद्राक्षाच्या माध्यमातून भगवान शंकराची सेवा करणे हाही असाच उपाय आहे. जीवनात संकट येण्यापूर्वीच हा उपाय केल्यास संकटावर मात करणे शक्य होणार असल्याचे पंडित मिश्रा म्हणाले.
यावेळी त्यांनी राजस्थान सरकारने गोवंशीय जनावरांमधील लंपी आजार बरा करण्यासाठी केलेल्या उपाययोजनेची माहिती दिली. राजस्थानमध्ये जनावरांना दिलेल्या भाकरीमध्ये बेल पत्राची रक्षा, शिवलिंगावर चढविलेले पाणी, त्याचप्रमाणे हळद वापरून तयार केलेली भाकरी गो मातांना देण्यात आली. अशी भाकरी तयार करताना भगवान शंकराचा श्री शिवाय नमस्तुभ्य मंत्राचा जप सुरू ठेवण्यात आला. यातून त्या जनावरांना फायदा झाल्याचे पंडित मिश्रा यांनी सांगितले.
डॉ. भामरे, नाभिक समाजासह विविध सेवांची प्रशंसा
खासदार डॉ. सुभाष भामरे वेळात वेळ काढून श्री शिवमहापुराण कथा रोज सपत्नीक श्रवण करीत असल्याबद्दल त्यांचे पंडित मिश्रा यांनी विशेष कौतुक केले. श्री शिवमहापुराण कथास्थळी असलेल्या मोफत सलून सेवेचे पंडित प्रदीप मिश्रा यांनी कौतुक केले.
यात अखिल भारतीय जीवा सेना आणि जिल्हा सकल नाभिक समाजाने मोफत सलून सेवा देण्यासाठी स्टॉल उभारला आहे. या कथास्थळी मुक्कामी व्यक्तींची दाढी आणि कटिंग मोफत करून ही सेवा दिली जात आहे. कथेचे निरूपण करत असताना पंडित मिश्रा यांनी अशी सेवा देणाऱ्या धुळ्याच्या संबंधित तरुणांच्या कार्याची प्रशंसा केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.