दक्षिण अफ्रिकेत तिरंगा फडकविणार पहिला आदिवासी गिर्यारोहक; मात्र खर्चाचा प्रश्न  

दक्षिण अफ्रिकेत तिरंगा फडकविणार पहिला आदिवासी गिर्यारोहक; मात्र खर्चाचा प्रश्न  
Updated on

नंदुरबार : यंदाच्या दक्षिण आफ्रिकेतील किली मांजरो या सर्वोच्च शिखरावर ३६० एक्सप्लोर्सच्या वतीने एव्हरेस्टवीर तथा आंतरराष्ट्रीय शिक्षक आनंद बनसोडे यांच्या टिमसोबत आंतरराष्ट्रीय गिर्यारोहक मोहिमेसाठी नंदुरबार जिल्ह्यातील अतिदुर्गम भागातील बालाघाट या छोट्याशा पाड्यातील रहिवासी अनिल मानसिंग वसावे या युवकाची निवड झाली आहे. आदिवासी समाजातील कदाचित तो पहिला आंतरराष्ट्रीय गिर्यारोहक ठरणार आहे. 

२६ जानेवारीला प्रजासत्ताकदिनी दक्षिण आफ्रिकेतील किली मांजरो या सर्वोच्च शिखरावर सोलापूर येथील एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे यांची टिम भारताचा तिरंगा रोवणार आहे. मोहिमेसाठी नंदुरबार जिल्ह्यातील अतिदुर्गम भागात असलेले बालाघाट (ता. अकलकुवा) येथील अनिल वसावे या तरुणाची निवड झाली आहे. आदिवासी समाजातील पहिला आंतरराष्ट्रीय गिर्यारोहक होण्याची संधी वसावे यांना प्राप्त झाली आहे. 

...अशी मिळाली संधी 
याबाबत श्री. वसावे यांना त्यांच्या इथपर्यंतचा प्रवासाविषयी विचारले असता त्यांनी सांगितले, की लहानपणापासून अतिदुर्गम, डोंगरदऱ्यात वाढलो. त्यामुळे डोंगर-उतार चढणे- उतरणे आमच्यासाठी नित्याचेच झाले. त्यातच माझी सातारा येथे औषध निर्माणशास्त्राच्या अभ्यासक्रमासाठी निवड झाली. तेथे असताना मॅरेथॉनमध्ये नेहमी सहभागी व्हायचो. त्यातून आंतरराष्ट्रीय एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे यांच्याशी ओळख झाली. त्यांनी माझ्यातील गुण ओळखले. त्यांनी ऑगस्ट महिन्यात यंदाचा किली मांजरो शिखरावरील मोहिमेसाठी निवड चाचणीत सहभागी होण्याची संधी दिली. त्यात भारतातून टॉप टेनमध्ये माझा समावेश झाला. चाचणीत यश मिळाले.

परिस्थिती हलाखीची 
अनिल वसावे यांची घरची परिस्थिती गरिबीची आहे. वडील शेती करतात. लहान भाऊ शिक्षण घेत आहे. स्वतः अनिल मोलगी (ता. अक्कलकुवा) येथे मेडिकल दुकानावर कामाला आहे. त्यातून त्यांचा उदरनिर्वाह चालतो. 

निवड तर झाली, मात्र तीन लाखांचा खर्चाचा प्रश्न 
वसावे यांची निवड होणे, ही आदिवासी समाजातील एक ऐतिहासिक बाब आहे. आदिवासी समाज व जिल्ह्यासाठी भूषणावह आहे. मात्र या मोहिमेसाठी तीन लाखांचा खर्च आहे. त्या खर्चासाठी निधीची गरज आहे. मोहीम जवळ येत आहे. तसतसे त्याला निधीची चिंता सतावत आहे. तो निधी उभारण्यासाठी अनेकांकडून मदतीची अपेक्षा करीत आहे. मात्र कोणाकडूनही प्रतिसाद मिळत नसल्याची खंत त्याने ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केली आहे. 

...अशी असेल मोहीम 
२२ जानेवारी २०२१ पासून गिर्यारोहक मोहिमेस सुरवात होईल. सात दिवसांची ही मोहीम असेल. २६ जानेवारीला किली मांजरो शिखरावर भारताचा झेंडा हे पथक रोवून सलामी देतील. २८ जानेवारीपर्यंत हे वीर परततील. 


लोकप्रतिनिधींकडून उदासीनता 
या मोहिमेतील खर्चाची जुळवाजुळव करण्यासाठी अनिल वसावे अनेक दात्यांकडे जाऊन भिडतो आहे. त्याने नंदुरबार जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींकडे जाऊन पाहिले. काहींनी भेट दिली. पाहतो, असे म्हटले; मात्र मदत मिळालेली नाही. आदिवासी विकासमंत्र्यांकडे बऱ्याचदा गेले. ते भेटले नाहीत. त्यामुळे लोकप्रतिनिधींकडून दुलर्क्षच केले जात आहे. उलट समाजातील पहिला गिर्यारोहक म्हणून इतिहासात नोंद होणारी ही संधी आहे. जिल्ह्यातील चार आमदार, एक खासदार व इतर राजकीय नेत्यांनी ठराविक रक्कम दिल्यास अनिल वसावे यांचा मार्ग सुकर होईल. ज्या कोणाला मदत करता येत असेल त्यांनी करण्याची अपेक्षा वसावे यांनी व्यक्त केली आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.